बुधवार, २५ जुलै, २०१८

पुण्यातील टेकड्यांचे भविष्य – माळरान की वनराई


-          प्रियंका रुणवाल आणि आशिष नेर्लेकर
अनुवाद
- परीक्षित सूर्यवंशी (suryavanshipd@gmail.com)
झपाट्याने पसरत चाललेल्या शहराच्या मध्यभागी असलेल्या या जागा म्हणजे जॉगर्स आणि निसर्गप्रेमींसाठी जणू मोकळा श्वासच.
पुण्याची वेताळ टेकडी आणि पर्वती टेकडी. छायाचित्र सौजन्य: आशिष नेर्लेकर
१९७१ साली पुण्याच्या टेकड्यांचा उल्लेख करत विल्सन कॉलेज, बॉम्बे (आताची मुंबई) येथील बॉटनिस्ट मॉझेस म्हणतात, “(वनस्पती) संग्राहक आणि वर्गीकीतज्ञांकडून(टेक्सोनोमिस्ट) इतके महत्त्व लाभलेली जागा पुण्याजवळील टेकड्यांशिवाय मुंबई प्रांतात दुसरी नाही.” 
या टेकड्या पुणेकरांना वेताळ टेकडी आणि पर्वती टेकडी म्हणून परिचित आहेत. झपाट्याने वाढत चाललेल्या शहरातील या जागा म्हणजे जॉगर्स आणि निसर्गप्रेमींसाठी जणू मोकळा श्वासच. या जागांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा जिव्हाळा आणि प्रचंड अभिमान आहे. म्हणूनच या टेकड्यांचे वर्तमान आणि भविष्य ठरविण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 
उदाहरणार्थ, या टेकड्यांना कापून जाणाऱ्या पौड-बालभारती लिंक रोडला नागरिकांनी केलेल्या जोरदार विरोधामुळेच पुणे महानगरपालिकेला या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा लागला. याचप्रमाणे टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सीमा ठरवण्यासाठी कॉंक्रीट भिंती उभारण्याच्या वन विभागाच्या योजनेलाही तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. याशिवाय, टेकड्यांवरील प्रतिबंधित प्रवेश, तेथील परिस्थितीकी आणि जैवविविधतेचा नाश तसेच एका नागरी समूहाकडून राबविण्यात आलेले वनीकरण उपक्रम, हे सर्वच येथे वादाचे मुद्दे ठरले आहेत.

पुण्यातील टेकड्यांच्या वनीकरणाचा इतिहास
या टेकड्यांच्या वनीकरणाचे प्रयत्न काही आजकाल सुरु झालेले नाहीत. याचा पुरावा सापडतो तो मुंबई प्रांतातील विभागीय वन अधिकारी ई.ए. गार्लंड आणि मुंबई सरकारचे आर्थिक वनस्पतीशास्त्रज्ञ, डब्ल्यू बर्न्स यांच्यातील संवादात... “या भागात (भांबुर्डा-वेताळ टेकडी) १८७९ साली वनीकरण करण्यात आले... साग आणि चंदन लागवडीचे काही प्रयोग अधूनमधून झाले असावेत, परंतु अशा कामांच्या कोणत्याही (पूर्व)नोंदी उपलब्ध नाहीत आणि सध्याचा साठा पाहता या वनीकरणातून फारसे काही साध्य झाल्याचेही दिसत नाही.” 
ब्रिटीशांच्या या अयशस्वी प्रयत्नांची जागा पुढे वनविभागाने घेतली. वनविभागाच्या १९५० मधील एकसुरी वृक्षलागवडीचा परिणाम म्हणून १९६४पर्यंत वेताळ टेकडीवर गिरिपुष्प (Gliricidia sepium) या विदेशी झाडाची दाट राई निर्माण झाली. १९७३साली पर्वती टेकडीवरही वनविभागाकडून मुख्यत्वे विदेशी तसेच काही देशी झाडांची लागवड करण्यात आल्याच्या नोंदी सापडतात.
ब्रिटीश हे लाकूड उत्पादन या एकमेव उद्देशाने वृक्षलागवड करीत. स्वातंत्र्योत्तर काळात तिचे रुपांतर मृदापोषक, सरपण आणि चारा देणाऱ्या वृक्षलागवडीत झाल्याचे दिसून येते. त्याही पुढे १९७० नंतर हा कल, वनीकरण प्रदर्शन आणि नागरिकांच्या करमणुकीसाठी उद्याने विकसित करण्याकडे झुकत गेल्याचे दिसते.
वनस्पतीशास्त्रज्ञ आणि उद्यानशास्त्रज्ञांच्या सुरुवातीच्या प्रकाशनांत या प्रयत्नांकडे यशोगाथा म्हणून पाहिले गेले. “मुळच्या उजाड टेकडीचे रूपांतर एका सुंदर निसर्गोद्यान झाले आहे.” अशा वाक्यांतून हे सिद्ध होते. 
परंतु या हस्ताक्षेपांपूर्वी या टेकड्यांचे “मूळ” स्वरूप कसे होते याबद्दल कितीपत माहिती उपलब्ध आहे? खरं म्हणजे बरीचशी. 


