पियुष सक्सेरिया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
लहानपणी बहरलेल्या कारवीतून वाट काढत एक टेकडी चढत गेल्याचं मला अंधुकस आठवतं.
पण कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी कारवीच्या फुलांनी आच्छादलेला एखादा डोंगर माझ्या
डोळ्यापुढे उभा राहत नाही कि तिचं एखाद फुल अलगद उचलून मी आपल्या वहीत जपून
ठेवल्याचंही मला आठवत नाही. कारवीची झालर पांघरलेला एखादा डोंगर पाहणे ही आयुष्यभरासाठी
एक अविस्मरणीय आठवण ठरू शकली असती कदाचित. लहानपणी अज्ञानामुळे ती संधी गेली. पण
आता पुन्हा एकदा ती मला खुणावत होती आणि यावेळीही तोच मूर्खपणा करणे परवडण्यासारखे
नव्हते. मी लगेच पश्चिम घाटातलं पाचगणी गाठलं. येथे या भागातील पहिल्याच कारवी
महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कारवी या विलक्षण वनस्पतीच्या बहरण्याचा सोहळा
साजरा करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. याची देही याची डोळा मलाही तो सोहळा अनुभवयाचा
होता.
एखाद्या खुरट्या वृक्षासारखी दिसणारी कारवी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पतीप्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरून येते. पावसाळ्यात तिला पालवी फुटते, पुढे या पालवीचे हिरव्यागार मऊ व खरबरीत पानांमध्ये रुपांतर होते. हिवाळ्यात ही पानं गळायला लागतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाड पूर्णपणे वाळल्यासारखं दिसू लागतं. हे चक्र सात वर्ष असंच चालतं. आठव्या वर्षी कारवी आधी कळ्यांनी आणि मग निळसर जांभळ्या फुलांनी बहरून जाते. याबरोबरच हे निरस वाटणारे डोंगरउतार या सुंदर जांभळाईने जणू प्रज्वलित होऊन जातात. संपूर्ण कारवीतून मधमाश्या गुणगुणू लागतात. त्या नुसते मधच गोळा करत नाहीत तर तिचे परागकण वाहण्याचे कामही करतात. कारवीच्या अशा एकत्रित बहरण्यालामुळेच कदाचित स्थानिक लोक या घटनेला कारवी “मेळावर” आली असं म्हणतात. पुढे तीन-चार महिन्यात कारवीला फळे येणे, पिकणे आणि जमिनीवर पडून वाळणे या सर्व गोष्टी नैसर्गिकरीत्या घडून येतात आणि जवळपास जानेवारीच्या सुमारास सर्वच्या सर्व कारवीची झाडे मरून जातात.
कारवीच्या बीज प्रसाराची पद्धतही
विलक्षणच आहे. वनस्पती शास्त्रज्ञ अपर्णा वाटवे यांनी ती समजावून सांगितली, कारवीच्या
बियांचा प्रसार अद्रतास्फोटातून होतो. कारवीची वाळलेली फळे बराच काळ ओलसर
वातावरणात राहिल्यास ती फुटून त्यातून बिया जोरात बाहेर फेकल्या जातात. या बिया
आपल्या मूळ झाडापासून ५ मीटर दूर पर्यंत जाऊन पडतात आणि पावसाळ्यात उगवतात. हा
घटनाक्रम Strobilanthes या वनस्पतीप्रकारचं वैशिष्ट्य आहे. भारतात या प्रकारातल्या ५६ वनस्पती आढळून
येतात.
याच वर्षी, याप्रकारातील उत्तर
पश्चिम घाटाच्या पठारांवर येणारी आणखी एक वनस्पती, टोपली कारवीही फुलली आहे. उलट्या ठेवलेल्या टोपलीसारखी
दिसते म्हणून तिला मराठीत हे नाव पडलं. टोपली कारवीच्या बीजापासून फुलं येण्यापर्यंतच्या कालक्रमाबद्दल
तज्ञांची वेगवेगळी मते आहेत. अंबोलीचे निसर्गप्रेमी महादेव भिसे याबद्दल सांगतांना
म्हणाले कि, “स्थानिक लोक टोपली कारवीला अकरा म्हणतात कारण ११ हा तिला फुलोरा
येण्याचा कालावधी दर्शवतो. हिलाच बकरा असंही म्हटलं जात कारण तिचं झाड खाली डोकं
घालून चरत असलेल्या बकरीसारख दिसतं.”
याच वर्षी या दोन कारवींच फुलून येण जणू पुरेसं नव्हत म्हणून दक्षिणेत आढळून
येणारी आणि १२ वर्षांनी फुलणारी प्रसिद्ध निलकुरुंजीही यांच्या जोडीला मोहरून आली
आहे. तामिळनाडू आणि केरळ मध्ये पसरलेल्या निलगिरी पर्वतरांगांवर ती फुलली आहे. आपल्या
निळसर पांढऱ्या फुलांनी संपूर्ण डोंगर व्यापून टाकणाऱ्या या फुलांमुळेच या पर्वताला
निलीगिरी हे नाव पडलं अस म्हणतात.
कारवी/कुरुंजीचं झाड आणि तिच्या बहरण्याचा हा अनुपम सोहळा
तिथल्या मूळ जमातींच्या जीवनात मोत्यातील धाग्याप्रमाणे गुंफलेला आहे. मुन्नारचे
मुथुवान आणि निलगिरीचे टोडा लोक कुरुंजीच्या फुलोऱ्याला मांगल्याचं प्रतिक मानतात.
फुलं येऊन गेल्यानंतर पुन्हा बी अंकुरेपर्यंत वाळलेलं झाड तोडणं स्थानिक रूढीनुसार
अमंगल मानलं जात. मुथुवान लोक कुरुंजीच्या बहरण्यानं आपलं वय मोजतात आणि कुरुंजीला
प्रेम आणि प्रणयाचं प्रतिक मानतात.
कारवी ही जशी लोकप्रिय आहे तशीच ती प्राणीप्रियही आहे.
याबद्दल माहिती देतांना पाचगणीचे ट्रेकिंग गाईड नामदेव यांनी सांगितले कि तिच्या खरबरीत
पानांनी आणि खोडाने आपले अंग खाजवून घेण्यासाठी गवे दाट कारवीतून चालत जातात.
कणकवली कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक आणि वनस्पतीशास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी
गवे आणि हरणांना कारवीची पाने तर अस्वलांना फळे खायला आवडतात असे सांगितले.
कोट्टागिरी येथील कि स्टोन फाउंडेशनच्या वनस्पतीशास्त्रज्ञ अनिता वर्गीस यांनी बहराच्या
काळात मधमाश्या बारा वर्षांतून एकदाच तयार होणारं, बहुमोल अस एकलपुष्पी (युनिफ्लॉरल)
कुरुंजी मध तयार करतात अशी माहिती दिली.
नाशिकच्या पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी कारवीबद्दल
आणखी वेगळ्याप्रकारची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बहर येऊन गेल्यानंतर वाळलेला
फुलोरा सुद्धा अगदी मादक सुगंध निर्माण करतो ज्यामुळे वाळलेल्या कारवीच्या
फुलांमधून चालणं देखील खूपच आनंददायी वाटतं. गुरांना ही वाळलेली फुलं खूप आवडतात.
आणखी एक आश्चर्य म्हणजे स्थानिक अदिवासी जमाती याला “कैफ” म्हणतात. हा फारसी शब्द
स्थानिक भाषेत कसा आला याचा अभ्यास देखील या निमित्ताने मजेशीर ठरू शकतो.”
परंतु या विलक्षण वनस्पतीचं भविष्यही एकंदरीत प्राणी आणि
पर्यावरणाच्या भविष्यासारखंच संकटग्रस्त आहे. पाचगणी, मुंबईतील संजय गांधी
राष्ट्रीय उद्यान, चोरला घाट, गोवा, अंबोली आणि मुन्नार येथे कारवी पर्यटनाला
सुरुवात झाली आहे. पुण्याच्या निसर्गप्रेमी सायली पलांडे-दातार यांनी याविषयी
बोलतांना खालील शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या, “पर्यावरण आणि
त्याचे संवर्धन समजून घेण्याची ही अद्वितीय संधी फक्त फोटो काढण्याची संधी बनून
राहणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे आवश्यक आहे.”
निलगिरीमध्ये अगदी ब्रिटीशांच्या काळापासून कुरुंजीच्या अधिवासांवर चहा, देवदार, वॉटल,
निलगिरी इत्यादींची लागवड केली जात आहे तसेच धरणांसारखी “विकासकामेही” तिचा
अधिवास बळकावत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या मर्यादित प्रसारामुळे कारवी अधिकच असुरक्षित
बनली आहे. बेंगळूरू येथील नेशनल इंस्टीट्यूट ऑफ़ एडव्हान्स स्टडीजच्या पोस्ट डॉक्टरल स्कॉलर समीरा अग्निहोत्री
यांनी Ageratina
adenophora सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींनीही बिलिगिरीरंगा पर्वतांमध्ये
कुरुंजीच्या अधिवासावर ताबा मिळवला असल्याचे सांगितले.
शासकीय अधिकाऱ्यांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. पुणे विभागाचे मुख्य
वनसंरक्षक, वन्यजीव, सुनील लिमये यांनी कारवीच्या अधिवासावर लागवड करण्याची पद्धत
त्यांनी बंद केली असल्याचं सांगितलं. वर्गीस यांना कारवीचं बहरणं आणि पर्यावरण बदल
यांच्यात असलेल्या संबधांचा अजून फारसा अभ्यास झालेला नसल्याची खंत आहे. त्यांनी
बऱ्याचदा स्थानिक लोकांच्या तोंडून गेल्या काही वर्षांत फुलोरा विरळ होत गेल्याची
तक्रार ऐकली आहे.
कारवीच्या या मनमोहक फुलोऱ्याचा माणसांच्या मनावरही प्रभाव न पडता तरच नवल.
कारवी महोत्सवाच्या आयोजक, मंदाकिनी माथुर यांना ही कल्पना पाचगणीतील एक ज्येष्ठ
आणि हाडाचे निसर्गप्रेमी, स्व. विनायक दीक्षित यांना आदरांजली म्हणून सुचली.
त्यांनीच माथुर यांना १६ वर्षांपूर्वी पहिल्यांदा कारवीचं फुलणं दाखवलं होतं. यावेळी
महोत्सवाच्या माहितीपुस्तिकेतील कारवीचं फुल आपल्या शाळेतील परिसरात फुललेलं पाहून
आपल्याला कसा आश्चर्यकारकरित्या कारवीचा शोध लागला याबद्दल संजीवन शाळेतील
जीवशास्त्राच्या एका शिक्षिकेनंही उत्साहानं सांगितलं.
यावेळी मी जमिनीवर पडलेली कारवीची काही फुलं माझ्या वहीत जपून ठेवण्यासाठी
उचलली खरी पण मग त्या ओलसर मातीला सुवासित करणारी ती फुलं मी परत तिथंच टाकून दिली
आणि २०२४ मध्ये कारवीला पुन्हा भेटण्याची इच्छा आपल्या मनात जपून ठेवायचं ठरवलं.
पियुष सक्सेरिया हे दिल्लीस्थित एक कन्सल्टंट
आणि रिसर्चर आहेत. Our Tigers Return – Children’s Story Book – The Story of
Panna Tiger Reserve (2009-2015) या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत.
First published
in The Indian Express’s Sunday magazine EYE on 2 October 2016: http://indianexpress.com/article/lifestyle/life-style/look-the-karvi-is-flowering/
@@@@@