सोमवार, ५ मे, २०१४

अंदमान आणि निकोबार बेटांवरील कासव

पंकज सेक्सारिया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी फोटोग्राफ्स–पंकज सेक्सारिया

प्राणी सृष्टीतील सर्वाधिक आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या काही घटनांपैकी एक म्हणजे हजारो ऑलिव्ह रिडली समुद्री कासवांचे ओरिसाच्या समुद्री किनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी होणारे आगमन. ही घटना इतकी नेत्रदीपक व लोकप्रिय बनली आहे कि देशातील सर्व कासव येथेच आहेत अशी एक धारणा तयार झाली आहे ज्यामुळे इतर कासवांच्या पेशी, कासव असणारे प्रदेश व त्यांच्या घरटी बांधण्याच्या जागा या त्यांच्या गरीब बांधवांसारख्या दुर्लक्षिल्या जात आहेत.
या दुर्लक्षित बंधावांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दूर बंगालच्या खाडीतील अंदमान आणि निकोबार बेटांवरील कासव. अंदमान आणि निकोबारची बेटे ही खूप महत्त्वपूर्ण आहेत कारण ती कासवांच्या तीन जातींना घरटी बांधण्यासाठी सर्वाधिक चांगली जागा आहे असे मानले जाते. त्या तीन जाती – जायंट लेदरबॅक (Dermochelys coriacea), ग्रीन सी टर्टल (Chelonia mydas), हाव्स्कबिल (Eretmochelys imbricata) या आहेत. ऑलिव्ह रिडली(Lepdochelys olivacea) सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर घरटी बांधतात.
साउथ सेंटीनल वाईल्डलाईफ अभयारण्यात ग्रीन सी कासव घरटे बांधतांना 
जगभरातील समुद्रांमध्ये कासवांच्या फक्त आठच प्रजाती सापडतात. या गोष्टीचा विचार करता हे खूप महत्वपूर्ण आहे. कासव हे जास्तीतजास्त वेळ पाण्याखाली असतात परंतु त्यांना श्वास घ्यायला पृष्ठभागावर यावे लागते. त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेवर हालचाली आणि ताण यांचा प्रभाव पडतो. म्हणूनच दरवर्षी हजारो कासव मासेमारांच्या जाळ्यात अडकतात. समुद्री कासवांचे वैशिष्ट्य म्हणजे मादी कासवांचे अंडी घालण्यासाठी थोडावेळ किनाऱ्यावर येणे वगळता ते एक संपूर्ण समुद्री आयुष्य जगतात. खरतर अंडी घालण्याच्या या सवयीमुळेच ते मानवाला खूप आधीपासून माहित आहेत. तमिळ साहित्यात तर अगदी चौथ्या शतकात याचा उल्लेख आढळतो.
ग्रीन सी टर्टल हा लांबीला १ मीटर आणि वजनाला १५० कि.ग्रॅ. पर्यंत वाढतो. याची अंडी रंगाने गडद निळी व काळसर असतात तर वाढलेले कासव पिवळट हिरवे, हिरवे अथवा तपकिरी रंगाचे असून त्यावर तपकिरी किंवा काळे डाग अथवा रेषा असतात. पाठीच्या कठीण कवचाखाली जमा होणाऱ्या हिरव्या चरबीमुळे याचे नाव हिरवा समुद्री कासव पडले. ग्रीन सी टर्टल खूप मोठे स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे घरटे बांधण्याचे ठिकाण आणि चरण्याचे ठिकाण यांतील अंतर २५०० कि.मी. पर्यंत असू शकते. प्रौढ कासवे ही ज्या ठिकाणी अंडी घातली बरोबर त्याच ठिकाणी परत येतात. मादी कासवे दर दोन ते चार वर्षाला समागम करतात तर नर कासवे समागमार्थ दरवर्षी निपज भूमीला भेट देतात. हिरव्या समुद्री कासवांचा समागम काळ हा त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार बदलतो. कॅरेबिअन बेटांवर तो जून ते सप्टेंबर पर्यंत असतो तर उष्णकटिबंधातील भागात तो पूर्ण वर्षभर चालू असतो. हिरवा समुद्री कासव शाकाहारी असून तो समुद्रातील गवत व घास यांवर जगतो.

याच्याविरुद्ध लेदरबॅक कासव हा खोल समुद्रात राहतो. त्याचे प्रमुख खाद्य जेलीफिश आहे. खरतर लेदरबॅक हा सर्वाधिक खोल सूर मारणाऱ्या प्राण्यांपैकी एक मनाला जातो. या जातीच्या काही कासवांनी तर ४००० फुट खोल सूर मारल्याच्या नोंदी आहेत. लेदरबॅक हा समुद्री कासावांमध्ये सर्वांत मोठा असून चौथ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा आधुनिक सरपटणारा प्राणी आहे. हा लांबीला सहा फुट आणि वजनाला ६०० कि.ग्रॅ. पर्यंत वाढू शकतो. याचा माहित असलेला सर्वांत मोठा नमुना वेल्स नदीच्या किनाऱ्यावर नोंदला गेला आहे. तो लांबीला ३ मी. (१० फुट) आणि वजनाला ९०० कि.ग्रॅ. पेक्षाही जास्त होता. लेदरबॅक हा इतर समुद्री कासावांपेक्षा आणखी एका बाबतीत वेगळा आहे. ती म्हणजे त्याला इतरांसारखे हाडांचे कठीण कवच नसते. त्याचे कवच हे चामडी आणि तेलकट कातडीयुक्त मांसाने झाकलेले असते. यावरूनच त्याचे नाव लेदरबॅक पडले आहे. या महान लेदरबॅकचे शरीर सर्व कासावांमध्ये सर्वाधिक हायड्रो  डायनामिक मानले जाते व त्याचा भौगोलिक पल्ला हा सर्वाधिक विस्तृत असतो. त्याच्या अस्तित्त्वाच्या नोंदी उत्तरेतील अलास्का आणि नॉर्वेपासून ते दक्षिणेत आफ्रिकेतील कॅप ऑफ गुड होप पर्यंत आणि  अगदी दक्षिण कोपऱ्यात न्युझीलंडपर्यंत सापडतात. तो जगातील सर्वांत महान प्रवाशांपैकी एक आहेत. दोन वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी एका लेदरबॅक कासवाचा माग काढला ज्याने इंडोनेशियातून ते अमेरिकेतील ऑरीगोनपर्यंतचा २०,००० कि.मी. पर्यंतचा आपला अन्नशोधार्थ प्रवास हा ६४७ दिवसांत पोहून पूर्ण केला. अटलांटिक समुद्रातील फ्रेंच गयाना येथे पाहिलेल्या मादी कासवांना समुद्राच्या दुसऱ्या बाजूला मोरक्को आणि स्पेन येथे पुन्हा काबीज करण्यात आले.
लेदरबेक ट्रेक्स – ग्रेट निकोबार आयलंड 

हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड अभयारण्य 
हाव्स्कबिल हा लहान कासावांपैकी आहे तो १ मीटर पर्यंत वाढतो. हाव्स्कबिल हा सर्वभक्षक प्राणी आहे परंतु मांसभक्षणाकडे त्याचा अधिक ओढा असतो. तो स्पंज, काही इतर अपृष्ठवंशीय आणि मासे सुद्धा खातो. हे कासव संगमरवरी पिवळे व गडद तपकिरी रंगाचे असतात. कवचाच्यावर पसरलेल्या ढालीमुळे वेगळे ओळखले जातात. यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांची तीक्ष्ण बाकदार चोच. जिच्यामुळे यांना यांचे नाव मिळाले.
हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड अभयारण्य
तसे हाव्स्कबिल मोठ्या प्रमाणावर सापडतात परंतु मुख्यत्त्वे ते उष्णकटिबंधातील भारतीय, पॅसिफिक आणि अटलांटिक सागराच्या खडकाळ भागात सापडतात. ते उष्णकटिबंधातील पाण्याशी जास्तीतजास्त संबंधित आहेत. त्यांच्या जीवनक्रमाबद्दल फारसे माहित नाही. घरटी बांधण्याच्या त्यांच्या दूरच्या बेटांजवळ खाऱ्या पाण्याच्या सरोवरात ते दोन वर्षांत एकदा समागम करतात. यानंतर मादी सरासरी १४० अंडी घालते. जी जवळपास आठ आठवड्यांनी उबतात. नवजात कासव हे फक्त २४ ग्रॅमचे असते आणि नियमाप्रमाणे फक्त रात्रीतच बाहेर पडते.
पूर्ण वाढलेला ऑलिव्ह रिडली हा कासव वरून ऑलिव्ह ब्राऊन व खालून पिवळसर असतो. हाव्स्कबिल सारखाच तोही एक सर्वभक्षक आहे. समुद्री कासावांमध्ये हा सर्वांत लहान असून एका प्रौढ कासवाची लांबी १ मीटरपेक्षाही कमी असते व सरासरी वजन ५० कि.ग्रॅ. असते. ऐतिहासिकदृष्ट्या जगातील सर्व कासावांमध्ये ऑलिव्ह रिडलीचे प्रमाण सर्वाधिक विपुल आहे असे मानले जाते. जगातील ८० देशांच्या समुद्र किनाऱ्यांवर त्यांचा वावर आढळतो. त्यांची अंडी घालण्याची पद्धत हा निसर्गातील खरोखर एक विलक्षण प्रकार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर या कासवांचे समूह समुद्र किनाऱ्याजवळ येतात आणि मग सगळेच, कधीकधी लाखो कासव एकदमच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. या क्रियेला ‘arribada’ (स्पेनिशमध्ये ‘आगमन’) म्हटले जाते. बऱ्याच समुद्री किनाऱ्यांवर तर घरट्यांची संख्या इतकी जास्त असते कि मादी कासवांना आधीच्या मादी कासवांनी घातलेली अंडी उकरून काढून आपली अंडी घालण्यासाठी ती घरटी रिकामी करावी लागतात. जगातील सर्व समुद्री किनाऱ्यांवर मिळून अंदाजे ८ लाख मादी दरवर्षी अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर येण्याची पद्धत आणि तिचे कारण हे अजूनही बरोबर समजलेले नाही. तरीही समुद्री वारे, चंद्राच्या परिक्रमा आणि मादी कासावांकडून सोडले जाणारे फेरोमोन (pheromones) हे काही घटक कारणीभूत असावेत असे समजले जाते.
ओलिव्ह रिडली कासव घरटी बांधतांना – कथबर्ट बे वन्यजीव अभयारण्य
एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कासवांच्या सर्वच जाती धोक्यात आहेत आणि त्यांचा समावेश इंटरनेशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) च्या रेड डेटाबुकच्या संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत झालेला आहे. जगातील कासवांची संख्या खूपच जलदगतीने कमी होतांना दिसून येत आहे. याची कारणे म्हणजे समुद्री पाण्यात वाढत असलेले प्रदूषण, मासेमारांच्या जाळ्यात अडकून मरण, मांसासाठी शिकार, घरटी नष्ट होणे आणि घरटी बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या किनाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नामशेष होणे.
अंदमान आणि निकोबार बेटांवरील कासवांचा Great Andamanese, Onge आणि Nicobarese या आदिवासी जमातींकडून पारंपारिकरित्या नेहमीच वापर झाला परंतु त्यांची छोटीशी लोकसंख्या आणि जगण्याला आवश्यक तेवढीच शिकार यांमुळे कासवांना कधीच धोका पोहचला नाही.
तज्ञांच्या मते खरतर जेथे इतरांना प्रवेश नाही अशा आदिवासींसाठी राखीव प्रदेशांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कासव नष्ट होण्यापासून वाचले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लेदरबॅक कासव. यांची घरटी आता फक्त मानववस्ती नसलेल्या बेटांवर आणि आदिवासींसाठी राखीव प्रदेशांवरच दिसून येतात.
भारत सरकार आणि युनायटेड नेशन्स डीव्हेलपमेंट प्रॉग्राम यांचा एक प्रकल्प म्हणून २००१ मध्ये अंदमान अॅण्ड निकोबार एन्व्हायर्नमेंट (ANET) ने एक अभ्यास प्रकल्प केला ज्यावरून असे लक्षात आले कि निकोबारची बेटे ही  जायंट लेदरबॅक कासवांच्या संरक्षणासाठी जगातील सर्वांत महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक होऊ शकतात. या सर्वेक्षणात असे लक्षात आले कि येथील बेटांच्या किनाऱ्यावर १,००० पेक्षा जास्त कासवांनी घरटी बांधली जगात फक्त तीनच इतर अशा जागा आहेत जेथे १,००० पेक्षा जास्त कासवे घरटी बांधतात. कासवांना असलेल्या धोक्यांची नोंदही या प्रकल्पात केली गेली. एकट्या २०००-०१ च्या नेस्टिंग सिझनमध्ये जवळपास ४० टक्के लेदरबॅक यांच्या पंख, मान आणि पाठीवर बोट प्रपॅलरने कापले गेल्याचे घाव होते. दक्षिणपूर्व अॅशियाकडून येणाऱ्या मोठ्या जहाजांचे व बोटींचे याबद्दल आभार मानले पाहिजेत. त्या निकोबार बेटांच्या दक्षिणेकडून अगदी जवळून जातात. ज्या बेटांवर घरटी बांधायची त्यांचे नष्ट होणे हा सुद्धा कासवांसाठी एक खूप मोठा धोका आहे. १९८१ ते २००० दरम्यान कासवांच्या विविध प्रजातींकडून नियमितपणे वापरले जाणारे कमीतकमी २१ समुद्री किनारे बेटांवर वाढत्या बांधकाम क्षेत्राने खोदून नष्ट केले. पारंपारिक लाकडांचा उपयोग सोडून बेटांवर राहणारे लोक आता मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम करत आहेत आणि त्यासाठी आवश्यक असणारी वाळू फक्त या समुद्र किनाऱ्यांवरच मिळते.

हाव्स्कबिल कासव – साउथ किंक आयलंड 
ही एक सर्वज्ञात गोष्ट आहे कि पॉर्ट ब्लेअरच्या आजूबाजूला असलेले कॉर्बीन्स कोव्ह, वांडूर आणि चिडियाटापू सारखे फक्त एका तासाच्या अंतरावर असणारे समुद्री किनारे वाळू उपश्यामुळे मागली दोन दशकांत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. हे सर्व समुद्री किनारे पूर्वी कासवांच्या घरटी बांधण्याच्या महत्त्वाच्या जागा होत्या. रेव्ह.कॉर्बीन (ज्यांच्या नावावरून या समुद्री किनाऱ्याचे नाव पडले) यांच्या १८६० साली असे निदर्शनास आले कि कॉर्बीन्स कोव्ह या ठिकाणी “एक मोठा वालुकामय समुद्री किनारा आहे” पॉर्ट ब्लेअरजवळ असलेले हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे परंतु तेथे जे काही उरले आहे ते कॉर्बीन यांच्या म्हणण्याला कदाचितच पुष्टि देते. कासवांना घरटी बांधण्यासाठी तेथे आता जागा नाही.
मध्य अंदमानातील कासवांची एक खूप महत्त्वाची घरट्यांची जागा असलेले कथबर्ट बे अभयारण्याची गोष्ट तर खूपच उपरोधिक आहे. अगदी अलीकडे या समुद्री किनाऱ्याचा एक भाग कासव अभयारण्य म्हणून घोषित केला गेला त्याचवेळी दुसऱ्या भागात मात्र वाळू उपसा होत राहिला ज्याचा कासावांवर खूपच विपरीत परिणाम झाला व अभयारण्याचा मूळ हेतूच असाध्य राहिला. यामुळे येथे उभारण्यात आलेल्या पर्यटन प्रोत्साहनपर सुविधाही कुचकामी ठरल्या.  
कासवांच्या नाशाचे आणखी एक मोठे कारण म्हणजे १८६० सालापासून ब्रिटिशांनी येथे आणलेले कुत्रे. आपल्या मानवी मालाकांसोबत या बेटावर ती अगदी सर्वत्र पसरली आहेत आणि याचे परिणाम कासवांसाठी अत्यंत भयंकर आहेत. कुत्री ही नियमितपणे कासवांची घरटी उकरून काढतात, अंडी नष्ट करतात आणि अंड्यातून निघून समुद्राकडे जाणाऱ्या पिल्लांचाही ते नाश करतात. एकदा (जानेवारी १९९८) मध्ये अंदमानातील कथबर्ट बे कासव अभयारण्यात या लेखकाने स्वतः ऑलिव्ह रिडली कासवांनी बांधलेल्या ताज्या २०० घरट्यांपैकी जवळपास ४० टक्के घरटी कुत्र्यांकडून एकाच रात्रीत नष्ट होतांना पाहिली. कुत्र्यांनी मादी कासवांचा छळ करून त्यांच्यावर हल्ले केल्याचीही उदाहरणे आहेत. यामुळे या कासवांना भयंकर ताण  आणि इजा झालेल्या आहेत.
कासवांना असलेल्या या विविध धोक्यांकडे गंभीरपणे आणि तातडीने लक्ष दिले पाहिजे. सर्वच आघाड्यांवर उपययोजना करणे आवश्यक आहे. बांधकामासाठी वेगळे मध्यम शोधणे, कुत्र्यांना आवर घालणे तसेच बेटांवरील लोकांकडून, खासकरून मासेमारांकडून होणारी कासवांची सारखी कत्तल थांबविण्यासाठी कायद्यांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या बाबतीत कदाचित या बेटांवरील मूळ जमातींकडून काही धडा घेतला पाहिजे. त्यांचा अनपेक्षित समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. छोट्याशा अंदमान बेटावरील ऑन्जे या मूळ जमातीबद्दल अंदमान अॅण्ड निकोबार एन्व्हायर्नमेंट टीमने अशाच समजूतदारपणाची नोंद केली आहे. ही २००६ मधील गोष्ट आहे जेव्हा ही संशोधक टीम डिसेंबर २००४ मध्ये झालेल्या भयंकर विध्वंसक भूकंप आणि त्सुनामी यांचा कासावांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास करीत होती.
संशोधक टीमने कासवांच्या स्थितीबद्दल विचारले असता एका वयस्क ऑन्जे सदस्याने सांगितले कि ते आताच समुद्र किनाऱ्यावर कासवे पकडायला गेले होते कारण जमातीतील महिलांना कासवे खायची होती. त्यांना काही कासवे मिळाली परंतु ती अत्यंत कृश, मांसहीन व कमजोर होती. नंतर चर्चेतून असे लक्षात आले कि कासवे ज्यांवर आपले पोषण करतात ते समुद्री घास व गवत भूकंप व त्सुनामीमुळे नष्ट झाले आहेत व म्हणूनच त्यांची अशी दुरवस्था झाली आहे. त्यानंतर जोपर्यंत समुद्री घास वाढत नाही तोपर्यंत जमातीने त्यांची शिकार न करण्याचा निर्णय घेतला.
प्राणी जगताचे संरक्षण आणि मानवजात यांच्या गरजा नेहमी विरुद्ध असल्याचे दिसून येते परंतु या गोष्टीच्या अगदी विरोधात अंदमान आणि निकोबार हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. कासावांकडून घरटी बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या समुद्री किनाऱ्यांचा नाश हा काही निसर्गातील केवळ एका वैभवशाली प्राण्याच्या अस्तित्त्वालाच धोका आहे असे नाही. या वातावरणावर प्रत्यक्ष आश्रित असणाऱ्या मानवांनाही याची मोठी किंमत चुकवणे भाग आहे. पर्यावरणीय आणि आर्थिकही. समजूतदारपणे निर्माण केलेल्या संरक्षण योजनेद्वारे अशी परिस्थिती सहज निर्माण करता येऊ शकते ज्यात कोणीही हरणार नाही सर्वच विजयी होतील.
पंकज सेक्सारिया हे ‘Troubled Islands(2003) या अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थानीय लोक व येथील पर्यावरण यावरील पुस्तकाचे लेखक आहेत. तसेच ते The Jarawa Tribal Reserve Dossier Cultural and Biological Diversities in the Andaman Islands (2010) चे सह संपादक आहेत.
===============================
परीक्षित सूर्यवंशी
                                                   suryavanshipd@gmail.com

विकासासाठी वाघांचा बळी.....

गिरीश पंजाबी, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी, फोटोग्राफ्स – गिरीश पंजाबी

दक्षिण महाराष्ट्रातील असे एक क्षेत्र जेथे दुर्मिळ वन्यजीवांचे वास्तव्य आहे, सरकारकडून रबर लागवडीसाठी आणि खाणींसाठी खुले केले जात आहे....
तो २०१३ मधील मार्च महिना होता. आम्ही एका शोध मोहिमेवर वन्य मांसभक्षक प्राण्यांचे सर्वेक्षण करत होतो. आम्ही तिल्लारी धरणाच्या एका बाजूने चालत होतो तेवढ्यात माझ्या सोबत्याने माझे लक्ष जंगलातील एका मोठ्या “स्क्रेप” कडे (जंगलातील जमिनीचा काही भाग जो नुकताच एका प्राण्याच्या मागील पायांच्या फरपटीने साफ केला गेला होता) वेधले आणि विचारले, ही वाघाची तर नाही? ती खरोखर वाघाच्याच स्क्रेपसारखी वाटत होती. मी उत्तेजित झालो होतो. दोनच पाऊले पुढे जात नाहीत तर आम्हाला वाघाची मोठी विष्टा दिसली. “हा एक मोठा वाघ आहे” मी माझ्या सोबत्याला म्हणालो. माझ्याशी सहमत होत त्याने आपली मान हलवली.
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची पाउलखुण
फोटोग्राफ्स आणि या पुराव्याची माझ्या डेटाशीटवर नोंद घेतल्यानंतर आम्ही डोंगराबरोबर पुढे चालू लागलो. आणखी एक किलोमीटर पुढे गेलो आणि आम्हाला आणखी एक विष्टा दिसली, ती थोडीशी लहान होती, पण खास वाघाच्या विष्टेसारखीच होती. “ही एखाद्या वाघिणीची किंवा छाव्याची असू शकते का?” माझ्या सोबत्याने विचारले. मला खात्री नव्हती म्हणून मी काहीच बोललो नाही फक्त फोटोग्राफ्स घेतले. आम्ही सर्वेक्षण करत असलेल्या या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व असल्याचे मानले जात होते आणि आता तर आमच्याकडे पुरावेही होते.
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची विष्टा 
दुसऱ्या दिवशी आम्ही केंद्रे या तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेलो. येथे पूर्वी एक गाव वसत होते जे नंतर धरणाला जागा करण्यासाठी स्थानांतरीत करण्यात आले. वन विभागाने आयोजित केलेल्या बोटीतून एका तासाच्या सफरीनंतर आम्ही नियोजित ठिकाणी पोहोचलो. आम्ही त्या जलाशयाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. बोटीतून उतरता क्षणीच आम्हाला एक भलामोठा वाघाच्या पायाचा ठसा दिसला, कदाचित एका नर वाघाच्या पायाचा. त्याच्या जवळच एक लहान पाउलखुणही होती, ती कदाचित वाघिणीची किंवा छाव्याची असावी.
मला अत्यानंद झाला होता. या क्षेत्रातील वाघांच्या अस्तित्वाच्या इतक्या प्रबळ पुराव्यांनी मी भारावून गेलो होतो. आमच्यासोबत जो वनपाल आला होता तो म्हणाला, मागील एका भेटी दरम्यान त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला येथे एक वाघाची पाउलखुण दिसली होती आणि बोटीतून एक मोठ्या सुळ्यावाला हत्ती दिसला होता. यातील मजेशीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील ही सर्व क्षेत्रे एकतर राखीव जंगल आहेत किंवा खाजगी मालकीच्या जागा आहेत. ती संरक्षित अभयारण्याचा भाग नाहीत.
नुकत्याच पिल्लांना जन्म दिलेल्या एका मादी बिबट्याचा कॅमेरा-ट्रेप ने घेतलेला फोटो 
हा प्रदेश गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्याशी जोडलेला आहे जेथे वनविभागाला नुकताच कॅमेरा-ट्रॅपने एका वाघाचा फोटो मिळाला आहे. दोडामार्गमधील वझारे गावात २००१ साली एका छाव्यालाही पकडण्यात आले होते. ही क्षेत्रे तलवडे आणि कणकुंबीच्या जंगलांतून कर्नाटकात नवीनच स्थापन झालेल्या भीमगड अभायाराण्याशीही जोडलेली आहेत. वाघ, हत्ती आणि इतर वन्यजीव प्राण्यांच्या योग्य विकासासाठी आवश्यक वातावरण असल्यामुळे एखाद्याला वाटेल कि दक्षिण महाराष्ट्रातील तिल्लारी-चांदगढच्या आजूबाजूचे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य असायला हवे किंवा कमीतकमी कम्युनिटी रिझर्व्ह किंवा संवर्धनासाठी राखीव क्षेत्र तरी असायला हवे. परंतु सरकार मात्र वेगळा विचार करते आहे. त्यांना या क्षेत्रात रबरची लागवड करावयाची आहे आणि खाणी खोदायच्या आहेत! सिंधुदुर्ग जिल्ह्यात रबराचे वेड अभूतपूर्व वाढले आहे. येथील जंगल आणि काजूची शेती हे खाजगी मालकीचे किंवा गावातील समूहांच्या मालकीचे आहेत. परतू येथील जास्तीतजास्त जमीन केरळमधील श्रीमंत व्यावसायिकांनी खरेदी करून घेतली आहे. आणि संपूर्ण डोंगरउताराचा भाग हा रबराच्या एकमेव पिकाने आच्छादून गेला आहे. येथील एक उदाहरण किती भयानक आहे पहा! एका कंपनीकडून ७२० हेक्टर जागेवर रबराची लागवड करण्यात आली आहे ती शिरंगे-मंगेलीमध्ये - जे व्याघ्र अधिवासाच्या अगदी मध्यभागी आहे. एकेकाळी या प्रदेशात जंगल होते. या रबर जागीरींना वायर, जाळी किंवा विद्युत तारींचे कुंपण लावले जाते जे येथील वन्यजीवांना अडथळा निर्माण करते.
रबराच्या शेतीला जंगलापासून पूर्णपणे तोडून टाकण्यासाठी लावलेले जाळ्या आणि काटेरी वायरींचे कुंपण
रबराच्या जागीरीला जंगलापासून वेगळे करण्यासाठी लावलेले विद्युत तारींचे कुंपण, वन्यजीवांना त्यापासून दूर ठेवते
या जिल्ह्यातील आणखी एक अभद्र प्रथा म्हणजे धरणाजवळच्या मोठ्या जमिनी रबर लागवडीसाठी विकणे! रबर हे पीक जास्त पाण्याचे म्हणून ओळखले जाते म्हणूनच धरणाजवळची जमीन त्याच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम ठरते. रबर लागवडीमुळे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जंगलाचा विनाश होतो यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची झीज होते, धरणात गाळ लवकर साचतो आणि त्याची पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. परंतु सरकार व्यावसायिकांना जमीन देण्यात खुश आहे. एका रबर कंपनीची वेबसाईट म्हणते, “या भागात शेतकऱ्यांना रबर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी रबर बोर्ड (रबर लागवडीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची संस्था) ३०,००० रुपयांचे आणि महाराष्ट्र शासन १५,००० रुपयांचे अर्थसहाय्य देते. याव्यतिरिक्त आणखी ४ हजार रुपये पिकाला कुंपण घालण्यासाठी सरकारकडून वेगळे दिले जातात. या भागातील लोक काजू आणि आंब्याच्या शेतीवर जगतात परंतु येथील जास्तीतजास्त जमिनींना कधीच कुंपण घातले जात नाही. सिंधुदुर्गमध्ये फारशा लोकांना रबर लागवड कशी करावी हे माहितही नाही, यामुळे येथील रबराची शेती ही स्थानिक लोकांच्या मालकीची नाहीच. मग सरकार रबर लागवडीला प्रोत्साहन का देऊ पाहत आहे? या भागातील रबर शेती ही पूर्णपणे इतर भागातील व्यावसायिकांच्या मालकीची आहे आणि त्यांच्याकडूनच तिचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. खरतर या रबर जागीरींमध्ये काम करणारे जास्तीजास्त श्रमिकही केरळचे आहेत.
पुढे रबराची लागवड आणि पाठीमागे जंगल दिसत आहे
लक्षपूर्वक पहा, डोंगराच्या एका बाजूवर पूर्णपणे रबरची लागवड केलेली आहे ते जंगल नाही, हा भाग तिल्लारी धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे   
शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात हिंदाल्को बॉक्साईटची खाण खोदण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकल्पाचा पर्यावरण परिणाम मुल्यांकन अहवाल असा दावा करतो कि या प्रदेशात एकही वाघ सापडलेला नाही. परंतु तो असेही म्हणतो कि तीन दुसरे शेड्यूल १ प्रकारचे प्राणी – गवा, माउस डीअर आणि अस्वल खाणीसाठी राखून ठेवलेल्या जागेत दिसले आहेत. हा अहवाल या भागात खाणींना परवानगी दिल्यास येथील अधिवास विनाश होईल आणि वन्यजीव तसेच परिसंस्थेत अस्वस्थता निर्माण होईल हे मान्य करतो परंतु नंतर असा निष्कर्ष काढतो कि या प्रकल्पामुळे या प्रदेशाचा “शाश्वत विकास” घडून येईल. शाश्वत विकास म्हणजे नक्की असत तरी काय?
सिंधुदुर्गमधील रबराच्या शेतीजवळील दगडाची खाण
तिल्लारी-चांदगढ हे क्षेत्र दंडेली-अंशी व्याघ्र अभयारण्याला राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी जोडणाऱ्या व्याघ्र कोरीडॉरचा भाग आहे. येथील जंगलात पसरलेल्या काजूच्या शेतांमध्ये सांबर, एशियायी जंगली कुत्रे, बिबटे इतकेच काय तर वाघसुद्धा फिरतात हे सर्वज्ञात आहे. येथील लोकांची सामुहिक मालकी असलेल्या जंगलात हॉर्नबिल पक्षी आपले घरटे बांधतो, आणि पाणमांजर गावातून आणि खाजगी जमिनीतून वाहणाऱ्या प्रवाहांतून पोहते.
ही आहे खरी शाश्वतता, जेथे सतत विस्फोट होतात अशा खाणी खोदणे आणि रबरासाठी जमिनी नष्ट करणे आणि त्यांना कुंपण घालणे नाही.  
तिल्लारी-चांदगढच्या आजूबाजूचे क्षेत्र कम्युनिटी रिझर्व किंवा संवर्धनासाठी राखीव क्षेत्र म्हणून घोषित करणे आवश्यक आहे जेथे वन्यजीव प्राण्यांचा आणि स्थानिक लोकांचा जगण्याचा अधिकार अबाधित राखला जाईल. ते व्यावसायिकांची किंवा खनिजांच्या भुकेल्या कारखानदारांची जायदाद बनू नये.

गिरीश पंजाबी हे रिसर्चर्स फॉर वाइल्डलाईफ कन्झर्वेशन आणि वाइल्डलाईफ रिसर्च अॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीशी संलग्न आहेत. मांसाहारी प्राणी आणि निसर्ग संवर्धनात त्यांची भूमिका हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. या कामासाठी बेंगालुरूमधील सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज यांनी मदत केली.
===================================
first published in Down To Earth
http://www.downtoearth.org.in/content/tigers-fall-prey-development


परीक्षित सूर्यवंशी
                                                suryavanshipd@gmail.com

गुरुवार, १ मे, २०१४

पक्षी निरीक्षकांची काशी – भरतपूर

अनिरुद्ध छावजी, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी, फोटोग्राफ्स – शिरीष धरप, अनिरुद्ध छावजी

वेडे कुठले........कशाला येतात, तर म्हणे चिमण्या पाहायला.....
भरतपूर फोटो-शिरीष धरप 
कल्पना करा! रंगीत करकोचा आपल्या पिल्लांना घरट्यात घास भरवत आहे हे श्वास रोखून धरायला लावणारे दृश्य पाहत तुम्ही एका अत्यंत मजेशीर पक्षी निरीक्षण दिवसाला सुरुवातच केली आहे आणि वरील शब्द तुमच्या कानावर पडतात !
राजस्थानमधील भरतपूर येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील भागात आमच्या पक्षीनिरीक्षकांच्या गटाचे स्वागत स्थानिक लोकांकडून अशाप्रकारे करण्यात आले !! फक्त येथील गावकरीच नाही तर घराकडील अगदी सुशिक्षित मंडळींपैकीही बरेच जण नेहमी आश्चर्य व्यक्त करतात कि माझ्यासारखे लोक – इतका मोठा प्रवास करून, इतके पैसे खर्च करून – काय पाहायला येतात आणि कशाचे फोटोग्राफ्स काढतात तर – पक्षी? इतका साधारण जीव पाहण्यासाठी इतका आटापिटा? !! ते म्हणतात, हेच पैसे कुठेतरी शेअर्समध्ये गुंतवा, फिक्स डिपोझिटमध्ये ठेवा किंवा कमीतकमी गरजूंना दान तरी करा......इतकी भंपकबाजी  आणि उधळपट्टी कशासाठी?
आणि आम्ही आशा करतो कि एकदिवस त्यांनाही - पक्षी आणि पक्षी निरीक्षणाचा हा ‘नशा’ काय असतो याचा अनुभव येवो....त्यांच्या रंगांचे सौंदर्य, त्यांच्या सुरांचा गोडवा आणि त्यांच्या हालचालींतील चैतन्य त्यांनाही कधीतरी मोहित करोत..!!!
डार्टर पक्षी-शिरीष धरप
माझ्या ज्या मित्रांना माझी ही पक्ष्यांची आवड माहित आहे ते नेहमी तक्रार करतात.... तेरे बर्ड्स ना!!! तुझ्या कोकिळा रात्री भलत्याच वेळी किंचाळतात, पोपट पिकलेली फळे नासवतात आणि इतर लहान पक्षी उभ्या पिकावर धाड घालून धान्य खाऊन टाकतात. आपल्या पिकातून पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी त्यांच्या मागे धावतो आहे - हे चित्र भारतातील ग्रामीण भागात नेहमीच पाहायला मिळते.
या बाबतीत चायनीज तर आपल्याही एक पाउल पुढे गेले होते. आपल्या पिकांचे चीमाण्यांपासून संरक्षण करण्यासाठी, १९५० च्या कुप्रसिद्ध ‘चायनीज स्पेरो एक्सपिरीमेंट मध्ये देशातील सर्व चिमण्या मारण्यासाठी चीनमधील एकूण एक व्यक्तीला सहभागी करण्यात आले! एकूण एक म्हणजे – सामान्य नागरिक, विध्यार्थी, कामगार आणि पक्ष कार्यकर्तेसुद्धा. या ‘प्रयोगात’ घरटी तोडली गेली, अंडी फोडली गेली, पिल्लांनाही मारण्यात आले आणि उडत्या पक्ष्यांना गोळ्या घालून पाडण्यात आले. याचा परिणाम काय तर चीनमधून चिमण्या अचानक नामशेष झाल्या.
परंतु समस्येला खरतर येथूनच सुरुवात झाली. लवकरच तेथे पिकांना मोठा फटका बसला आणि उत्पादनात मोठी घट झाली. तांदळाने आतापर्यंतची न्यूनतम उत्पादन मर्यादा गाठली. १९५८ ते १९६१ दरम्यान पडलेल्या महाभयानक चीनी दुष्काळात जवळजवळ ३ कोटी लोकांना भुकेने तडफडून मरण आले. १९६०च्या  आसपास मात्र कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष, माओ, यांच्या लक्षात आले कि चिमण्या या फक्त धान्यच खात नाहीत तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जीवजंतूही खातात. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता!
डार्टर पक्षी-शिरीष धरप
त्यानंतर मग उलट प्रक्रिया सुरु झाली, सोव्हिएत युनियनकडून चिमण्या आयात करण्याची!!!
या पंखयुक्त आश्चर्याबद्दलच्या प्रेमाने मला तेथे नेले ज्या ठिकाणाला फक्त पक्षीनिरीक्षकांची काशीच म्हणता येईल. राजस्थानातील भरतपूर. हे काही लाख पंखी पाहुण्यांचे हिवाळ्यातील घर आहे जे हिमालय आणि त्याच्याही पलीकडून स्थलांतर करून येतात. तेथील समशीतोष्ण प्रदेश हिवाळ्यात असह्य थंड होतात. भरतपूरला पक्षी चीन, मंगोलिया, रशियन सायबेरिया, सेन्ट्रल एशियन रिपब्लिक्स आणि पूर्व युरोपहून येतात. आणि पक्षीनिरीक्षक? ते तर या देशांच्याही पलीकडून येतात........येथे येणाऱ्यांत मोठ्या प्रमाणावरील अमेरिकन्ससह पश्चिम युरोपियनांची संख्याही मोठी आहे. या पक्षीप्रेमींना पक्ष्यांचे इतके वैविध्य ही डोळ्यांसाठी एक संस्मरणीय मेजवानीच वाटते. भारतीय पक्षीनिरीक्षकही या ‘पक्षी भूमीची’ तीर्थयात्रा आपल्या जीवनकाळात कमीतकमी एकदा तरी करतातच! 
असे असले तरी भरतपूरला प्रसिद्धी नैसर्गिकरीत्या मिळाली नाही. जवळपास २५० वर्षांपूर्वी जेव्हा भरतपूर संस्थानचे राजा महाराजा सुरजमल यांनी अजान बुंद बांधले तेव्हा हा भाग खोलगट खळग्याचा झाला. येथे पूर यायला सुरुवात झाली. लवकरच येथील पाणथळ जागेभोवती एक दाट जंगल तयार झाले. आणि यानेच सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर पाण पक्ष्यांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. हा प्रदेश घाणा किंवा दाट जंगल म्हणून ओळखला जाऊ लागला.
पक्ष्यांचा पाठलाग करत आले ते राजेशाही शिकारी. लवकरच घाणा भरतपूरच्या महाराजांची बदकांच्या मृगयेसाठीची आरक्षित जागा बनले. या शिकारीवेळी श्रीमंत आणि प्रसिद्ध, अर्थातच ब्रिटीश अधिकारी सन्माननीय अतिथी म्हणून बोलावले जात.
येथे कत्लेआम हा शब्द वापरणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यावेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो याने या ठिकाणी एकट्याने एकाच दिवसात ४,२७३ बदके ठार मारली. या मूर्खपणाच्या निर्दयी कत्तलींची यादी न संपणारी आहे....
या प्रदेशात बदल घडवून आणणारी दुसरी घटना घडली ती १८९६ मध्ये ज्यावेळी ब्रिटीश अभियंत्यांनी स्थानिक गुरांना एका ठिकाणी सीमाबद्ध ठेवण्यासाठी एक कृत्रिम पाणीदार चराई क्षेत्र निर्माण केले. तेव्हापासून घाणा हे नेहमीच हजारो गाई आणि म्हशींचे गायरान बनून राहिले आहे..... हो अगदी तोपर्यंत जोपर्यंत पक्षीवैज्ञानिक (ओर्निथोलॉजीस्ट) या पक्ष्यांच्या स्वर्गात अवतरले नव्हते.
आणि १९७२ नंतर, जेव्हा भारतात सर्व प्रकारच्या प्राण्यांवरील नेमबाजी आणि त्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली हा पक्ष्यांचा अधिवास भारतीय तसेच विदेशी पक्षीनिरीक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय बनला.
येणाऱ्या वर्षांत भरतपूरची महती वाढली. मार्च १९७६मध्ये याला ‘पक्षी अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. नंतर याचे ‘केवलदेव राष्ट्रीय उद्यान’ म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले जे येथील शिव मंदिरावरून घेण्यात आले होते. १९८१ मध्ये येथे येणाऱ्या पाणपक्ष्यांच्या निव्वळ संख्येवरून याला ‘रामसार स्थळांच्या’ यादीत समाविष्ट करण्यात आले आणि १९८५ मध्ये याला ‘जागतिक वारसाहक्क स्थळ’ (वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणून मान्यता मिळाली. मग ख्यातनाम पक्षीवैज्ञानिक सर पीटर स्कॉट यांनी याला जगातील सर्वश्रेष्ठ पक्षी प्रदेशांपैकी एक म्हटले यात नवल ते काय!
केवलदेव-शिरीष धरप
पुढे १९८५ मध्ये राष्ट्रीय उद्यानात गुरे चारण्यास बंदी घालण्यात आली! हे खूप दूरदुरून येणाऱ्या उच्चभ्रू पक्षी निरीक्षकांच्या गटांनी दिलेल्या सल्ल्यामुळेही झाले. ज्यांना आपल्या फोटोत एखाद्या प्रवासी पक्ष्यासोबत एखादी म्हैसही यावी हे अजिबात आवडत नव्हते! यानंतर येथील स्थानिक लोकांकडून, जे एका शतकाहूनही अधिक काळापासून आपली गुरे येथे चारत होते, हिंसक विरोध प्रदर्शने करण्यात आली. पोलिसांना गोळीबाराद्वारे हस्तक्षेप करावा लागला ज्यात अनेक विरोधकांचे प्राण गेले.   
असे असले तरी आजपर्यंत गुरे चारण्यावरील बंदी कायम आहे. भारत सरकारलाही चीनी सरकारप्रमाणे उशिरा समजले कि गवताळ प्रदेश परिसंस्थेत म्हशींच्या चरण्याची भूमिका महत्त्वाची आहे. म्हशींच्या चरण्याने आणि त्यांच्या पायाखाली तुडविले गेल्याने गवत वाढून जलाशयांचे अतिक्रमण होण्यापासून रोखले जाते. परंतु आज, सर्वोत्तम यांत्रिक प्रयत्न करूनसुद्धा गवत पाणथळ जागांवर अतिक्रमण करत आहे आणि यामुळे या जागांचे आकुंचन होत आहे.  
नीलगाय-शिरीष धरप
परंतु दुर्दैवे असे कि गुरांना परत बोलावणे हा पर्याय काही कोणत्याही राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापकाला उपलब्ध नाही!!! आणि यामुळे या संरक्षित पक्षी अधिवासाबाद्दलचा स्थानिक समूहांचा विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे, इतका कि काही वर्षांपूर्वी, लोकांच्या प्रचंड दाबावापुढे झुकत राज्याच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पाणथळ जागांसाठी असलेले पाणी शेतीसाठी वळवावे लागले.
असो, आपला मुख्य विषय पक्षी आणि पक्षीनिरीक्षक आहे तर यांकडे परत वळूया...
संयोगाने भरतपूरला माझी प्रथम भेट आणि शाही सायबेरीयन सारस यांच्या शेवटच्या जोडीचे आगमन एकाच वेळी घडले. हे पक्षी सायबेरियातील हिमाचलोत्तर प्रदेशातील (Palaearctic region of Siberia) त्यांच्या प्रजनन स्थळापासून थेट भरतपूरपर्यंत संपूर्ण अंतर उडत आले. या आणि अशाच इतर प्रवासी पक्ष्यांना भरतपूरपर्यंत – आणि अगदी अशाच इतर जागांपर्यंत येण्यास कोण मार्गदर्शन करते हे मानवजातीसाठी एक गूढ कोडे बनून राहिले आहे.
एकीकडे कुठलीही तांत्रिक साधने जवळ नसतांना पक्षी बरोबर पूर्व निर्धारित जागेवर पोहचतात आणि दुसरीकडे, १९७२ साली कशाप्रकारे तांत्रिकदृष्ट्या सुसज्जित जपान एअरलाईन्सचे बोईंग एअरक्राफ्ट फ्लाईट नं. ४०२ मुंबईच्या सांताक्रूझ एअरपोर्टवर उतरण्याऐवजी जुहूच्या छोट्याशा फ्लायिंग क्लब एअरस्ट्रीपवर उतरले आणि नंतर त्याला तेथून मोडून तोडून न्यावे लागले. ज्या ज्येष्ठ मंडळींना ही घटना माहित आहे त्यांच्यासाठी ही सुद्धा एक मजेशीर आठवण आहे.
फोटो-अनिरुद्ध छावजी
परंतु स्थलांतर करणाऱ्या या सरसांचे दुर्दैव असे कि त्यांनी भरतपूरला येण्यासाठी हिंदुकुश पर्वताचा मार्ग निवडला. जो त्यांच्या जीवावर बेतला. कसा? हे तेच ठिकाण आहे जेथे अफगाणिस्तानातील रुक्ष भूमीत युद्धात मशगुल आदिवासी टोळ्यांना या पक्ष्यांच्या स्वरुपात एक सोपे आणि समाधानकारक भोजन सापडले.....मग हे पक्षी एक संकटग्रस्त प्रजाती असली तर त्याचे त्यांना काय!!! लवकरच या पक्ष्यांची मुख्य लोकसंख्या नष्ट झाली. आज या सारसांचा फक्त एक पूर्वी गट जो चीनमध्ये स्थलांतरित झाला होता, जिवंत आहे. सुदैवाने.
याचवेळी अनेक स्थलांतर करणाऱ्या हंसांनी ही युद्ध भूमी टाळून एक अत्यंत वेगळा आणि विलक्षण मार्ग निवडला! ते हिमालय पर्वतरांगांच्या वरून ९००० मीटर (३०,००० फुट) इतक्या उंचीवरून उडत गेले. अविश्वसनीय वाटेल परंतु हे पक्षी उंच पर्वतांवर गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांना नेहमीच दिसतात. ते ज्या उंचीवरून उडत असतात तेथील तापमान हे शून्याखाली ३५ ते ५० डिग्री सेंटीग्रेड इतके असते!!! पक्ष्यांचे हे विचित्र वागणे हे सुद्धा पर्यावरण शास्त्राला न उलगडलेले आणखी एक गूढ कोडेच आहे. 
झाडाच्या ढोलीत विश्रांती घेत असलेले एक लहान घुबड-शिरीष धरप
२९ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या पाणथळ जागेचे हिवाळ्यातील पट्ट हंस (barheaded geese) आणि करड्या पायाचा हंस (greylag geese)– हे नेहमीचे पाहुणे आहेत. अनुषंगाने हे ही सांगणे आले कि भरतपूर हे काही चिलका सरोवरासारखे फक्त एक मोठे एकजिनसी तळे नाही. त्याऐवजी हे कोरडा गवताळ प्रदेश, जंगल, दलदल आणि पाणथळ जागा यांचे एक मजेशीर मिश्रण आहे. एकाच प्रदेशात अधिवासांची इतकी विविधता विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या गरजेनुसार त्यांना जीवनाधार उपलब्ध करून देते. मग यात काय आश्चर्य कि पक्षी निरीक्षकांकडून येथे ३५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली! खरतर यांपैकी अनेक पक्षी जसे कारंड (coots), पाणकोंबडी (moorhens), नुक्ता(comb ducks), करढोक/पाणकावळा (cormorants), चित्र बलाक (painted storks) आणि ओपन बिल्ड स्टॉर्क पावसाळ्यात येथे प्रजननही करतात ज्या काळात येथे खाद्याची भरपूर उपलब्धता असते. या काळात पक्ष्यांनी आपल्या नित्य भुकेल्या लहानग्यांना चारा भरवतांनाचे दृश्य पाहणे हे खूपच मनमोहक असते. यापैकी अनेक लहानगी पिल्ले ही लवकरात लवकर घरट्यातून बाहेर पडून उडण्याच्या उत्सुकतेपोटी धडपड करत असतात. सर्वत्र ओले असणाऱ्या या काळात भरतपूरमधील कोरड्या रस्त्यांसाठी तुम्ही स्थानिक लोकांची मदत घेऊ शकता.
गरुड पक्षी-अनिरुद्ध छावजी
परंतु तुमचे या राष्ट्रीय उद्यानातून प्रवास करणे खऱ्या अर्थाने एकदम खास बनवतात ते येथील स्थानिक ‘अनवाणी निसर्गवैज्ञानिक’. रिक्षा-ओढणारे आणि सायकल चालवणारे हे स्थानिक लोक तुम्हाला तुमच्या आवडीचे पक्षी दाखवण्यासाठी भरतपूरच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्यास मार्दर्शन करतात! ते तुम्हाला येथील पक्षी तर दाखवतातच परंतु त्याचबरोबर पक्षी निरीक्षणाबद्दलही विशेष ज्ञान प्रदान करतात.   
येथे सहज आढळून येणाऱ्या बदकांत गढवाल(gadwall), शोव्हेलर (shoveller), पिनटेल(pin tail), कॉमन टील(common teal), कॉटन टील(cotton teal) आणि पोचार्ड(pochard) यांचा समावेश होतो. सारस पक्षी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी प्रेमाराधना करतांना मोठ्याने चित्कारत असल्याचे दृश्य म्हणजे एक विलक्षण देखावा असतो! याशिवाय भरतपूरला आणखी जास्त आकर्षक बनवतात ते येथील शिकारी पक्षी - वो आसमान के शासक. शोर्ट टोड इगल्स, इम्पेरिअल इगल्स, टाव्नी इगल्स, स्पोटेड इगल्स - आकाशांत उंच उडतांना किंवा एखाद्या विस्तारलेल्या फांदीवर विश्रांतीसाठी बसलेले असतांनाही हे तुमचा श्वास रोखू शकतात.  
पण माझा आवडता पक्षी कोण म्हणून विचाराल तर तो म्हणजे आपल्या कृष्णधवल पोशाखात, असीम पसरलेल्या हिरव्या गवतात, उंच उभा काळ्या मानेचा करकोचा (black necked stork). आपली भाल्यासारखी लांब चोच जांभळ्या पाणकोंबडीच्या पोटात खुपसून तिला ठार मारतांनाचे या पक्ष्याचे चित्र माझ्या स्मृतीपटलावर खोलवर कोरले गेले आहे.  

पक्ष्यांव्यतिरिक्तही येथे अनेक सरपटणारे आणि सस्तन प्राणी आहेत जे तुमचे लक्ष वेधून घेतील. मध्याह्नाच्यावेळी उन खात पडलेले भव्य अजगर! या दृश्याला काय उपमा द्यावी? उत्तर भारतात हिवाळ्यातील सकाळ ही धुक्याने झाकोळलेली असते – विशेषकरून भरतपूरमधील – कारण तेथील हवेत आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असते. सहसा इतर जंगलांमध्ये पक्षी निरीक्षक पहाटेच्या थोडेसे आधी सफरीसाठी निघतात परंतु येथे त्यांना आपले वेळापत्रक बदलावे लागते. खर म्हणजे भरतपूरमधील जास्तीतजास्त सकाळी भयंकर थंडी असते. तुमच्या हॉटेल वेटरने बेड टीच्या वेळी दिलेला हा “सल्ला” कि “साहेब घाई करण्याची गरज नाही, सगळे पक्षी दिवसभर तेथेच राहणार आहेत.!!!” खूपच दिलासादायक वाटतो.
एक सस्तन प्राणी जो सापडण्यास कठीण परंतु त्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांना सार्थक ठरवणारा होता, तो म्हणजे भारतीय पाणमांजर. एकदा बोटीने प्रवास करतांना मला हा मुंगुसासारखा दिसणारा प्राणी दिसला, अत्यंत चपळ आणि एक शानदार जलतरणपटू! हा मांसभक्षक प्राणी पाण्याखालील माशांचा पाठलाग करत होता आणि त्याचवेळी पक्ष्यांवरही आपले नशीब आजमावत होता. येथे सापडलेला आणखी एक मायावी म्हणजे फिशिंग कॅट. हा एक छोटा शिकारी आहे – जो या पाणी परिसंस्थेत आपले भक्ष्य अत्यंत कुशलतेने पकडण्यात प्रवीण आहे. येथील वेळूच्या बनात तुम्ही पाहू शकाल असा आणखी एक सुंदर प्राणी आहे उंच सांबर.
येथील सर्व प्राणी आणि पक्ष्यांनी या पाणथळ जागेशी आणि तिच्या बदलणाऱ्या पाणी पातळीशी चांगल्याप्रकारे जुळवून घेतले आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत मार्चपासून जेव्हा स्थलांतर करणारे आपल्या प्रजनन भूमीकडे निघून गेलेले असतात, दलदल वाळण्याची प्रक्रिया सुरु होते. खरतर, राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापन योजनेत या पाणथळ जागेचे काही भाग उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे होऊ देणे नियोजित आहे. पुढे जेव्हा पावसासोबत याभागात पूर येतो तेव्हा डाईक आणि स्लुईस गेटसद्वारे मेन्युअली ज्या दहा विभागांत भरतपूर विभागले गेले आहे त्यांतील पाणी नियंत्रित केले जाते. असे सर्वोत्तम प्रयत्न करूनही दुष्काळाची भीती नेहमीच असते आणि शेतीला अभिजनांच्या आवडीपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाण्याचीही.
फोटो-अनिरुद्ध छावजी
प्रभू रामाचे भाऊ भरत, जे त्यांच्या मागे अयोध्येत राहिले यांच्या नावावरून भरतपूरचे नाव ठेवण्यात आले आहे. अशी आशा केली जाते कि भरतपूरचे अस्तित्व कुठल्यातरी स्वर्गीय आशीर्वादावर, अस्थिर पावसावर किंवा पक्ष्याच्या एखाद्या प्रजातीच्या असण्या आणि नसण्यावरही अवलंबून असू नये. माझ्यासारखा पक्षी निरीक्षक हा जेथेकोठे पक्षी असतील तेथे जातच राहील.
परंतु भरतपूरचे केवलदेव राष्ट्रीय उद्यान एक जागतिक प्रसिद्धीचा पक्षी अधिवास म्हणून आपले अस्तित्त्व तेव्हाच टिकवू शकेल आणि त्याची भरभराटही तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या आजूबाजूला असलेल्या १५ गावांचा सक्रीय सहभाग त्याला लाभेल.   
आशा करूयात कि कधीतरी असा एक दिवस उजाडेल जेव्हा स्थानिक लोकांना सोबत घेऊन वन व्यास्थापानाचे हे प्रयत्न पुढे नेले जातील – या नयनरम्य, भव्य पक्षी अभयारण्यासाठी. तेव्हाच कुठे अनेक संकटग्रस्त प्रजातींसाठी भरतपूर एक सुरक्षित निवासस्थान म्हणून अबाधित राहू शकेल.
=======================================
परीक्षित सूर्यवंशी

                                                suryavanshipd@gmail.com