एकसुरी वृक्षलागवडीपूर्वीचा काळ

या टेकडीवर तुरळक आणि शुष्क परिस्थितीत वाढू शकणाऱ्या वनस्पती (xerophytic) असल्याची टिप्पणी मॉझेस एझिकेलने १९१७मध्ये करून ठेवलेली आहे. त्याने या ठिकाणी निवडूंगासारख्या वनस्पती, पानझडी झुडुपे आणि वृक्ष, गवत तसेच अल्पजीवी वनस्पती असल्याची नोंदही केलेली आहे. भांबुर्डा-वेताळ टेकडीच्या संदर्भात बर्न्स १९३१ साली लिहितात, “येथील झाडांदरम्यान बरेच अंतर असल्यामुळे त्यांच्यामध्ये गवताच्या वाढीला भरपूर वाव मिळतो.”
येथे असलेल्या झाडांतसाधारणपणे साळई (Boswellia serrata), धावडा (Anogeissus latifolia), मोई/शिमटी (Lannea coromandelica), ऐन(Terminalia tomentosa), गणेरी (Cochlospermum religiosum) आणि बिजा/बिबळा (Pterocarpus marsupium) यांचा समावेश होतो.

१९२६ साली वेताळ टेकडीच्या (भांबुर्डा) आसपास असलेली वैशिष्ट्यपूर्ण गवताळ वनस्पती. सौजन्य: बर्न्स १९३१
वरील छायाचित्राततुरळक खुरटी झाडे आणि झुडुपांच्या खाली पसरलेले गवत स्पष्टपणे दिसत आहे. यातून हेही स्पष्ट होते की या विशिष्ट गवताळ परिसंस्था आहेत, ज्याठिकाणी झाडे-झुडुपे ही गवताळ पट्ट्यात विखुरलेली असतात. ती दाट जंगलांसारखे वृक्षाच्छादन तयार करीत नाहीत.

शिवाय, येथील सांस्कृतिक पुरावेही पूर्वी येथे गवत-प्रधान परिसंस्था होत्या हेच सिद्ध करतात. या ठिकाणी सापडलेल्या सूक्ष्मशिला(microlithis) – धनगर वापरत असलेली दगडी हत्यारे – गेल्या २,०००-३,००० वर्षांपासून या टेकड्यांचा वापर गुरे चारण्यासाठी होत असल्याचे दर्शवून देतो. तसेच वेताळ टेकडी आणि तिच्या आसपासच्या टेकड्यांवरील म्हसोबा, खंडोबा आणि वेताळ या पशुपालक दैवतांची मंदिरेही पुन्हा हाच संबंध अधोरेखित करतात.

ब्रिटीशकालीन वनाधिकारी गवतापेक्षा झाडांना जास्त महत्त्व देत आणि गुरचराईमुळे वनीकरणात अडथळे येत असल्याचे मानत. निसर्गतः विरळ झाडे असलेल्या परीसंस्थांपेक्षा दाट झाडी असलेल्या जंगलांना जास्त महत्त्व देण्याची हीच मानसिकता आजही आपल्या शासकीय यंत्रणेत दिसून दिसते, निश्चितपणे ती तेथूनच झिरपत आलेली आहे.

परंतु ही मानसिकता काही वनविभागापुरती मर्यादित राहिलेली नसून आताशा ती सर्वत्रच दिसते आहे. वृक्षलागवड हे आजकालच्या पर्यावरणीय चळवळींचे, मुख्यत्वे वातावरण बदलाशी (climate change) लढण्याचे, प्रमुख हत्यार बनले आहे.

हरितीकरणाचे ध्येय
गेल्या दशकात, अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरी समूहांच्या नेतृत्त्वाखाली पुण्याच्या टेकड्यांवर वनीकरण करण्याची एक नवी लाट आली आहे. यात मुख्यत्वे ज्या वृक्षांची निवड केली गेली त्यांची यादी अशाच एका गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. (पाहा येथे, येथे आणि येथे).

यातील काही मूळ भारतीय तर काही गिरिपुष्प (Gliricidia sepium) आणि सुबाभूळ (Leucaena leucocephala) यांसारख्या विदेशी प्रजाती आहेत. ज्यातील दुसरी (सुबाभूळ) ही जगातील सर्वाधिक आक्रमक प्रजातींपैकी एक मानली जाते.
करंज (Pongamia pinnata) लागवडीसाठी बाणेर-पाषाण टेकडीवर खोदण्यात आलेले सलग समतल चर. सौजन्य: आशिष नेर्लेकर


लॉ कॉलेज टेकडीवर खैराच्या (Acacia catechu) झाडांदरम्यान खननयंत्राद्वारे खोदण्यात आलेले खड्डे. सौजन्य: आशिष नेर्लेकर
उपरोक्त बाबींच्या शीघ्र विश्लेषणातूनकाही गोष्टी स्पष्ट होतात: 

1. या टेकड्यांना अधिकाधिक हिरव्यागार करणे हे अशा उपक्रमांचे सगळ्यात पहले उद्दिष्ट आहे.
2. वृक्ष लागवडीसाठी लागणारा निधी आणि या कार्यावर श्रद्धा असलेल्या, सदाशयी लोकांचा स्वयंस्फूर्त सहभाग - या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत.
3. वृक्षलागवडीसाठी मुळच्या प्रजाती निवडणे हे पर्यावरणीयदृष्ट्या चांगले आहे ही समज या लोकांमध्ये आहे. परंतु सध्या ते ज्या प्रजातींची लागवड करीत आहेत त्यांचे या टेकड्यांवर निसर्गतः उगवणाऱ्या प्रजातींशी अत्यल्प साम्य दिसून येते.

अशाप्रकारचे उपक्रम या परिसंस्थेच्या मुलभूत स्वरुपात बदल घडवून आणत आहेत, अर्थात तिचे विरळ वृक्ष आणि गवत यांच्या मिश्र परिसंस्थेतून दाटवनात रुपांतर करीत आहेत आणि या बदलांमुळे सध्या अस्तित्त्वात असलेली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. उदाहरणार्थ, १९९१ ते १९९७ दरम्यान येथे झालेल्या वनस्पती सर्वेक्षणांच्या अभ्यासातून येथील ७२ मूळ प्रजाती नामशेष झाल्याचे आढळून आले. ज्यात प्रामुख्याने कंदवर्गीय वनस्पती (दीपकाडी-Dipcadi montanum, खर्चुडी-Ceropegia bulbosa, शेपूट-हबेअमरी-Habenaria longicalcarata इत्यादी) आणि काही पानझडी वृक्षांचा (मोखा-Schrebera swietenioides, काकड-Garuga pinnata, चारोळी-Buchanania lanzan इत्यादी) समावेश होतो.


मोखा (Schrebera sweitenioides)-१९०२ आणि किर्कुंडी (Jatropha nana)-१८७८ यांचे वेताळ-चतुःशृंगी टेकड्यांवरून गोळा करण्यात आलेले नमुने. येथून त्यांचा सातत्याने ऱ्हास होत चालल्याचे दिसत आहे. सौजन्य: फर्ग्युसन कॉलेज, पुणे आणि रॉयल बॉटनिकल गार्डन, कीव.
उपरोक्तपैकी काही प्रजातींची वाढ सावलीत चांगल्याप्रकारे होत नसून त्यांना स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते हे देखील आता स्पष्ट झाले आले आहे. याचबरोबर, समतल चरांसारख्या उपक्रमांमुळे मातीच्या सर्वोच्च थराला उपद्रव होतो आणि उथळ मातीत वाढणाऱ्या प्रजातींचा (उदा. कंदवर्गीय वनस्पती, गवत) नाश ओढवू शकतो तसेच भविष्यात उगवू शकणाऱ्या वानिस्पतींच्या बियादेखील यामुळे नष्ट होतात.
पुण्यातील टेकड्यांचे भविष्य 
या टेकड्यांच्या उद्धाराचा हा असा दृष्टीकोन - विरळ आणि खुरटी झाडे असलेल्या परिसंस्था या ‘जंगल’ नसल्यामुळे ‘उजाड’ आणि ‘नापीक’ असतात, याकल्पनेतून पुढे आलेला असण्याची शक्यता आहे. परंतु ऐतिहासिक पुराव्यांतून या टेकड्यांवर खूप पूर्वीपासून विरळ झाडे असलेल्या परिसंस्थाच असल्याचे सिद्ध होते. आणि महत्त्वाचे म्हणजे येथील वनस्पतींनी शुष्क वातावरण आणि पातळ भूस्तराशी जुळवून घेतले आहे. 

उन्हाळ्यात पानझडी वृक्षांची पाने झडतील आणि गवत वाळून जाईल. या टेकड्या वर्षभर हिरव्यागार दिसणार नाहीत. परंतु हेच तर या नैसर्गिक संस्थेचे जैविक स्वरूप आहे. टेकड्यांचे हरितीकरण करण्याच्या या अट्टहासापायी आपण हळूहळू अशा प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती गमावून बसू, आणि त्याच बरोबर कदाचित त्यांच्यावर अवलंबून असलेली इतर जैवविविधताही. 

जबाबदार नागरिक म्हणून, या टेकड्यांच्या नैसर्गिक रचनेत आपल्याला किती आणि कुठवर हस्तक्षेप करायचा आहे याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. या प्रदेशातील समृद्ध पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारश्याचे भान आपण ठेवायला हवे. या टेकड्यांवरील मुळच्या वनस्पतींची माहिती उपलब्ध असल्यामुळे, येथे कोणत्या वनस्पतींची लागवड केली जाऊ शकते याची यादी आम्ही खाली देत आहोत. अर्थात अशी लागवड करणे अत्यावश्यक असेल तरच या यादीचा वापर करावा. 

(लक्षात घ्या: यातील बऱ्याचशा प्रजाती या मंदगतीने वाढणाऱ्या आहेत म्हणून परिणामांबाबत धीर बाळगावा. लागवड करतांना झाडांची संख्या (घनता) कमीच ठेवावी उदा. दोन रोपांमधील अंतर कमीतकमी १५-२० मीटर इतके असावे).

लागवड करण्यायोग्य वनस्पती
क्रं
शास्त्रीय नाव
मराठी नाव
टिप्पणी
1
Terminalia tomentosa
ऐन, सदाडा
आधी सर्रास आढळून येणारी, आता दुर्मिळ
2
Boswellia serrata
साळई
उतार आणि पाणी धरून न ठेवणाऱ्यामातीत लागवडीसाठी चांगली
3
Anogeissus latifolia
धावडा
पाणी धरून न ठेवणारी माती लागते.
4
Lannea coromandelica
मोई, शिमटी
सर्वत्र आढळून येणारे झाड.वणवा आणि दुष्काळाला तोंड देण्यास सक्षम
5
Diospyros melanoxylon
तेंदू, तेम्रू
भूमिगत चुषकांद्वारे व्यापक प्रसार. आग-प्रतिरोधक जाड साल असते.
6
Garuga pinnata
काकड
मर्यादित प्रमाणात लागवड करणे चांगले
7
Buchanania lanzan
चारोळी, चार
टेकडीवरील अधिक दमट भागांत पूर्वी  सर्रास आढळून येत असे.
8
Dolichandrone falcata
मेढशिंगी
खडकाळ प्रदेशांत लागवडीस योग्य असे एक लहान झाडं.
9
Heterophragma quadriloculare
वारस
कडे-कपारींवर सर्रास आढळून येणारे
10
Acacia catechu
खैर
अत्यंत काटक प्रजाती, कोणत्याही प्रकारच्या मातीत लागवड शक्य आणि स्थापनेनंतर कशाची फारशी गरज नाही. अत्यंत अग्नी-प्रतिरोधक
11
Wrightia tinctoria
काळा-कुडा
सुरुवातीला काळजी लागते. दुधाळ रसामुळे सहज ओळखता येते. मर्यादित संख्येत लागवड करणे उत्तम.
12
Acacia suma
सोन-खैर
पांढऱ्या सालीमुळे इतर बाभळींपासून सहज वेगळे ओळखता येते. साधारणपणे टेकडीच्या उतारांवर आढळून येते.
13
Pterocarpus marsupium
बिबळा
हवेतून बियांचा प्रसार होतो.
14
Lagerstroemia parviflora
नाना
कमी प्रमाणातलागवड उत्तम
15
Bridelia retusa
असणा
झाडाच्या बाल्यावस्थेत त्याला असलेले मोठे काटे गुरांपासून संरक्षणास मदत करतात
16
Acacia leucophloea
हिवर
अत्यंत काटक प्रजाती, खूप कमी घ्यावी काळजी लागते.
17
Sterospermum suaveolens
पडळ
कमी प्रमाणात लागवड करावी
18
Dalbergia lanceolaria
फणशी
मार्च महिन्यात सुंदर गुलाबी फुले येतात
19
Albizia odoratissima
काळा-शिरीष/चिंचवा
हा शिरस (Albizia lebbeck) नाही, गैरसमज नको
20
Cochlospermum religiosum
गणेर
पुण्यातील टेकड्यांचे वैशिष्ट्य असलेली वनस्पती
तक्ता सौजन्य: प्रियंका रुणवाल, आशिष नेर्लेकर

प्रियंका रुणवाल या पुण्याच्याच असून सध्या त्या राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्र, बंगळूरू (National Centre for Biological Sciences, Bengaluru) येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत.त्या शुष्क गवताळ प्रदेश आणि माळरानांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करीत आहेत.

आशिष नेर्लेकर हे पुणेस्थित वनस्पतीशास्त्रज्ञ असूनगवताळप्रदेशांच्याअभ्यासाची त्यांना विशेष आवड आहे. पुणे टेकड्यांवरील किर्कुंडी (Jatropha nana)या संकटग्रस्त वनस्पतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

हा लेख प्रथम इंग्रजीत The Wire वर प्रकाशित व मराठीत Research Matters: https://goo.gl/Cyx7pm वर प्रकाशित झालाआहे.

@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा