शनिवार, १८ मार्च, २०१७

गब्बर - एक धैर्यशील योद्धा

डॉ. बिलाल हबीब/डॉ. पराग निगम
अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
त्याच्या जंगलातील दुसऱ्या एका वाघाला त्यानं ललाकारलं. त्या वाघाचं नाव होतं ‘जय’, म्हणून त्यांच्यातील लढाईनंतर, बॉलीवूडच्या कृपेनं याचं नाव पडलं गब्बर!

ग    ब्ब    र  

२०१०च्या शेवटापर्यंत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) हा व्याघ्र संवर्धनातील एक मैलाचा दगड बनला होता. उत्तम संरक्षण, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि साथीला स्थानिकांचे सहकार्य यामुळे ताडोबा-अंधारी महाराष्ट्रातील एक सर्वोत्कृष्ट उद्यान म्हणून नावारूपाला आले होते. वाघांच्या संख्येतील वाढीमुळे पर्यटक आणि छायाचित्रकारांचा जणू पूर आला होता. या सगळ्यात वैज्ञानिकही मागे नव्हते.
आतापर्यंत या क्षेत्रातील वाघांच्या इकोलॉजीवर खूप कमी अभ्यास झाला होता यामुळे २०१२मध्ये महाराष्ट्र वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (नेशनल टायगर कन्झर्वेशन ऑथोरिटी) यांनी वाईल्डलाईफ इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने येथील वाघ आणि इतर सह-भक्षकांच्या दीर्घकालीन निरीक्षणासाठी एक प्रकल्प आखायचे ठरवले. या प्रकल्पाचे एक उद्दिष्ट वाघांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या या भूप्रदेशातील प्रौढ वाघांच्या हालचालींचे पेटर्न्स आणि ते जागेचा वापर कसा करतात यांचा अभ्यास करणे हे होते. या प्रकल्पांतर्गत ५ वाघांना रेडियो कॉलर लावण्याचे निश्चित झाले.
१७ ऑक्टोबर, २०१४ रोजी, ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘छोटी तारा’ या वाघिणीला पहिली कॉलर लावण्यात आली. दोन दिवसांनी आम्ही – लेपर्ड फेस, शेरखान आणि गब्बर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या एका वाघाला कॉलर लावली. त्याची वंशावळ म्हणजे एक गूढच होते. त्याच भागातील दुसऱ्या एका वाघाला त्याने ललकारले. त्या दुसऱ्या वाघाचे नाव ‘अमिताभ’ होते म्हणून त्यांच्यातील झडपेनंतर, बॉलीवूडच्या प्रभावामुळे आपोआपच याचे नाव गब्बर पडले. पर्यटकांच्या वाहनांबरोबर दूरपर्यंत चालत जाणारा हा वाघ चांगलाच धीट होता.
आम्हाला तो बऱ्याचदा ताडोबा तलावाच्या आसपास दिसत असला तरी अभयारण्याच्या बफरपर्यंत पसरलेले त्याचे क्षेत्र बरेच मोठे होते (जवळजवळ १२० – १४० चौ किमी. इतके) ज्यामुळे त्याचा माग ठेवणे जिकरीचे होत असे. एके दिवशी त्याला कॉलर लावण्यात आली. पर्यटकांनी त्याला चितळ रोडकडून ताडोबा तलावाजवळील ताडोबा रेंज ऑफिसकडे जातांना पाहिले. या टप्प्यावर त्याने आपला रस्ता बदलला आणि तो भावे बंधाऱ्याकडून वसंत बंधाऱ्याकडे जायला लागला. हे तेच ठिकाण आहे जेथे त्याला डार्ट मारण्यात आले. यानंतर तो काही अंतरावरील बांबूच्या झाडीत कुदून गेला. श्वास रोखून धरणाऱ्या काही मिनिटांच्या शोधानंतर शेवटी आम्हाला तो सापडला.  
प्रेमाचा बहर
२९ जानेवारी, २०१५ हा जंगलातील कामाचा एक असाच ‘नियमित’ दिवस होता. चिखलवाहित एक मोठा नर सांबर चिखलात लोळत असलेला आम्ही पहिला, तेथून पांढेरपौनीकडे परत येतांना आम्हाला पर्यटकांच्या जिप्सींचे एक टोळके दिसले जे ताडोबातील प्रसिद्ध वाघीण, मायाकडे आकर्षित झाले होते. उद्यान बंद होण्याची वेळ जवळ येत होती त्यामुळे बऱ्याचशा गाड्या या उद्यानाच्या बाहेर जायच्या रस्त्याला लागल्या होत्या.
यामुळे आम्हाला चितळ आणि पेटत्या पळसाच्या झाडांवर बसलेल्या काही वानरांच्या धोक्याची सूचना देणाऱ्या हाकांकडे लक्ष देऊन त्या वाघिणीचा माग घेण्यासाठी आवश्यक ती शांतता लाभली. अचानक धोक्याच्या सूचना येत होत्या त्याच्या थोड्याश्या विरुद्ध दिशेने ती गवतातून बाहेर आली, संध्याकाळच्या मंद प्रकाशात ती रुबाबदार वाघीण आणखीनच उठून दिसत होती. अक्खा दिवस जंगलात काबाडकष्ट केल्यानंतर मिळणारे असे काही क्षणच तुम्हाला विदर्भाच्या रणरणत्या उन्हात काम करत राहण्याचे सामर्थ्य देत असतात. त्या गवतातून ती सहजगतीने चालत आली आणि एका खुल्या जागेत विसावली. दरम्यान, पाणवठ्याजवळील झुडूपांतून धोक्याची सूचना देणारे आवाज येतच होते. त्याचवेळी गब्बरचे कुरणात आगमन झाले.

ग  ब्ब  र    आ णि    मा  या 

मायाला आठवडाभरापूर्वी इतर दोन वाघांबरोबर पाहण्यात आले होते. आम्हाला पक्की खात्री होती कि सध्या बहरात आहे. आम्ही त्यांच्याकडे डोळे लावून बसलो होतो, गब्बर तिच्याकडे गेला आणि तिनेही त्याच्या नाकाला आपले नाक घासून त्याचे स्वागत केले. त्यांचा फॉरप्ले डोळ्यांत साठवून ठेवावा असा होता. पाठलाग करणे, चुंबन घेणे, चावे घेणे, एकमेकांना प्रेमाने पंजे मारणे – हे सर्व भूतलावरील या महान प्राण्यांच्या प्रेमाराधनेतील सर्व विधी. त्यांना त्यांच्या प्रेमाच्या बहराचा आणि हक्काच्या एकांताचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी, त्या ठिकाणी आणखी थोडावेळ शांततेत बसल्यानंतर आम्ही ती जागा सोडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पांढेरपौनीच्या कुरणात गेलो तेथे आम्हाला ती दोघे पुन्हा बरोबर त्याच ठिकाणी दिसली. गब्बर तिच्या बाजूला असा बसला होता जणू जगापासून तिचे संरक्षण करतो आहे. तो थोड्या-थोड्या वेळाने उठत होता, झाडांवर, बांबूच्या पुंजक्यावर आणि गवतावर मुत्राचे फवारे मारत होता, एकदा तर मयानेही असेच केले. पुन्हा एकदा, त्यांच्या वर्तनाच्या निरीक्षणांची नोंद घेऊन आम्ही तेथून पाय काढला.
शत्रुप्रेम
दोन दिवसांनी गब्बरला पाहायला आम्ही पांढेरपौनीला परत आलो, परंतु यावेळी माया कुठेच दिसली नाही. आम्ही त्याच्या मागेमागे जायला लागलो परंतु त्याने फायर लाईनच्या बाजूचा रस्ता धरला जेथे त्याच्या मागे जाणे आम्हाला शक्य नव्हते. बाजूलाच चिताळांचे जोरजोरात ओरडणे सुरु होते परंतु त्याचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते.
रस्त्यावर पुढे तो दिसेल असा अंदाज बांधून आम्ही जवळच्या समांतर रस्त्यावर चालू लागलो. आमचा अंदाज बरोबर ठरला, आम्ही आनंदित झालो. पण हे काय? एक वाघ आमच्याकडे येत होता खरा पण तो गब्बर नव्हता! त्याच्या अंगावरील खुणांवरून तो काला आंबातील ‘घुसखोर’ वाघ असल्याचे समजत होते. आम्हाला आश्चर्य वाटले, ‘तो गब्बरच्या क्षेत्रात काय करतोय?’  
त्यानतंर जे झाले ते म्हणजे या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यासाठी झालेले एक अत्यंत मजेशीर द्वंदयुद्ध! त्या तरुण वाघाने जमिनीवर एका ठिकाणी नख्यांनी ओरखडे मारले आणि तो थोडा पुढे गेला. त्याच्या पाठीमागून येत असलेल्या आणि त्या घुसखोराप्रमाणेच नेमक्या त्याच ठिकाणी ओरखडे मारून मूत्राचा फवारा मारणाऱ्या गब्बरकडे तो मधूनमधून वळून पाहत होता.  
वाघांच्या एका प्राचीन रिवाजाचे साक्षीदार आम्ही बनलो होतो. तो तरुण वाघ रस्त्याच्या कडेला असलेल्या बांबूच्या आणि गरारीच्या (Cleistanthus) झाडांना जाणूनबुजून आपला वास लावत होता आणि नंतर गब्बर त्यांच्यावर पुन्हा आपला वास लावत होता. एका ठिकाणी तर गब्बरने त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या ओरखड्याशेजारी शी पण केली. आमच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची शारीरिक हिंसा न करता क्षेत्राच्या सीमेविषयीचा वाद मिटविण्याचा हा खूपच सभ्य मार्ग होता. परंतु यातील संदेश स्पष्ट होता. तरुण वाघाने शस्त्रे टाकली होती. हे सर्व पाहून चक्रावून गेलेलो आम्ही, आणखी काही अंतरापर्यंत त्यांच्या मागे गेल्यावर आमच्या छावणीत परतलो. वाघांच्या रहस्यमय जीवनाचे आणखी एक दर्शन मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत होतो.
४ फेब्रुवारी रोजी, ऐनबोडीकडे जातांना भरदिवसा, अगदी अनपेक्षितपणे आम्हाला गब्बरचे दर्शन झाले. तो आमच्याकडेच येत होता. दुसऱ्या वयाने लहान वाघाकडून आव्हान दिले गेल्यानंतर ४ दिवसांनी आम्ही त्याला पाहत होतो. परंतु त्याला पाहून झालेला आमचा आनंद क्षणभंगुर ठरला. त्याच्या तोंडातून रक्त पडत होते, त्याचा डावा गाल चेहऱ्यापासून खाली लोंबकळत होता, त्याच्या नाकाला खोल जखमा झाल्या होत्या. त्याचा एक डोळा जवळजवळ दिसत नव्हता. आम्ही विचारात पडलो, काही दिवसांपूर्वी आम्ही पाहिलेला क्षेत्रासाठीचा सभ्य संघर्ष पुढे एका जीवघेण्या लढाईत तर रुपांतरीत झाला नव्हता?
कुतूहलापोटी साधारण एक किलोमीटरपर्यंत आम्ही गब्बरच्या मागे-मागे गेलो, त्याने मोठ्या कष्टाने जमिनीवर आपल्या खुणा केल्या. आम्ही गब्बरला रेडियो कॉलर लावली होती आणि याठिकाणी, हे मान्य केले पाहिजे कि, त्याला तशा जखमी अवस्थेत पाहून आम्ही हादरून गेलो होतो. आधार वाटत होता तो एवढाच कि, आधी झालेल्या घटनांची माहिती असल्यामुळे गब्बर इतक्या गंभीररित्या जखमी कसा झाला याचा उलगडा आम्हाला होऊ शकत होता.
गब्बर रिटर्न्स
कार्यक्षेत्रावर काम करतांना आम्ही वन्यजीव शास्त्रज्ञांनी एक नियम आवर्जून पाळायचा असतो तो म्हणजे नैसर्गिक प्रक्रियांमध्ये ढवळाढवळ न करणे. आम्हाला माहित होते कि वयस्क आणि कमकुवताला त्याच्यापेक्षा तरुण आणि तंदुरुस्तासाठी जागा रिकामी करावीच लागेल. अर्थातच, गब्बरचा स्वतःचा तसा काही विचार नव्हता. जखमी झाल्यानंतर बराच काळ तो अभयारण्याच्या केंद्रातून एकदम गायब झाला. त्याच्या कॉलरमधील जीपीएसनुसार त्याचे ठिकाण हे बफरमध्ये असल्याचे दिसत होते जेथे काही वेळेस आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही केला, यात त्याचे प्रत्यक्ष दर्शन एकदाही होऊ शकले नाही पण कॉलरमधून येणाऱ्या शक्तिशाली सिग्नल्सवरून आम्ही त्याच्या उपस्थितीचा माग घेत राहिलो.

ग   ब्ब   र       रि   ट   र्न्स 

दोन आठवड्यांनी गब्बर पांढेरपौनी कुरणातील ताडोबा तलावाजवळ पुन्हा हजर झाला. सवयीप्रमाणे, तो पर्यटकांच्या वाहनांमधून नेहमीसारखाच बेफिकीरपणे चालत गेला. नाकावरील खोल जखमसोडून बाकी सगळ्या जखमा बऱ्यापैकी भरून येत असल्याचे दिसत होते. जंगलातील झाडाझुडूपांना तोंड (शब्दश:) द्यावे लागत असल्यामुळे ती जखम मात्र आणखी फाटली असावी. तो तलावाकडे जात असतांना आम्ही त्याच्या मागे गेलो, त्याने तलावात उडी मारली, पोहून एका छोट्याश्या बेटावर गेला आणि रात्र होईपर्यंत तेथेच थांबला. त्याच्या या कृतीचे आम्हाला आश्चर्य वाटले. त्या झटापटीनंतर गब्बर आम्हाला बऱ्याचदा या लहानश्या बेटावर बसलेला दिसला. त्याला कदाचित येथे जास्त सुरक्षित वाटत असावे किंवा येथे माश्यांचा त्रास कमी असावा. हळूहळू का असेना, तो बरा होत होता ही गोष्ट मात्र नक्की.
गब्बरच्या कॉलरमध्ये एक्टीव्हिटी सॅन्सर लावलेले होते ज्यामुळे प्रत्येक पाच मिनिटाला आम्ही त्याचा माग घेऊ शकत होतो. त्याने आपला ‘खास इलाका’ सोडला नव्हता पण त्याच्या वापराच्या आपल्या वेळा पूर्णपणे बदलल्या होत्या. जखमी होण्यापूर्वी तो ५.३० ते ९.३० आणि १६.३० ते २०.०० या काळात सर्वाधिक सक्रीय राहत असे. परंतु त्याला क्षतिग्रस्त करणाऱ्या लढाईनंतर त्याने आपली वेळ १०.०० ते १३.०० अशी केली होती. याच काळात त्या क्षेत्रावर आपला हक्क सांगण्यासाठी आक्रमक झालेल्या आणि वेगवेगळ्या जागी खुणा करत असलेल्या इतर वाघांशी संघर्ष टाळण्यासाठी त्याने असे केले असावे.  
गब्बर बरे होण्याची, आपली वेळ येण्याची वाट पाहत होता. त्याच्या कॉलरमध्ये लावलेल्या एक्टीव्हिटी सेन्सरमुळे आम्हाला त्याची रणनीती समजण्यास मोठी मदत झाली. परंतु त्याच्या अशा वागण्यामुळे बराच गोंधळ उडाला. आम्हाला तो कुठे आहे हे माहित असले तरी पर्यटक त्याला पाहू शकत नव्हते आणि यामुळे या काळात बऱ्याच काल्पनिक कथांनाही जन्म दिला गेला.  
त्याच्या जखमांच्या गांभिर्यावरून वादंग उभे राहिले आणि त्याच्या त्रासाचे कारण रेडियो कॉलर असल्याचे आधारहीन आरोपही झाले. एका कल्पनाविलासी तज्ञाने तर त्याच्या एका जखमेत अळ्या झाल्या असून त्या त्याचे मांस खात आहेत असा दावा केला. आम्ही यापैकी कोणत्याही वादात अडकलो नाही आणि कोणावर आरोपही केले नाहीत कारण मुळात हे सगळेजण त्याच वाघाबद्दल चिंता व्यक्त करत होते ज्याची आम्हालाही काळजी होती.
मार्चमधील एका संध्याकाळी गब्बरचा माग घेत असतांना तो पांढेरपौनी येथील पाणवठ्यावर असल्याचे समजले. येथील उंच गवतात त्याला पाहणे अवघड जात होते. आम्ही संध्याकाळपर्यंत वाट पाहिली. तो एक ढगाळलेला दिवस होता. सुरुवातीची रिमझिम आणि नंतर आलेल्या एका क्षणिक जोराच्या फटकाऱ्याने गब्बरला आपली जागा बदलण्यास प्रवृत्त केले. यावेळी पहिल्यांदाच आम्ही त्याची जखम व्यवस्थितरित्या पाहू शकलो. तो खरोखर खूप चांगल्याप्रकारे बरा होत होता. यावेळी घेतलेल्या स्पष्ट छायाचित्राने अळ्यांसंबंधीच्या अफवांना कायमचा विराम दिला.
वैज्ञानिक असल्यामुळे आम्ही तटस्थ असावे अशी अपेक्षा असते, परंतु आम्हीदेखील माणसेच आहोत. आम्हाला ज्याचे एवढे कौतुक वाटत होते तो वाघ बरा झाल्याचे पाहून आम्हीही मनातून आनंदलो होतो. गब्बरसोबत घालवलेली एक रम्य संध्याकाळ लवकरच संपणार होती कारण माया ताडोबा तालावाकडून पांढेरपौनीकडे येतांना दिसत होती. आश्चर्य म्हणजे, आपल्या वयस्क आणि जखमी प्रियकरासोबत तिने पूर्ण दोन दिवस घालवले. आताही ती त्याच्या नाकाला नाक लावत होती आणि अधूनमधून त्याच्या विरूप झालेल्या चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण पंजे मारत होती.
येणाऱ्या काही दिवसांत गब्बरने त्या भागातील आपला दबदबा पुनर्प्रस्थापित केला. पुन्हा तो त्याच्या आवडत्या तलावात अंघोळ करतांना आणि त्याच्या काठावर पोहतांना दिसायला लागला. एखाद्या परीकथेचा वाटावा असा हा रम्य सुखांत आमच्या अभ्यासाला लाभला. हा वाघ सौंदर्य, सामर्थ्य, प्रेम, धैर्य आणि चिकाटीचे प्रतिक बनला होता. खर म्हणजे गब्बरने आम्हाला वाघांकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली – वाघांची संख्या, त्यांच्या क्षेत्रांच्या हद्दी, क्षेत्रांचा ताबा, क्षेत्राच्या शोधात दुसरीकडे जाणे या सर्वांच्या पलीकडे जाऊन या बाबींतील बदलांमुळे वाघांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलांकडे पाहण्याची दृष्टी! वाघांची इकोलॉजी अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी अभ्यासाचा एक चांगला आराखडा, प्रदीर्घ निरीक्षण आणि गब्बरने जी दाखवून दिली तशी प्रचंड इच्छाशक्ती आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
गेल्यावर्षी, मार्च २०१६ मध्ये आम्ही गब्बरची रेडियो कॉलर काढली. ताडोबा तलावाजवळ तो खास गब्बर स्टाईलमध्ये पहुडलेला होता. आम्ही हा लेख लिहित असतांना आजही हा रफ अँड टफ वाघ ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या दिल की धडकन बनलेला आहे आणि पुन्हा एकदा तो मायासोबत प्रियाराधन करतांना दिसतो आहे. त्याच्या सत्तेचा सर्वोच्च काळ आता लोटला असेल, त्याला आपला इलाका बदलावा लागला असेल परंतु तो आजही मैदानातून बाहेर पडलेला नाही.


हा लेख डॉ. बिलाल हबीब, डॉ. पराग निगम, जी. पी. गराड, विनय सिन्हा, ए.एस. कळसकर, जी.पी. नरवणे, पल्लवी घासकडबी, नीलांजन चटर्जी, मधुर दावते आणि अनिलकुमार दशहरे या सर्वांच्या सहकार्यातून लिहिला गेला आहे.