गिरीश पंजाबी, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी, फोटोग्राफ्स – गिरीश पंजाबी
दक्षिण
महाराष्ट्रातील असे एक क्षेत्र जेथे दुर्मिळ वन्यजीवांचे वास्तव्य आहे, सरकारकडून रबर
लागवडीसाठी आणि खाणींसाठी खुले केले जात आहे....
तो २०१३ मधील मार्च महिना होता. आम्ही एका शोध मोहिमेवर वन्य मांसभक्षक प्राण्यांचे सर्वेक्षण करत होतो. आम्ही तिल्लारी धरणाच्या एका बाजूने चालत होतो तेवढ्यात माझ्या सोबत्याने माझे लक्ष जंगलातील एका मोठ्या “स्क्रेप” कडे (जंगलातील जमिनीचा काही भाग जो नुकताच एका प्राण्याच्या मागील पायांच्या फरपटीने साफ केला गेला होता) वेधले आणि विचारले, “ही वाघाची तर नाही?” ती खरोखर वाघाच्याच स्क्रेपसारखी वाटत होती. मी उत्तेजित झालो होतो. दोनच पाऊले पुढे जात नाहीत तर आम्हाला वाघाची मोठी विष्टा दिसली. “हा एक मोठा वाघ आहे” मी माझ्या सोबत्याला म्हणालो. माझ्याशी सहमत होत त्याने आपली मान हलवली.
 |
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची पाउलखुण |
फोटोग्राफ्स आणि या पुराव्याची माझ्या डेटाशीटवर नोंद घेतल्यानंतर आम्ही डोंगराबरोबर पुढे चालू लागलो. आणखी एक किलोमीटर पुढे गेलो आणि आम्हाला आणखी एक विष्टा दिसली, ती थोडीशी लहान होती, पण खास वाघाच्या विष्टेसारखीच होती. “ही एखाद्या वाघिणीची किंवा छाव्याची असू शकते का?” माझ्या सोबत्याने विचारले. मला खात्री नव्हती म्हणून मी काहीच बोललो नाही फक्त फोटोग्राफ्स घेतले. आम्ही सर्वेक्षण करत असलेल्या या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व असल्याचे मानले जात होते आणि आता तर आमच्याकडे पुरावेही होते.
 |
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची विष्टा |
दुसऱ्या दिवशी आम्ही केंद्रे या तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेलो. येथे पूर्वी एक गाव वसत होते जे नंतर धरणाला जागा करण्यासाठी स्थानांतरीत करण्यात आले. वन विभागाने आयोजित केलेल्या बोटीतून एका तासाच्या सफरीनंतर आम्ही नियोजित ठिकाणी पोहोचलो. आम्ही त्या जलाशयाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. बोटीतून उतरता क्षणीच आम्हाला एक भलामोठा वाघाच्या पायाचा ठसा दिसला, कदाचित एका नर वाघाच्या पायाचा. त्याच्या जवळच एक लहान पाउलखुणही होती, ती कदाचित वाघिणीची किंवा छाव्याची असावी.
मला अत्यानंद झाला होता. या क्षेत्रातील वाघांच्या अस्तित्वाच्या इतक्या प्रबळ पुराव्यांनी मी भारावून गेलो होतो. आमच्यासोबत जो वनपाल आला होता तो म्हणाला, मागील एका भेटी दरम्यान त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला येथे एक वाघाची पाउलखुण दिसली होती आणि बोटीतून एक मोठ्या सुळ्यावाला हत्ती दिसला होता. यातील मजेशीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील ही सर्व क्षेत्रे एकतर राखीव जंगल आहेत किंवा खाजगी मालकीच्या जागा आहेत. ती संरक्षित अभयारण्याचा भाग नाहीत.
 |
नुकत्याच पिल्लांना जन्म दिलेल्या एका मादी बिबट्याचा कॅमेरा-ट्रेप ने घेतलेला फोटो |
हा प्रदेश गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्याशी जोडलेला आहे जेथे वनविभागाला नुकताच कॅमेरा-ट्रॅपने एका वाघाचा फोटो मिळाला आहे. दोडामार्गमधील वझारे गावात २००१ साली एका छाव्यालाही पकडण्यात आले होते. ही क्षेत्रे तलवडे आणि कणकुंबीच्या जंगलांतून कर्नाटकात नवीनच स्थापन झालेल्या भीमगड अभायाराण्याशीही जोडलेली आहेत. वाघ, हत्ती आणि इतर वन्यजीव प्राण्यांच्या योग्य विकासासाठी आवश्यक वातावरण असल्यामुळे एखाद्याला वाटेल कि दक्षिण महाराष्ट्रातील तिल्लारी-चांदगढच्या आजूबाजूचे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य असायला हवे किंवा कमीतकमी कम्युनिटी रिझर्व्ह किंवा संवर्धनासाठी राखीव क्षेत्र तरी असायला हवे. परंतु सरकार मात्र वेगळा विचार करते आहे. त्यांना या क्षेत्रात रबरची लागवड करावयाची आहे आणि खाणी खोदायच्या आहेत! सिंधुदुर्ग जिल्ह्यात रबराचे वेड अभूतपूर्व वाढले आहे. येथील जंगल आणि काजूची शेती हे खाजगी मालकीचे किंवा गावातील समूहांच्या मालकीचे आहेत. परतू येथील जास्तीतजास्त जमीन केरळमधील श्रीमंत व्यावसायिकांनी खरेदी करून घेतली आहे. आणि संपूर्ण डोंगरउताराचा भाग हा रबराच्या एकमेव पिकाने आच्छादून गेला आहे. येथील एक उदाहरण किती भयानक आहे पहा! एका कंपनीकडून ७२० हेक्टर जागेवर रबराची लागवड करण्यात आली आहे ती शिरंगे-मंगेलीमध्ये - जे व्याघ्र अधिवासाच्या अगदी मध्यभागी आहे. एकेकाळी या प्रदेशात जंगल होते. या रबर जागीरींना वायर, जाळी किंवा विद्युत तारींचे कुंपण लावले जाते जे येथील वन्यजीवांना अडथळा निर्माण करते.
 |
रबराच्या शेतीला जंगलापासून पूर्णपणे तोडून टाकण्यासाठी लावलेले जाळ्या आणि काटेरी वायरींचे कुंपण |
 |
रबराच्या जागीरीला जंगलापासून वेगळे करण्यासाठी लावलेले विद्युत तारींचे कुंपण, वन्यजीवांना त्यापासून दूर ठेवते |
या जिल्ह्यातील आणखी एक अभद्र प्रथा म्हणजे धरणाजवळच्या मोठ्या जमिनी रबर लागवडीसाठी विकणे! रबर हे पीक जास्त पाण्याचे म्हणून ओळखले जाते म्हणूनच धरणाजवळची जमीन त्याच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम ठरते. रबर लागवडीमुळे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील जंगलाचा विनाश होतो यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची झीज होते, धरणात गाळ लवकर साचतो आणि त्याची पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. परंतु सरकार व्यावसायिकांना जमीन देण्यात खुश आहे. एका रबर कंपनीची वेबसाईट म्हणते, “या भागात शेतकऱ्यांना रबर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी रबर बोर्ड (रबर लागवडीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची संस्था) ३०,००० रुपयांचे आणि महाराष्ट्र शासन १५,००० रुपयांचे अर्थसहाय्य देते. याव्यतिरिक्त आणखी ४ हजार रुपये पिकाला कुंपण घालण्यासाठी सरकारकडून वेगळे दिले जातात. या भागातील लोक काजू आणि आंब्याच्या शेतीवर जगतात परंतु येथील जास्तीतजास्त जमिनींना कधीच कुंपण घातले जात नाही. सिंधुदुर्गमध्ये फारशा लोकांना रबर लागवड कशी करावी हे माहितही नाही, यामुळे येथील रबराची शेती ही स्थानिक लोकांच्या मालकीची नाहीच. मग सरकार रबर लागवडीला प्रोत्साहन का देऊ पाहत आहे? या भागातील रबर शेती ही पूर्णपणे इतर भागातील व्यावसायिकांच्या मालकीची आहे आणि त्यांच्याकडूनच तिचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाते. खरतर या रबर जागीरींमध्ये काम करणारे जास्तीजास्त श्रमिकही केरळचे आहेत.
 |
पुढे रबराची लागवड आणि पाठीमागे जंगल दिसत आहे |
 |
लक्षपूर्वक पहा, डोंगराच्या एका बाजूवर पूर्णपणे
रबरची लागवड केलेली आहे ते जंगल नाही, हा भाग तिल्लारी धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे |
शेजारच्या कोल्हापूर
जिल्ह्यात हिंदाल्को बॉक्साईटची खाण खोदण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकल्पाचा
पर्यावरण परिणाम मुल्यांकन अहवाल असा दावा करतो कि या प्रदेशात एकही वाघ सापडलेला
नाही. परंतु तो असेही म्हणतो कि तीन दुसरे शेड्यूल १ प्रकारचे प्राणी – गवा, माउस
डीअर आणि अस्वल खाणीसाठी राखून ठेवलेल्या जागेत दिसले आहेत. हा अहवाल या भागात
खाणींना परवानगी दिल्यास येथील अधिवास विनाश होईल आणि वन्यजीव तसेच परिसंस्थेत अस्वस्थता
निर्माण होईल हे मान्य करतो परंतु नंतर असा निष्कर्ष काढतो कि या प्रकल्पामुळे या
प्रदेशाचा “शाश्वत विकास” घडून येईल. शाश्वत विकास म्हणजे नक्की असत तरी काय?
 |
सिंधुदुर्गमधील रबराच्या शेतीजवळील दगडाची खाण |
तिल्लारी-चांदगढ हे
क्षेत्र दंडेली-अंशी व्याघ्र अभयारण्याला राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी जोडणाऱ्या
व्याघ्र कोरीडॉरचा भाग आहे. येथील जंगलात पसरलेल्या काजूच्या शेतांमध्ये सांबर,
एशियायी जंगली कुत्रे, बिबटे इतकेच काय तर वाघसुद्धा फिरतात हे सर्वज्ञात आहे. येथील
लोकांची सामुहिक मालकी असलेल्या जंगलात हॉर्नबिल पक्षी आपले घरटे बांधतो, आणि पाणमांजर
गावातून आणि खाजगी जमिनीतून वाहणाऱ्या प्रवाहांतून पोहते.
ही आहे खरी
शाश्वतता, जेथे सतत विस्फोट होतात अशा खाणी खोदणे आणि रबरासाठी जमिनी नष्ट करणे आणि त्यांना कुंपण घालणे नाही.
तिल्लारी-चांदगढच्या
आजूबाजूचे क्षेत्र कम्युनिटी रिझर्व किंवा संवर्धनासाठी राखीव क्षेत्र म्हणून
घोषित करणे आवश्यक आहे जेथे वन्यजीव प्राण्यांचा आणि स्थानिक लोकांचा जगण्याचा
अधिकार अबाधित राखला जाईल. ते व्यावसायिकांची किंवा खनिजांच्या भुकेल्या कारखानदारांची
जायदाद बनू नये.
गिरीश पंजाबी हे रिसर्चर्स
फॉर वाइल्डलाईफ कन्झर्वेशन आणि वाइल्डलाईफ रिसर्च अॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीशी
संलग्न आहेत. मांसाहारी प्राणी आणि निसर्ग संवर्धनात त्यांची भूमिका हे त्यांच्या
आवडीचे विषय आहेत. या कामासाठी बेंगालुरूमधील सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज यांनी
मदत केली.
===================================
first published in Down To Earth
http://www.downtoearth.org.in/content/tigers-fall-prey-development
परीक्षित सूर्यवंशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा