गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

वणवा पेटवणारे आणि वणव्याशी झुंजणारे

- परीक्षित सूर्यवंशी 

वणवा म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या आकाशाला भिडू पाहणाऱ्या आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि त्या आगीत होरपळणारी अनेकानेक झाडे, कीटक आणि प्राणी. या दृश्याने क्षणभर मन कळवळते पण आपण लगेच स्वतःला सावरतो आणि दुसऱ्या कामाला लागतो. याचवेळी आणखी एक घटक मात्र आपल्या डोळ्यांसमोर सहसा येत नाही आणि तो म्हणजे हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेले वन विभागातील कर्मचारी - वनमजूर आणि वन रक्षक. 

वणवा रोखण्याची प्रक्रिया ही वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. ‘Be A Naturalist’ या कोर्स दरम्यान वणवा रोखातांना काय-काय होते याचे वर्णन एका  वन अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळाले आणि या प्रयत्नात सामील असलेल्या प्रत्येकाप्रती मनात आदर निर्माण झाला. जंगलातील वणव्याच्या त्या सर्वस्व गिळंकृत करू पाहणाऱ्या महाकाय ज्वाळांसमोर उभे राहून त्यांना अडवणे हे येरा गबाळ्याचे काम नक्कीच नव्हे. गवत, वृक्ष, लहान-मोठे कीटक, सरपटणारे प्राणी, इतकेच काय रानगव्यासारख्या प्रचंड प्राण्यालाही क्षणात भस्मसात करून टाकणाऱ्या या आगीला विझवणे हे अजून तरी मानवीशक्ती पलीकडचे आव्हान आहे. आपण फक्त ती रोखू शकतो. 

पण ती रोखणेही काय सोपे आहे? तर अजिबात नाही. वणवा आटोक्यात आणण्यासाठी एक फायरलाईन तयार करावी लागते. फायरलाईन म्हणजे जेथे वणवा पेटलेला आहे असा भाग आणि जेथे अजून वणवा पोहोचलेला नाही परंतु लवकरच पोहोचू शकतो असा दुसरा भाग यांना विभागणारा जमिनीचा एक मोकळा पट्टा. हा पट्टा तयार करतांना त्या भागातील सर्व गवत कापून काढावे लागते, त्याचा एका बाजूला ढीग रचावा लागतो आणि पुढे मोकळा पट्टा निर्माण करत जावे लागते. मात्र हे सर्व करावे लागते ते आगीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने कारण आग एकदा पलीकडे गेली की ती थांबता थांबत नाही. अशाप्रकारे न थांबता हे काम करावे लागते, कधी-कधी दोन-दोन, तीन-तीन दिवस आग आटोक्यात येत नाही. अशावेळी एखादा जण अचानक पडतो, काही जण लगेच त्याला वाचवायला धावतात. यावेळी सगळे फक्त एवढीच प्रार्थना करत असतात, तो मरू नये. 

बरं हा संघर्ष सुरु असतो तो कोणत्या परिस्थितीत? वनव्याजवळचं तापमान किती असतं? ते असतं शेकडो डिग्री सेल्सिअस, तिथल्या हवेतील कार्बनडाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाणही प्रचंड असतं. अशावेळी एखादी व्यक्ती कितीही तंदुरुस्त असली तरी ती काही वेळातच गलितगात्र होते. या प्रचंड तापमानात शरीरातील पाण्याचे प्रमाणही झपाट्याने कमी होते आणि मग एकदा तोंडाला पाण्याची केन लावली की माणसे दोन-दोन लिटर पाणी एकाचवेळी पिऊन टाकतात. 

एवढ्या वर्णनावरून वणवा हा काय प्रकार आहे आणि तो आटोक्यात आणतांना कोणते दिव्य पार पाडावे लागते याची थोडीतरी कल्पना तुम्हाला आलीच असेल. आता हा वणवा लागतो कसा? तर जवळजवळ ९९% वेळा तो माणसानेच लावलेला असतो. वणवा लावल्याने गवत लवकर येते या गैरसमजातून, जंगलातून तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांकडून, बिडी-सिगारेट पिऊन बेजबाबदारपणे वाळलेल्या गवतात फेकल्यामुळे किंवा कधी-कधी वन विभागाविरुद्ध सूड भावनेतून वणवा पेटवला जातो. थोडक्यात कोणतेही भक्कम कारण नसतांना काही लोक अत्यंत अविवेकीपणे उभ्या जंगलाला आग लावतात. या आगीत हजारो झाडे, कीटक, प्राणी तडफडून मरतात. काय मिळत असेल त्यांना असे करून? या निष्पाप जीवांचा तळतळाट? 

याविषयी जनजागृतीचे काम वन विभाग आणि काही स्वयंसेवी संस्था करीत आहेत. स्थानिक गुरे चारणाऱ्या लोकांसाठी विविधप्रकारचे उपक्रमही ते राबवीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो आणि जंगलाला आगी लावणाऱ्यांना सद्बुद्धी लाभो! 

अशावेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? आपण प्रत्यक्ष वणवा विझवायला जाऊ शकत नाही, तशी कोणाला अपेक्षाही नाही. परंतु आपण जर जंगलाच्या आसपास राहत असू तर जंगलात अगदी छोटीशीही आग दिसल्यास लगेच वन विभागाला कळवू शकतो, कारण सुरुवातीला क्षुल्लक दिसणाऱ्या आगीचे हा हा म्हणता वणव्यात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही. वणवा पेटलेला असतांना आणि वन विभागातील कर्मचारी तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असतांना आपण त्यांना पाणी आणि खाद्यपदार्थ नेऊन देऊ शकतो, आणखीही काही छोटी-मोठी मदत करू शकतो. याशिवाय आपली निसर्गसंपदा वाचविण्यासाठी ते जीवाचं रान करत असतांना कौतुकाचे आणि आभाराचे चार शब्द त्यांच्यासाठी नक्कीच खर्च करू शकतो. कारण ज्याप्रमाणे आपले शूर सैनिकी देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रंक्षण करत असतात त्याचप्रमाणे हे सैनिक देखील आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या निसर्ग संपदेचे संरक्षण करत असतात. 
@@@@