गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

शिकारी पक्ष्यांचा देश

आनंदा बॅनर्जी
अनुवाद- परिक्षित सूर्यवंशी
ताल चापर, फोटो – आनंदा बॅनर्जी
लेगर फाल्कन
फोटो – आनंदा बॅनर्जी  
तुम्हाला भारतातच एका लहानशा आफ्रिका सफारीवर जायचे आहे का? तर मग ताल चापरला जा! हे राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील खूप कमी प्रसिद्ध असलेले  एक वन्यजीव अभयारण्य आहे. ताल चापरला खूप मोठा गवताळ प्रदेश लाभलेला आहे जे त्याचे तेथील मुख्य आकर्षण - काळवीट- याचे प्रिय निवासस्थान आहे. 
फोरेस्ट रेंज ऑफिसर सुरतसिंग पुनिया यांच्या म्हणण्यानुसार वेळेवर केल्या गेलेल्या संरक्षण प्रयत्नांमुळे फक्त भारतातच आढळून येणाऱ्या काळविटांची संख्या २,५०० पर्यंत पोहचली आहे. ताल चापर हे दिल्लीपासून ४०० किमी दूर आहे. साधारणपणे १० तासांचा प्रवास! येथे वाघ-सिंह असे मोठे प्राणी नाहीत परंतु शेकडो एकरवर पसरलेल्या सोनेरी आणि हिरव्या गवतात राहणारे पक्षी हे येथील मोठे आकर्षण आहे.  ताल चापर हे नेहमी काळविटांसाठीच प्रसिद्ध राहील परंतु काळाच्या ओघात आता येथील पक्ष्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली आहे. मुख्यत्त्वे हिवाळा सुरु झाल्यापासून ते मार्चपर्यंत.
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील पक्षीप्रेमींनी त्यांना हवे असलेले खास पक्षी टिपण्यासाठी ताल चापर कडे आपला मोर्चा वळवला आहे. आजूबाजूला सगळीकडे विहरणारे - स्थलांतर करणारे ईगल्स, बझार्डस्, फाल्कनस्, हेरीअर्स आणि हॉक्स या सर्वांमुळे हा प्रदेश शिकारी पक्ष्यांचा प्रदेश बनला आहे. पुनियाजींच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत शिकारी पक्ष्यांच्या वेगवेगळ्या ३६ प्रजातींची येथे नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच्या माझ्या भेटीत मला त्यांपैकी २५ प्रजाती पाहता आल्या. ही खरोखरच एक मोठी उपलब्धी आहे. 
एक युरेसिअन ईगल आऊल झेप घेतांना. हा एक अत्यंत जहाल शिकारी पक्षी आहे. ही येथील निवासी प्रजाती असून या संपूर्ण उपखंडात सर्वांत मोठी (घुबड प्रजाती) आहे. फोटो आनंदा बॅनर्जी
गवताळ प्रदेश, जेथे त्यांना खायला भरपूर खाद्य उपलब्ध आहे, ही शिकारी पक्ष्यांची राहण्यासाठी पहिली पसंतीची जागा आहे.  लार्क्सपिपिट्स, क्वेल्स, पेट्रीजेस आणि अशा अनेक  जीवजंतूसह तुम्हाला येथे हजारो वाळवंटी घुशी आणि काटेरी शेपूट असलेले सरडे पाहायला मिळतील जे शिकारी पक्ष्यांच्या अन्नसाखळीचे अविभाज्य घटक आहेत. 
लेसर केस्ट्रल चीन आणि मंगोलियाहून आफ्रिकेकडच्या आपल्या देशांतराच्या प्रवासादरम्यान या उपखंडातून जाताना
फोटो थिंकस्टॉक
लेसर केस्ट्रल हा पक्षीप्रेमींच्या आवडत्या पक्ष्यांपैकी एक - भारतातून प्रवास करणारा हा पक्षी असंख्य पक्षी वेड्यांना आकर्षित करतो. हा पक्षी चीन आणि मंगोलिया मध्ये जन्मतो आणि अस म्हणतात की तो भारतात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मधून प्रवेश करतो. परंतु त्यांपैकी काही पक्षी हे आफ्रिकेकडे जाण्यापूर्वी हिमालयावरून उत्तर-पश्चिम भारताला ओलांडून जातात. 

लेगर फाल्कन - येथील आणखी एक निवासी शिकारी पक्षी प्रजाती. आणि या उपखंडात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या बहिरी ससाण्यांपैकी एक. फोटो – गौरव भटनागर 
मला येथे आढळून आलेल्या काही प्रमुख शिकारी पक्ष्यांची नावे सांगायची झाली तर ती अशी –युरेसिअन हॉबी, लाँग-लेगीड बझार्ड, रेड-नेकीड फाल्कन, ग्रेटर स्पोटेड ईगल, पाईड  हेरीअर, लेगर फाल्कन, कॉमन केस्ट्रल आणि  मार्श  हेरीअर त्यांच्या सोबत आकाश वाटून घेणारे आणखी पक्षी म्हणजे शेकडो पिवळ्या डोळ्यांची खबुतरे, आणखी एक अवश्य पहावी अशी प्रजाती, आणि हजारो विलक्षण डेमॉईसिली क्रेन्स जे मध्य आशियातील कझाखस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तान  येथून तेथील कडाक्याचा हिवाळा टाळण्यासाठी भारतात येतात.
ताल चापर येथील भरभराटीला आलेल्या या गवताळ प्रदेशाच्या परीसंस्थेची स्वतःची एक कहाणी आहे. १९४० पर्यंत हा प्रदेश शिकार करण्याची आणि घोड्यांना चारण्याची जागा म्हणून वापरला जात असे.  तो बिकानेरचे महाराजा गंगासिंग यांच्या मालकीचा होता. १९६० मध्ये हा प्रदेश वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. याच्या खूप आधी या अभयारण्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या टेकड्या ह्या अत्यल्प पडणाऱ्या पावसाचे पाणी अभयारण्याकडे वळवत असत. परंतु शेजारील भागांमध्ये सैंधव मिठासाठी होणाऱ्या खाणकामामुळे या प्रदेशाच्या नैसर्गिक पाणलोट क्षेत्रात मुलभूत बदल घडवून आणले आहेत आणि त्याचा येथील स्थानिक वनस्पती जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या भागामध्ये जास्त काहीच उगवत नव्हते शिवाय विलायती बाभूळ (Prosopis Juliflora) जी एक झपाट्याने वाढणारी, आक्रमक वनस्पती प्रजाती आहे आणि जिने स्थानिक वनस्पतींना नामशेष केले होते. 
नर काळवीट आपापल्या हद्दींसाठी भांडतांना. ताल चापर जो १९४० पर्यंत महाराजा गंगासिंग यांच्या मालकीचा एक शिकार करण्याचा आणि घोडे चारण्याचा प्रदेश होता तो आज देशातील एक प्रसिद्ध काळवीट अभयारण्य बनला आहे.फोटो – आनंदा बॅनर्जी


२००६ मध्ये राजस्थान सरकारने या अभयारण्याच्या समग्र विकासासाठी पाच वर्षांच्या कृती कार्यक्रमाची योजना आखली आणि या प्रदेशाचा राज्याच्या पर्यटन नकाशात समावेश केला. सुदैवाने जसे इतर निष्फळ कृती कार्यक्रमाच्या बाबतीत घडते तसे या कार्यक्रमाच्या बाबतीत घडले नाही. हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कायापालटाचे श्रेय मुख्यत्त्वे पुनिया यांना जाते.
पुनियाजींनी (या नावानेच ते लोकप्रिय आहेत) सर्वप्रथम स्थानिक गवत मोथियाची (काळविटांचे  आवडते खाद्य) लागवड करून विलायती बाभळीला नष्ट करण्यापासून सुरुवात केली. त्यांनी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनावरही भर दिला. आता पाच वर्षे झाली आहेत आणि परिणाम आपल्या समोर आहेत. 
परंतु पक्ष्यांच्या या स्वर्गाला भेट देणारे लोक पुनियाजींच्या सहवासाची आशा बाळगून असतात याचे आणखी एक वेगळेच कारण आहे! त्यांचे पक्ष्यांबद्दलचे प्रेम आणि ज्ञान दोन्हींना तोड नाही. लेसर केस्ट्रल किंवा स्पोटेड क्रीपरसारखे पक्षी ते अगदी विनासायास ओळखू शकतात. एखादा पक्षी विश्रांतीसाठी कोणत्या झाडावर बसेल, तो पाणी प्यायला कधी जाईल इतकेच नव्हे तर तो शिकारीच्या शोधात कधी निघेल हे त्यांना माहित असते. हा तो माणूस आहे ज्याने एका ओसाडखरबरीत वाळवंटाचे एका हिरव्यागार आणि शिकारी पक्ष्यांच्या प्रदेशात रुपांतर घडवून आणले. 
हजारो डेमॉईसिली क्रेन्स जे सप्टेंबर ते मार्च दरम्यान मध्य आशियाई कझाखस्तान , उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तान या देशांमधून तेथील कडाक्याचा हिवाळा टाळण्यासाठी भारतात येतात. फोटो – आनंदा बॅनर्जी 
First Published
Apala Paryavaran: 
On Arvindgputatoys.com : 


परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा