- विराट सिंग अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
२००२ साली कर्नाटकातून सात हत्ती सिंधुदुर्गमध्ये आले आणि तिथंच स्थायिक झाले!
आतापर्यंत महाराष्ट्र वन विभागाला
हत्तींच्या समस्येला कधीच तोंड द्यावे लागले नव्हते आणि स्थानिकांसाठी तर
हे अगदीच अनपेक्षित (आणि अवांछितही!) अतिथी होते. यामुळे लवकरच मानव-हत्ती
संघर्षाला सुरुवात झाली. अनेक राज्यांनी या समस्येवर उपाय म्हणून बरेच “इंजिनिअरींग सोल्युशन्स” वापरून पाहिले परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. आता या
समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात वन्यजीव
शास्त्रज्ञ, वन विभाग आणि शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी कम्युनिटी बेस्ड अप्रॉचवर
(स्थानिक लोकांना बरोबर घेऊन समस्येवर उपाययोजना करण्याची पद्धत) भर देण्याचे
ठरवले आहे. त्यांचे हे प्रयत्न यशस्वीही होत आहेत.
कर्नाटकच्या हलियाल गावाचे शेतकरी नंदेश पाटील काहीतरी करण्यात गढून गेलेले
दिसताहेत. लाल मिरच्या, तंबाखू आणि इतर काही घटक एकत्रित मिसळून ते एक मिश्रण तयार
काराहेत. याचे काय करणार असे विचारल्यावर ते म्हणाले, हे मिश्रण पेपरमध्ये
गुंडाळून त्याची एक लांब मोळी केली जाईल. मग तीच्यातून धूर निघेल इतपतच आग तिला लावली
जाईल. शिंकत आणि खोकत, पाटील पुढे अभिमानाने म्हणाले, या चुडीने
त्यांच्या शेतातून हत्तींना पळवून लावण्यात त्यांची मोठी मदत केली आहे.
४६ वर्षीय पाटील यांच्याकडे क्यातन्गेरा (Kyatangera) गावात १० एकर जमीन आहे
ज्यावर ते ऊस आणि भाताची शेती करतात. आपल्या वार्षिक स्थलांतरा दरम्यान हत्तींना या
पिकांवर ताव मारायला खूप आवडते. हत्तींपासून आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी पाटील यांनी
केलेल्या अशा उपायांकडे आता कम्युनिटी बेस्ड कॉन्फ्लीक्ट मेनेजमेंट अथवा सीबीसीएम
(लोकसमूहाधारित संघर्ष व्यवस्थापन) मॉडेलची एक यशोगाथा म्हणून पाहिले जाते. वाईल्डलाईफ
रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटीद्वारे (WRCS) हे मॉडेल सध्या उत्तर कन्नड भागात राबविले
जात आहे.
स्थानिकांशी संवाद आणि त्यांचा सहभाग
WRCS २०११ पासून उत्तर कन्नड भागात हत्तींकडून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना
पीक संरक्षणासाठी कमी खर्चाच्या आणि सोप्या उपायांचे प्रशिक्षण देत आहे आणि या पद्धतीचे सकारात्मक
परिणामही आता दिसायला लागले आहेत अशी माहिती वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या
कार्यकारी संचालक, डॉ.प्राची मेहता यांनी दिली.
डॉ.प्राची मेहता, वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या कार्यकारी संचालक
महाराष्ट्र आणि त्यासारख्या इतर राज्यांनी हत्ती रोधक खंदके
(एलिफंट प्रुफ ट्रेन्चेस), सौरशक्तीभारीत कुंपणे (सोलार पावर्ड फेन्सेस) यांसारखी
‘इंजिनिअरींग सोल्युशन्स’ वापरून पाहिली परंतु ती अगदीच कुचकामी ठरली. वन विभागाने
हे समजून घेतले पाहिजे कि येथे त्यांना पाच किलोचा मेंदू असलेल्या एका अत्यंत
बुद्धिमान प्राण्याचा सामना करायचा आहे. यामुळे त्यांनी आपल्या दृष्टीकोनात बदल
करावा आणि आपल्या प्रयत्नांत स्थानिक लोकांना
सामावून घ्यावे यावर आम्ही भर देत आहोत.
सीबीसीएम पद्धत आफ्रिकेत व्यापक प्रमाणावर राबविली गेली आणि तेथे तिला मोठे
यशही मिळाले आहे असेही मेहता सांगतात.
WRCSच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे कि या अडथळ्यांनी (इपीएफ, एसपीएफ
इत्यादी) आपली परिणामकारकता दुसऱ्याच वर्षी गमावली होती. याबाबतच पुढे बोलतांना
मेहता म्हणाल्या, “देशभरात असे उपाय अयशस्वी होत असतांनाच, प्राण्यांना पकडा आणि
काढा किंवा पकडा आणि दुसरीकडे नेऊन सोडा हा पुढचा उपाय सुचवण्यात आला. जीवशास्त्रज्ञांच्या
अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि या पद्धती अवैज्ञानिक तर आहेतच परंतु त्याचबरोबर
त्या अयशस्वीही आहेत.” परंतु मेहता यांना याहीपेक्षा मोठ्या चिंतेची बाब वाटते ती
ही कि काही राज्यांनी हत्तींना व्हर्मिन (अपायकारक कीटक/प्राणी) घोषित केले जावे
आणि त्यांचा “नायनाट” केला जावा अशी मागणी केली आहे.
त्यांच्या मते, सिंचन सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे ऊस आणि भात या पिकांखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जंगलांवर अतिक्रमण
होत आहे आणि या बाबींचा एकंदर कल पाहता भविष्यात उत्तर कन्नडमध्ये मनुष्य-हत्ती संघर्षात
वाढ होईल असेच दिसते.
“हत्ती आणि माणसांना जर एकत्र राहायचे असेल तर एकमेकांची उपस्थिती आणि क्रियाकलापांचे
दुष्परिणाम कमीतकमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही
सीबीसीएम ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. जी स्थानिक लोकांना
हत्तींपासून होणारे पिकांचे नुकसान कमी करण्यास आणि परिणामकारक संरक्षण पद्धती उभारण्यास
सक्षम करते.” मेहता सांगतात. सीबीसीएम मॉडेल अजूनही भारतात लोकप्रिय झालेले नाही
हे मान्य करतांनाच त्या हे ही सांगतात कि या प्रकल्पाच्या माध्यमातून अल्प
खर्चाच्या आणि सोप्या उपायांनी पिकांचे संरक्षण कसे करता येते याची उदाहरणेही ते
स्थानिक लोकांसमोर ठेवत आहेत.
“हत्तींना शेतात घुसण्यापासून परावृत्त करण्यासाठी रात्रीचा पहारा, दारावरची
घंटी, मिरचीचा धूर यांसारख्या प्रतिबंधक उपायांचा
वापर केला जातो. एवढे करूनही जर ते घुसलेच तर परिणामकारक अशा विकर्षक (रीपेलंट) उपायांद्वारे
त्यांना पळवून लावले जाते.” मेहता पुढे म्हणतात, परंतु हे उपायही परिपूर्ण नाहीत
आणि यातही एकापेक्षा जास्त उपायांचा मेळ घालून वापर करणे आवश्यक ठरते कारण हत्ती शीघ्रशिके
(पटकन शिकणारे) असतात. असे असले तरी या पद्धतींचा वापर करणारे शेतकरी आपले ७५% पिक
वाचवण्यात यशस्वी ठरले आहेत.
सीबीसीएम पद्धतींच्या फायद्यांकडे पाहतांनाच तिच्यासमोरील आव्हानांकडे
दुर्लक्ष करून चालणार नाही याकडे लक्ष वेधत मेहता म्हणाल्या, “शेतकऱ्यांचा या
पद्धतीवर सहजासहजी विश्वास बसत नाही. खरतरं, २०११ मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली
तेव्हा आम्हला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. शेतकरी आमची आणि
आमच्या कल्पनांची टिंगल करीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना या समस्येवर
त्वरित समाधान हवे असते आणि शासनाने किंवा वन विभागाने ती निरसावी अशी त्यांची
अपेक्षा असते.”
साधने : दारावरची घंटी, मिरची आणि फटाके
क्यातेन्गेराचे पाटील काही प्रमाणात नासधूस झालेल्या आपल्या ऊसाच्या
पिकाचे २०१५ मधील एक छायाचित्र दाखवत, हसत सांगतात, कि त्यांनी फक्त फटाके आणि
मिरचीचा धूर वापरून आपले ७०% पिक वाचवले.
पाटील यांच्यासारख्याच येल्लापुर आणि हलियाल फॉरेस्ट डिव्हिजन मधील १२ गावातील
५०० शेतकऱ्यांच्या शेतातही अगदी ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत हत्ती घुसखोरी करतात.
या सर्वांनी मिळून एक पिक संरक्षण समिती स्थापन केली आहे. WRCS त्यांना आपल्या
पिकाचे संरक्षण करण्यास प्रोत्साहित करते आणि दारावरची बेलवापरून ट्रीप अलार्म
बनवणे, मिरचीचे मिश्रण, फटाके आणि फिरते आगीचे गोळे बनवून वापरण्याचे प्रशिक्षणही
देते.
क्यातेन्गेराच्या गावकऱ्यांना हत्तींचा कळप येत असल्याची
माहिती १०-१५ दिवसांपूर्वीच वनविभागाकडून दिली जाते. माहिती मिळताच पिक संरक्षण
समिती सक्रीय होते आणि आधीच ठरल्याप्रमाणे कामांना सुरुवात करते. तिचे पहिले काम रात्रीच्या
वेळी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी शेतांच्या आसपास झाडांवर मचाण उभारणे हे असते.
सीबीसीएमसाठीचे WRCSचे प्रकल्प अधिकारी रवी येल्लापुर यांनी ही पूर्वसूचना
पद्धत समजावून सांगितली. हत्ती सहसा रात्रीच्यावेळी शेतात घुसतात म्हणून मग अनेक प्रयोगांती
त्यांनी शेतकऱ्यांना अलार्म बेल बसवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यात “एका
नायलॉनच्या दोरीला बाजारात मिळणारी, बेटरीवर चालणारी एक साधी दारावरची
घंटी जोडली जाते आणि संपूर्ण शेताला या दोरीचे कुंपण घातले जाते. हत्तींनी शेतात
घुसण्याचा प्रयत्न केला कि दोरी ओढली जाऊन लगेच घंटी मोठ्या आवाजात वाजायला लागते.
यामुळे हत्ती गोंधळून जातात आणि शेतकरीही सावध होतात.”
शेतकऱ्यांच्या आवडीची आणखी एक पद्धत म्हणजे मिरचीयुक्त दोरी! हत्तींना तयार
किंवा कापणी केलेल्या पिकांचा वास येतो. त्यांना पिकापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी
हिरवी मिरची आणि तंबाखू यांच्या लगद्यात भिजवलेली दोरी पिकाच्या चोहीकडून
गुंडाळतात.
एक शेतकरी म्हणतो, “आम्ही मिरचीचे धुडकेही बनवतो. मिरची आणि
तंबाखूच्या याच लगद्यात थोडे खराब इंजिन ऑईल कालवून ते कापडावर लावले जाते. असे
कापडाचे तुकडे शेताच्या कुंपणावर लावले जातात. हत्तींना या वासाचा फारच तिटकारा आहे
आणि यामुळे पिकाचा वासही दाबला जातो.”
एवढे करूनही हत्ती शेतात घुसलेच तर शेतकरी मिरचीपासूनच बनवलेल्या अनेक प्रतिबंधकांचा
वापर करतात जे त्यांनी हत्ती येण्याआधी महिन्याभरापूर्वीच बनवून ठेवलेले असतात. पाटील
यांनी यातलाच आणखी एक प्रकार सांगितला, “लाल मिरच्या, तंबाखू आणि नारळाच्या
शेंड्या गवत आणि पेपरात गुंडाळून सधारण १० फुट लांबीची एक “चुडी” तयार केली
जाते जी हळूहळू जळण्यासाठी शेताच्या कुंपणावर लटकावून ठेवतात. तिच्यातून निघणारा मिरची
आणि तंबाखूयुक्त झणझणीत वास हत्तींना अगदी जेरीस आणतो.”
प्रशिक्षित शेतकरी हत्तींना घाबरवण्यासाठी गलोलीतून त्यांच्या दिशेने मोठ्या
आवाजाचे फटाके फेकण्याचा प्रयोगही करतात. मात्र, यावेळी कोणत्याही हत्तीच्या अंगावर
फटाका पडणार नाही याची काळजी घेतली जाते. आणखी एक युक्ती म्हणजे फिरता आगीचा गोळा.
चिंध्यांपासून बनवलेला एक कापडी गोळा केरोसीनमध्ये बुडवून एका लांब साखळीला बांधला
जातो. मग या गोळ्याला आग लावून तो गोल गोल फिरवला जातो. फिरतांना तो सूंsss सूंsss
असा आवाज करतो ज्यामुळे हत्ती पळून जातात असे येल्लापुर यांनी सांगितले. त्यांनी
आपल्या वन विभागातील कर्मचाऱ्यांनाही हा गोळा फिरवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
येल्लापुर यांनी शेतकऱ्यांना या पद्धती शिकवण्यासाठी आम्ही बराच वेळ देत
असल्याचे आणि त्यांच्या नुकसानीत झालेली घट पाहून त्यांचाही या मॉडेलवर विश्वास बसला
असल्याचे सांगितले. त्यांनीच पुढे यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील कमी खाणाऱ्या आणि
जास्त नासधूस करणाऱ्या या “सभ्य दिग्गजांबद्दलची” शत्रुत्वाची भावना कमी झाली असल्याचेही
नमूद केले.
असे असले तरी, WRCSचे सदस्य मान्य करतात कि सीबीसीएम मॉडेलही काही १००% खात्रीचा
रामबाण उपाय नाही. हत्तींना पळवून लावण्यासाठी एकच उपाय वारंवार करता येत नाही
कारण त्यांनाही त्याची सवय होते आणि मग ते त्याला भिक घालेनासे होतात. यावर
वन्यजीव शास्त्रज्ञ आणि WRCSच्या कार्यकारी संचालक डॉ. प्राची मेहता यांनी “हत्तींना
आश्चर्याचा धक्का बसत राहणे आवश्यक असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना या उपायांचा चाणाक्षपणे
वापर करण्याचे आणि वेगवेगळ्या उपायांचे मिश्रण करण्याचे प्रशिक्षण देत आहोत.” असे
सांगितले.
मधमाश्यांचे सुरक्षाकवच
भूतलावरील सगळ्यात मोठा प्राणी लहानश्या माशीला घाबरतो हे पाहून उत्तर कन्नडमधील
शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या चोहीकडून मधमाश्यांचे पोळे लावायला सुरुवात केली आहे.
WRCSही यावर प्रगोग करत आहे. सुरुवातीच्या थोड्या यशाने हुरूप वाढल्याने आता
मातीचे भांडे, बांबू आणि लाकडाच्या ओंडक्यांत कमी खर्चाचे मधमाश्याचे पोळे बनवणायचे
प्रयत्न सुरु आहेत. जे या अगडबंबांना शेतापासून दूर ठेवतीलच सोबतच शेतकऱ्यांना
मधापासून आर्थिक लाभही मिळवून देतील.
केनियातील सेव्ह द एलिफंट (एसटीई) आणि एलिफंट अँड बीझ प्रकल्पाच्या प्रमुख
डॉ.ल्युसी किंग यांच्याशी २००९ मध्ये झालेल्या भेटीने डॉ. प्राची मेहता यांना या
कामाची प्रेरणा दिली. याचबरोबर डॉ. किंग यांनी त्यांना भारतात प्रयोगासाठी
मधमाश्यांचा आवाज असलेल्या ऑडियो क्लिप्सही दिल्या.
कर्नाटकात आल्यावर शिमोगा येथील शिबिरात मेहता यांनी मधमाश्यांच्या गणगणाटाचा
हत्तींवर काय परिणाम होतो याची चाचणी घ्यायला सुरुवात केली. यात त्यांना हत्ती
खरंच या आवाजाला घाबरत असल्याचे दिसून आले. “जंगली हत्तींच्या कळपावर याचा काय
परिणाम होतो हेही आम्हाला पाहायचे होते म्हणून आम्ही एका शेतात घुसलेल्या जंगली
हत्तींच्या कळपावर हा प्रयोग केला. हा आवाज ऐकल्याबरोबर ते पळून गेले. हे पाहून
आम्हालाही आश्चर्य वाटले. परंतु या अत्यंत चाणाक्ष प्राण्याला हा आवाज म्हणजे नुसतीच
पोकळ धमकी असल्याचे लवकरच कळणार हेही आम्हाला जाणवलं म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या
पोळ्यांचे कुंपण आपल्या शेताला घालावे यासाठी त्यांना प्रेरित करायला सुरुवात
केली.”
मधमाश्यांच्या पोळ्यांचे कुंपण
एक सारख्या अंतरावर मधमाश्यांचे (इंडिअन हनी बी) पोळे शेताच्या परीघावर लावले
जातात. त्यांना एका दोरीने जोडलेले असते. “हत्तींनी शेतात प्रेवेश करण्याचा
प्रयत्न केला कि पोळे हलतात आणि त्यातून मधमाश्यांच्या झुंडी बाहेर पडतात आणि
हत्ती घाबरून पळ काढतात.” मेहता यांनी सांगितले.
लाकडाचे ओंडके आणि मातीच्या भाड्यांत मधमाश्यांचे पोळे लवकर कसे तयार होईल
यासाठी WRCS मधुमक्षिका पालकांशीही संवाद साधत आहे. “आमच्या या उपक्रमाला यश मिळत
आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियाही आमचा उत्साह
वाढवत आहेत. परंतु काळजी एवढीच आहे मधमाश्यांचे पोळे अस्वलांना तसेच चोरांनाही
आकर्षित करू शकते म्हणून त्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष जाणार नाही अशा पद्धतीने
ते बनवणे आवश्यक आहे.”
महा वनरक्षकांचा कार्यशाळेत सहभाग
कोल्हापूर डिव्हिजनच्या “हत्तींचा उपद्रव” असलेल्या आजरा रेंजमध्ये सेवा देत असलेले
आणि महाराष्ट्र वन विभागात वर्षभरापूर्वीच भरती झालेले वन रक्षक सुनील कुरी यांना आपल्या
खात्यातील सहकाऱ्यांनाच नव्हे तर शेतकऱ्यांनाही या महाकाय परंतु सभ्य अशा प्राण्यांना
दूर ठेवण्यासाठी कमी खर्चाचे उपाय आहेत हे पटवून द्यायचे आहे.
WRCSने कर्नाटकातील काली व्याघ्र अभयारण्यात घेतलेल्या कार्यशाळेत कोल्हापूर
तसेच सावंतवाडीच्या इतर आठ वन रक्षकांबरोबर कुरी हे सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी
सर्वांनी हत्तींना शेतांपासुन दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर विचारविनिमय केला.
याचबरोबर विविध प्रतिबंधकांच्या चागंल्या वाईट परिणामांवरही चर्चा झाली.
“माझी पहिलीच पोस्टिंग अशा ठिकाणी आहे जिथे मोठ्या प्रमाणावर मानव-हत्ती
संघर्ष आहे. या कार्यशाळेने मला हत्तींच्या बायोलॉजीबरोबरच स्थानिक लोकांना सहभागी
करून साधे परंतु परिणामकारक उपाय कसे योजता येतील हेही समजावून सांगितले.
वन रक्षक चंद्रकांत पावसकर गेल्या १३ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात काम
करत आहेत. यातील ७ वर्ष त्यांनी चंदगढ सारख्या खूप जास्त मानव-हत्ती संघर्ष
असलेल्या क्षेत्रात घालवली आहेत. मिरचीच्या धुरासारखे काही कमी खर्चाचे उपाय ते
वापरत असल्याचे त्यांनी सांगितले परंतु खरी समस्या ही स्थानिकांकडून मिळणाऱ्या
सहकार्याचा अभाव ही आहे. “सर्वकाही वन विभागानेच करावे अशी लोकांची अपेक्षा असते”
असे ते म्हणाले.
याचवेळी मेहता एक सावधगिरीचा इशारा देतात. “गेल्या काही वर्षांत दोडामार्ग आणि
सावंतवाडीच्या काही शेतकऱ्यांनी खाजगी जंगलातील आपल्या जमिनी केरळ आणि
तामिळनाडूतील लोकांना कवडीमोल भावाने विकून टाकल्या आहेत. या मोठ्या प्रमाणावर
लागवड करणाऱ्या लोकांनी आता जंगले साफ करून त्याठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर ऑईल
पाल्म, रबर, नारळ आणि केळीची लागवड करायला सुरुवात केली आहे. जमिनीचा असा वापर
टाळला पाहिजे”
“आम्हाला आशा आहे कि महाराष्ट्र वन विभाग हलियाल आणि येल्लापुर सारख्या गावात
होत असलेल्या कामापासून प्रेरणा घेईल. त्याठिकाणी यांच्या तुलनेने खूप जास्त
संघर्ष आहे तरीही तेथे स्थानिक लोकांच्या सोबतीने काम केले जात आहे.” पुढे मेहता हे
सीबीसीएम मॉडेल महाराष्ट्रातीलही अनेक गावांमध्ये सहज राबविले जाऊ शकते असेही
म्हणाल्या.
@@@@@@
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा