गुरुवार, १ मे, २०१४

पक्षी निरीक्षकांची काशी – भरतपूर

अनिरुद्ध छावजी, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी, फोटोग्राफ्स – शिरीष धरप, अनिरुद्ध छावजी

वेडे कुठले........कशाला येतात, तर म्हणे चिमण्या पाहायला.....
भरतपूर फोटो-शिरीष धरप 
कल्पना करा! रंगीत करकोचा आपल्या पिल्लांना घरट्यात घास भरवत आहे हे श्वास रोखून धरायला लावणारे दृश्य पाहत तुम्ही एका अत्यंत मजेशीर पक्षी निरीक्षण दिवसाला सुरुवातच केली आहे आणि वरील शब्द तुमच्या कानावर पडतात !
राजस्थानमधील भरतपूर येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील भागात आमच्या पक्षीनिरीक्षकांच्या गटाचे स्वागत स्थानिक लोकांकडून अशाप्रकारे करण्यात आले !! फक्त येथील गावकरीच नाही तर घराकडील अगदी सुशिक्षित मंडळींपैकीही बरेच जण नेहमी आश्चर्य व्यक्त करतात कि माझ्यासारखे लोक – इतका मोठा प्रवास करून, इतके पैसे खर्च करून – काय पाहायला येतात आणि कशाचे फोटोग्राफ्स काढतात तर – पक्षी? इतका साधारण जीव पाहण्यासाठी इतका आटापिटा? !! ते म्हणतात, हेच पैसे कुठेतरी शेअर्समध्ये गुंतवा, फिक्स डिपोझिटमध्ये ठेवा किंवा कमीतकमी गरजूंना दान तरी करा......इतकी भंपकबाजी  आणि उधळपट्टी कशासाठी?
आणि आम्ही आशा करतो कि एकदिवस त्यांनाही - पक्षी आणि पक्षी निरीक्षणाचा हा ‘नशा’ काय असतो याचा अनुभव येवो....त्यांच्या रंगांचे सौंदर्य, त्यांच्या सुरांचा गोडवा आणि त्यांच्या हालचालींतील चैतन्य त्यांनाही कधीतरी मोहित करोत..!!!
डार्टर पक्षी-शिरीष धरप
माझ्या ज्या मित्रांना माझी ही पक्ष्यांची आवड माहित आहे ते नेहमी तक्रार करतात.... तेरे बर्ड्स ना!!! तुझ्या कोकिळा रात्री भलत्याच वेळी किंचाळतात, पोपट पिकलेली फळे नासवतात आणि इतर लहान पक्षी उभ्या पिकावर धाड घालून धान्य खाऊन टाकतात. आपल्या पिकातून पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी त्यांच्या मागे धावतो आहे - हे चित्र भारतातील ग्रामीण भागात नेहमीच पाहायला मिळते.
या बाबतीत चायनीज तर आपल्याही एक पाउल पुढे गेले होते. आपल्या पिकांचे चीमाण्यांपासून संरक्षण करण्यासाठी, १९५० च्या कुप्रसिद्ध ‘चायनीज स्पेरो एक्सपिरीमेंट मध्ये देशातील सर्व चिमण्या मारण्यासाठी चीनमधील एकूण एक व्यक्तीला सहभागी करण्यात आले! एकूण एक म्हणजे – सामान्य नागरिक, विध्यार्थी, कामगार आणि पक्ष कार्यकर्तेसुद्धा. या ‘प्रयोगात’ घरटी तोडली गेली, अंडी फोडली गेली, पिल्लांनाही मारण्यात आले आणि उडत्या पक्ष्यांना गोळ्या घालून पाडण्यात आले. याचा परिणाम काय तर चीनमधून चिमण्या अचानक नामशेष झाल्या.
परंतु समस्येला खरतर येथूनच सुरुवात झाली. लवकरच तेथे पिकांना मोठा फटका बसला आणि उत्पादनात मोठी घट झाली. तांदळाने आतापर्यंतची न्यूनतम उत्पादन मर्यादा गाठली. १९५८ ते १९६१ दरम्यान पडलेल्या महाभयानक चीनी दुष्काळात जवळजवळ ३ कोटी लोकांना भुकेने तडफडून मरण आले. १९६०च्या  आसपास मात्र कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष, माओ, यांच्या लक्षात आले कि चिमण्या या फक्त धान्यच खात नाहीत तर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जीवजंतूही खातात. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता!
डार्टर पक्षी-शिरीष धरप
त्यानंतर मग उलट प्रक्रिया सुरु झाली, सोव्हिएत युनियनकडून चिमण्या आयात करण्याची!!!
या पंखयुक्त आश्चर्याबद्दलच्या प्रेमाने मला तेथे नेले ज्या ठिकाणाला फक्त पक्षीनिरीक्षकांची काशीच म्हणता येईल. राजस्थानातील भरतपूर. हे काही लाख पंखी पाहुण्यांचे हिवाळ्यातील घर आहे जे हिमालय आणि त्याच्याही पलीकडून स्थलांतर करून येतात. तेथील समशीतोष्ण प्रदेश हिवाळ्यात असह्य थंड होतात. भरतपूरला पक्षी चीन, मंगोलिया, रशियन सायबेरिया, सेन्ट्रल एशियन रिपब्लिक्स आणि पूर्व युरोपहून येतात. आणि पक्षीनिरीक्षक? ते तर या देशांच्याही पलीकडून येतात........येथे येणाऱ्यांत मोठ्या प्रमाणावरील अमेरिकन्ससह पश्चिम युरोपियनांची संख्याही मोठी आहे. या पक्षीप्रेमींना पक्ष्यांचे इतके वैविध्य ही डोळ्यांसाठी एक संस्मरणीय मेजवानीच वाटते. भारतीय पक्षीनिरीक्षकही या ‘पक्षी भूमीची’ तीर्थयात्रा आपल्या जीवनकाळात कमीतकमी एकदा तरी करतातच! 
असे असले तरी भरतपूरला प्रसिद्धी नैसर्गिकरीत्या मिळाली नाही. जवळपास २५० वर्षांपूर्वी जेव्हा भरतपूर संस्थानचे राजा महाराजा सुरजमल यांनी अजान बुंद बांधले तेव्हा हा भाग खोलगट खळग्याचा झाला. येथे पूर यायला सुरुवात झाली. लवकरच येथील पाणथळ जागेभोवती एक दाट जंगल तयार झाले. आणि यानेच सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर पाण पक्ष्यांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. हा प्रदेश घाणा किंवा दाट जंगल म्हणून ओळखला जाऊ लागला.
पक्ष्यांचा पाठलाग करत आले ते राजेशाही शिकारी. लवकरच घाणा भरतपूरच्या महाराजांची बदकांच्या मृगयेसाठीची आरक्षित जागा बनले. या शिकारीवेळी श्रीमंत आणि प्रसिद्ध, अर्थातच ब्रिटीश अधिकारी सन्माननीय अतिथी म्हणून बोलावले जात.
येथे कत्लेआम हा शब्द वापरणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यावेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो याने या ठिकाणी एकट्याने एकाच दिवसात ४,२७३ बदके ठार मारली. या मूर्खपणाच्या निर्दयी कत्तलींची यादी न संपणारी आहे....
या प्रदेशात बदल घडवून आणणारी दुसरी घटना घडली ती १८९६ मध्ये ज्यावेळी ब्रिटीश अभियंत्यांनी स्थानिक गुरांना एका ठिकाणी सीमाबद्ध ठेवण्यासाठी एक कृत्रिम पाणीदार चराई क्षेत्र निर्माण केले. तेव्हापासून घाणा हे नेहमीच हजारो गाई आणि म्हशींचे गायरान बनून राहिले आहे..... हो अगदी तोपर्यंत जोपर्यंत पक्षीवैज्ञानिक (ओर्निथोलॉजीस्ट) या पक्ष्यांच्या स्वर्गात अवतरले नव्हते.
आणि १९७२ नंतर, जेव्हा भारतात सर्व प्रकारच्या प्राण्यांवरील नेमबाजी आणि त्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली हा पक्ष्यांचा अधिवास भारतीय तसेच विदेशी पक्षीनिरीक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय बनला.
येणाऱ्या वर्षांत भरतपूरची महती वाढली. मार्च १९७६मध्ये याला ‘पक्षी अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. नंतर याचे ‘केवलदेव राष्ट्रीय उद्यान’ म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले जे येथील शिव मंदिरावरून घेण्यात आले होते. १९८१ मध्ये येथे येणाऱ्या पाणपक्ष्यांच्या निव्वळ संख्येवरून याला ‘रामसार स्थळांच्या’ यादीत समाविष्ट करण्यात आले आणि १९८५ मध्ये याला ‘जागतिक वारसाहक्क स्थळ’ (वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणून मान्यता मिळाली. मग ख्यातनाम पक्षीवैज्ञानिक सर पीटर स्कॉट यांनी याला जगातील सर्वश्रेष्ठ पक्षी प्रदेशांपैकी एक म्हटले यात नवल ते काय!
केवलदेव-शिरीष धरप
पुढे १९८५ मध्ये राष्ट्रीय उद्यानात गुरे चारण्यास बंदी घालण्यात आली! हे खूप दूरदुरून येणाऱ्या उच्चभ्रू पक्षी निरीक्षकांच्या गटांनी दिलेल्या सल्ल्यामुळेही झाले. ज्यांना आपल्या फोटोत एखाद्या प्रवासी पक्ष्यासोबत एखादी म्हैसही यावी हे अजिबात आवडत नव्हते! यानंतर येथील स्थानिक लोकांकडून, जे एका शतकाहूनही अधिक काळापासून आपली गुरे येथे चारत होते, हिंसक विरोध प्रदर्शने करण्यात आली. पोलिसांना गोळीबाराद्वारे हस्तक्षेप करावा लागला ज्यात अनेक विरोधकांचे प्राण गेले.   
असे असले तरी आजपर्यंत गुरे चारण्यावरील बंदी कायम आहे. भारत सरकारलाही चीनी सरकारप्रमाणे उशिरा समजले कि गवताळ प्रदेश परिसंस्थेत म्हशींच्या चरण्याची भूमिका महत्त्वाची आहे. म्हशींच्या चरण्याने आणि त्यांच्या पायाखाली तुडविले गेल्याने गवत वाढून जलाशयांचे अतिक्रमण होण्यापासून रोखले जाते. परंतु आज, सर्वोत्तम यांत्रिक प्रयत्न करूनसुद्धा गवत पाणथळ जागांवर अतिक्रमण करत आहे आणि यामुळे या जागांचे आकुंचन होत आहे.  
नीलगाय-शिरीष धरप
परंतु दुर्दैवे असे कि गुरांना परत बोलावणे हा पर्याय काही कोणत्याही राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापकाला उपलब्ध नाही!!! आणि यामुळे या संरक्षित पक्षी अधिवासाबाद्दलचा स्थानिक समूहांचा विरोध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालला आहे, इतका कि काही वर्षांपूर्वी, लोकांच्या प्रचंड दाबावापुढे झुकत राज्याच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पाणथळ जागांसाठी असलेले पाणी शेतीसाठी वळवावे लागले.
असो, आपला मुख्य विषय पक्षी आणि पक्षीनिरीक्षक आहे तर यांकडे परत वळूया...
संयोगाने भरतपूरला माझी प्रथम भेट आणि शाही सायबेरीयन सारस यांच्या शेवटच्या जोडीचे आगमन एकाच वेळी घडले. हे पक्षी सायबेरियातील हिमाचलोत्तर प्रदेशातील (Palaearctic region of Siberia) त्यांच्या प्रजनन स्थळापासून थेट भरतपूरपर्यंत संपूर्ण अंतर उडत आले. या आणि अशाच इतर प्रवासी पक्ष्यांना भरतपूरपर्यंत – आणि अगदी अशाच इतर जागांपर्यंत येण्यास कोण मार्गदर्शन करते हे मानवजातीसाठी एक गूढ कोडे बनून राहिले आहे.
एकीकडे कुठलीही तांत्रिक साधने जवळ नसतांना पक्षी बरोबर पूर्व निर्धारित जागेवर पोहचतात आणि दुसरीकडे, १९७२ साली कशाप्रकारे तांत्रिकदृष्ट्या सुसज्जित जपान एअरलाईन्सचे बोईंग एअरक्राफ्ट फ्लाईट नं. ४०२ मुंबईच्या सांताक्रूझ एअरपोर्टवर उतरण्याऐवजी जुहूच्या छोट्याशा फ्लायिंग क्लब एअरस्ट्रीपवर उतरले आणि नंतर त्याला तेथून मोडून तोडून न्यावे लागले. ज्या ज्येष्ठ मंडळींना ही घटना माहित आहे त्यांच्यासाठी ही सुद्धा एक मजेशीर आठवण आहे.
फोटो-अनिरुद्ध छावजी
परंतु स्थलांतर करणाऱ्या या सरसांचे दुर्दैव असे कि त्यांनी भरतपूरला येण्यासाठी हिंदुकुश पर्वताचा मार्ग निवडला. जो त्यांच्या जीवावर बेतला. कसा? हे तेच ठिकाण आहे जेथे अफगाणिस्तानातील रुक्ष भूमीत युद्धात मशगुल आदिवासी टोळ्यांना या पक्ष्यांच्या स्वरुपात एक सोपे आणि समाधानकारक भोजन सापडले.....मग हे पक्षी एक संकटग्रस्त प्रजाती असली तर त्याचे त्यांना काय!!! लवकरच या पक्ष्यांची मुख्य लोकसंख्या नष्ट झाली. आज या सारसांचा फक्त एक पूर्वी गट जो चीनमध्ये स्थलांतरित झाला होता, जिवंत आहे. सुदैवाने.
याचवेळी अनेक स्थलांतर करणाऱ्या हंसांनी ही युद्ध भूमी टाळून एक अत्यंत वेगळा आणि विलक्षण मार्ग निवडला! ते हिमालय पर्वतरांगांच्या वरून ९००० मीटर (३०,००० फुट) इतक्या उंचीवरून उडत गेले. अविश्वसनीय वाटेल परंतु हे पक्षी उंच पर्वतांवर गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांना नेहमीच दिसतात. ते ज्या उंचीवरून उडत असतात तेथील तापमान हे शून्याखाली ३५ ते ५० डिग्री सेंटीग्रेड इतके असते!!! पक्ष्यांचे हे विचित्र वागणे हे सुद्धा पर्यावरण शास्त्राला न उलगडलेले आणखी एक गूढ कोडेच आहे. 
झाडाच्या ढोलीत विश्रांती घेत असलेले एक लहान घुबड-शिरीष धरप
२९ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या पाणथळ जागेचे हिवाळ्यातील पट्ट हंस (barheaded geese) आणि करड्या पायाचा हंस (greylag geese)– हे नेहमीचे पाहुणे आहेत. अनुषंगाने हे ही सांगणे आले कि भरतपूर हे काही चिलका सरोवरासारखे फक्त एक मोठे एकजिनसी तळे नाही. त्याऐवजी हे कोरडा गवताळ प्रदेश, जंगल, दलदल आणि पाणथळ जागा यांचे एक मजेशीर मिश्रण आहे. एकाच प्रदेशात अधिवासांची इतकी विविधता विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या गरजेनुसार त्यांना जीवनाधार उपलब्ध करून देते. मग यात काय आश्चर्य कि पक्षी निरीक्षकांकडून येथे ३५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली! खरतर यांपैकी अनेक पक्षी जसे कारंड (coots), पाणकोंबडी (moorhens), नुक्ता(comb ducks), करढोक/पाणकावळा (cormorants), चित्र बलाक (painted storks) आणि ओपन बिल्ड स्टॉर्क पावसाळ्यात येथे प्रजननही करतात ज्या काळात येथे खाद्याची भरपूर उपलब्धता असते. या काळात पक्ष्यांनी आपल्या नित्य भुकेल्या लहानग्यांना चारा भरवतांनाचे दृश्य पाहणे हे खूपच मनमोहक असते. यापैकी अनेक लहानगी पिल्ले ही लवकरात लवकर घरट्यातून बाहेर पडून उडण्याच्या उत्सुकतेपोटी धडपड करत असतात. सर्वत्र ओले असणाऱ्या या काळात भरतपूरमधील कोरड्या रस्त्यांसाठी तुम्ही स्थानिक लोकांची मदत घेऊ शकता.
गरुड पक्षी-अनिरुद्ध छावजी
परंतु तुमचे या राष्ट्रीय उद्यानातून प्रवास करणे खऱ्या अर्थाने एकदम खास बनवतात ते येथील स्थानिक ‘अनवाणी निसर्गवैज्ञानिक’. रिक्षा-ओढणारे आणि सायकल चालवणारे हे स्थानिक लोक तुम्हाला तुमच्या आवडीचे पक्षी दाखवण्यासाठी भरतपूरच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्यास मार्दर्शन करतात! ते तुम्हाला येथील पक्षी तर दाखवतातच परंतु त्याचबरोबर पक्षी निरीक्षणाबद्दलही विशेष ज्ञान प्रदान करतात.   
येथे सहज आढळून येणाऱ्या बदकांत गढवाल(gadwall), शोव्हेलर (shoveller), पिनटेल(pin tail), कॉमन टील(common teal), कॉटन टील(cotton teal) आणि पोचार्ड(pochard) यांचा समावेश होतो. सारस पक्षी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी प्रेमाराधना करतांना मोठ्याने चित्कारत असल्याचे दृश्य म्हणजे एक विलक्षण देखावा असतो! याशिवाय भरतपूरला आणखी जास्त आकर्षक बनवतात ते येथील शिकारी पक्षी - वो आसमान के शासक. शोर्ट टोड इगल्स, इम्पेरिअल इगल्स, टाव्नी इगल्स, स्पोटेड इगल्स - आकाशांत उंच उडतांना किंवा एखाद्या विस्तारलेल्या फांदीवर विश्रांतीसाठी बसलेले असतांनाही हे तुमचा श्वास रोखू शकतात.  
पण माझा आवडता पक्षी कोण म्हणून विचाराल तर तो म्हणजे आपल्या कृष्णधवल पोशाखात, असीम पसरलेल्या हिरव्या गवतात, उंच उभा काळ्या मानेचा करकोचा (black necked stork). आपली भाल्यासारखी लांब चोच जांभळ्या पाणकोंबडीच्या पोटात खुपसून तिला ठार मारतांनाचे या पक्ष्याचे चित्र माझ्या स्मृतीपटलावर खोलवर कोरले गेले आहे.  

पक्ष्यांव्यतिरिक्तही येथे अनेक सरपटणारे आणि सस्तन प्राणी आहेत जे तुमचे लक्ष वेधून घेतील. मध्याह्नाच्यावेळी उन खात पडलेले भव्य अजगर! या दृश्याला काय उपमा द्यावी? उत्तर भारतात हिवाळ्यातील सकाळ ही धुक्याने झाकोळलेली असते – विशेषकरून भरतपूरमधील – कारण तेथील हवेत आर्द्रतेचे प्रमाण खूप जास्त असते. सहसा इतर जंगलांमध्ये पक्षी निरीक्षक पहाटेच्या थोडेसे आधी सफरीसाठी निघतात परंतु येथे त्यांना आपले वेळापत्रक बदलावे लागते. खर म्हणजे भरतपूरमधील जास्तीतजास्त सकाळी भयंकर थंडी असते. तुमच्या हॉटेल वेटरने बेड टीच्या वेळी दिलेला हा “सल्ला” कि “साहेब घाई करण्याची गरज नाही, सगळे पक्षी दिवसभर तेथेच राहणार आहेत.!!!” खूपच दिलासादायक वाटतो.
एक सस्तन प्राणी जो सापडण्यास कठीण परंतु त्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांना सार्थक ठरवणारा होता, तो म्हणजे भारतीय पाणमांजर. एकदा बोटीने प्रवास करतांना मला हा मुंगुसासारखा दिसणारा प्राणी दिसला, अत्यंत चपळ आणि एक शानदार जलतरणपटू! हा मांसभक्षक प्राणी पाण्याखालील माशांचा पाठलाग करत होता आणि त्याचवेळी पक्ष्यांवरही आपले नशीब आजमावत होता. येथे सापडलेला आणखी एक मायावी म्हणजे फिशिंग कॅट. हा एक छोटा शिकारी आहे – जो या पाणी परिसंस्थेत आपले भक्ष्य अत्यंत कुशलतेने पकडण्यात प्रवीण आहे. येथील वेळूच्या बनात तुम्ही पाहू शकाल असा आणखी एक सुंदर प्राणी आहे उंच सांबर.
येथील सर्व प्राणी आणि पक्ष्यांनी या पाणथळ जागेशी आणि तिच्या बदलणाऱ्या पाणी पातळीशी चांगल्याप्रकारे जुळवून घेतले आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत मार्चपासून जेव्हा स्थलांतर करणारे आपल्या प्रजनन भूमीकडे निघून गेलेले असतात, दलदल वाळण्याची प्रक्रिया सुरु होते. खरतर, राष्ट्रीय उद्यानाच्या व्यवस्थापन योजनेत या पाणथळ जागेचे काही भाग उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडे होऊ देणे नियोजित आहे. पुढे जेव्हा पावसासोबत याभागात पूर येतो तेव्हा डाईक आणि स्लुईस गेटसद्वारे मेन्युअली ज्या दहा विभागांत भरतपूर विभागले गेले आहे त्यांतील पाणी नियंत्रित केले जाते. असे सर्वोत्तम प्रयत्न करूनही दुष्काळाची भीती नेहमीच असते आणि शेतीला अभिजनांच्या आवडीपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाण्याचीही.
फोटो-अनिरुद्ध छावजी
प्रभू रामाचे भाऊ भरत, जे त्यांच्या मागे अयोध्येत राहिले यांच्या नावावरून भरतपूरचे नाव ठेवण्यात आले आहे. अशी आशा केली जाते कि भरतपूरचे अस्तित्व कुठल्यातरी स्वर्गीय आशीर्वादावर, अस्थिर पावसावर किंवा पक्ष्याच्या एखाद्या प्रजातीच्या असण्या आणि नसण्यावरही अवलंबून असू नये. माझ्यासारखा पक्षी निरीक्षक हा जेथेकोठे पक्षी असतील तेथे जातच राहील.
परंतु भरतपूरचे केवलदेव राष्ट्रीय उद्यान एक जागतिक प्रसिद्धीचा पक्षी अधिवास म्हणून आपले अस्तित्त्व तेव्हाच टिकवू शकेल आणि त्याची भरभराटही तेव्हाच होऊ शकेल जेव्हा त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या आजूबाजूला असलेल्या १५ गावांचा सक्रीय सहभाग त्याला लाभेल.   
आशा करूयात कि कधीतरी असा एक दिवस उजाडेल जेव्हा स्थानिक लोकांना सोबत घेऊन वन व्यास्थापानाचे हे प्रयत्न पुढे नेले जातील – या नयनरम्य, भव्य पक्षी अभयारण्यासाठी. तेव्हाच कुठे अनेक संकटग्रस्त प्रजातींसाठी भरतपूर एक सुरक्षित निवासस्थान म्हणून अबाधित राहू शकेल.
=======================================
परीक्षित सूर्यवंशी

                                                suryavanshipd@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा