मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

पाण्यातील वाघाच्या व्यथा...

आनंदा बॅनर्जी
अनुवाद- परिक्षित सूर्यवंशी
सुवर्ण महाशिर (Tor putitora), फोटो सौजन्य श्री मिस्टी धिल्लन
ब्रिटिशांनी सुवर्ण महाशिर या गोड्यापाण्यातील माशाला पाण्यातील वाघ अशी उपमा दिली. एक सर्वोत्कृष्ट स्पोर्ट फिश आणि जगातील एक अप्रतिम प्रजाती असलेला हा मासा आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे.
ब्रिटिशांनी सुवर्ण महाशिर (Tor Putitora) या गोड्यापाण्यातील माशाला पाण्यातील वाघ अशी उपमा दिली आहे. याचे कारण म्हणजे हा मासा अतिशय खेळकर असून कुठल्याही अँगलर्सच्या नाकी नऊ आणण्याची यात ताकद आहे. हा भारतातील सर्वांत मोठा स्पोर्ट फिश म्हणून ओळखला जातो. इंद्रावे सिंग मान, वय ६७ वर्षे, हे दिल्लीतील एक नावाजलेले अँगलर आहेत. ते वयाच्या पाचव्या वर्षापासून अँगलिंग (हुक आणि दोरीच्या मदतीने मासे पकडण्याचा एक खेळ) करत आहेत. १९९५ मध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या स्पर्धेत अँगलिंगमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्राऊट मासा पकडण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्या मते सुवर्ण महाशिर हा मासा एकदा हुक मध्ये अडकला की खूप दमछाक करायला लावतो, तरीही त्याला पकडण्यात जी मजा येते ती इतर माशांना पकडण्यात येत नाही.
एकूणच महाशिरची सध्यस्थिती मात्र निराशाजनक आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे सरचिटणीस आणि सीईओ असलेले रविसिंग म्हणतात, नेटिंगद्वारे होणारी अविवेकी मासेमारी, सुरुंग लावून केली जाणारी बेकायदेशीर मासेमारी, पाण्याच्या प्रवाहात विषारी द्रव्ये मिसळणे आणि सिंचनासाठी त्यांचा मार्ग बदलणे (या गोष्टींचा महाशिरच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो), अशा कारणांमुळे माशाच्या या प्रजातीचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे.
अशा प्रकारच्या माश्यांना व त्यांच्या अधिवासांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने इको फ्रेंडली अँगलिंग हा एक नाविन्यपूर्ण उपाय समजला जातो. कारण यात स्थानिक लोकांच्या मदतीने हा मासा पकडून त्याचे वजन करून पुन्हा पूर्ववत त्याला पाण्यात सोडले जाते. यात मासा मरत नाही व अँगलर्सना आनंद प्राप्त होतो. यात अँगलिंगसाठी काही किलोमीटर पर्यंतचे नदीचे पात्र काही काही मीटर्सच्या छोट्या-छोट्या बिट्स मध्ये विभागले जाते. प्रत्येक बीटच्या संरक्षणाची जबाबदारी स्थानिक लोकांमध्ये वाटून देण्यात येते. यामुळे त्यांना अर्थप्राप्ती होते.
महाशिर हे आपल्या मोठ्या आणि चमकदार खवल्यांसाठी प्रसिद्ध आहेत.  ते बऱ्यापैकी मोठा आकार आणि वजन प्राप्त करू शकतात. गोड्या पाण्यातील माशांमध्ये कल्ल्याचे शरीराशी असलेले प्रमाण सर्वाधिक असलेल्या महाशिरचा त्याच्या शक्ती आणि सौंदर्यामुळे खूप आदर केला जातो. गोड्या पाण्यातील इतर कोणत्याही माशापेक्षा सुंदर असे मन मोहून टाकणारे याचे चमकदार खवले जणू सप्तरंगांची उधळण करत असतात. रॉड आणि लाईनद्वारे पकडल्या गेलेल्या सर्वांत मोठ्या दोन महाशिरपैंकी एक ११९ पौंड (५४ किलो) चा होता जो कर्नल जे.एस. रिवेट-कार्नेक यांनी २९ डिसेंबर १९१९ रोजी पकडला होता आणि दुसरा १२० पौंडचा होता जो जे.डब्ल्यू. वेन इंगेन यांनी २२ मार्च १९४६ रोजी पकडला होता.  
जेथे तापमान ५से ते २५से दरम्यान असते अशा स्वच्छ प्रवाहांमध्ये ही प्रजाती आढळून येते. महाशिर हे हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या टेकड्यांवरील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यात राहतात. याचबरोबर ते दक्षिणेतील कावेरी नदीतही आढळून येतात.
असे असतांनाही, महाशिर हे भारतातील त्या सहा स्पोर्ट फिश प्रजातींपैकी एक आहेत ज्यांच्यावर अधिवास विनाश, पायाभूत सुविधा विकासाच्या नावाने होणारा मानवी हस्तक्षेप, बेकायदेशीर शिकारी आणि गैरकायदेशीर मासेमारी यांचा विपरीत परिणाम होत आहे.
सामान्यपणे, लोकांना महाशिरच्या तीन प्रजाती माहित आहेत. उत्तर आणि ईशान्य भारतात आढळून येणारे लोकप्रिय सुवर्ण महाशिर, दक्षिण भारतात आढळून येणारे हम्पबॅक (Hypselobarbus mussullah) आणि डेक्कन महाशिर (Tor khudree). संपूर्ण जगात महाशिरच्या ४७ प्रजातींची नोंद झालेली आहे त्यांपैकी १५ भारतात आढळून येतात.
डेक्कन महाशिर (Tor khudree), फोटो सौजन्य श्री विद्याधर अटकोरे
दख्खन चा म्हणून डेक्कन. ही माशाची एक सुंदर प्रजाती आहे परंतु निसर्गाचा फारसा विचार न करता आखले गेलेले विकास प्रकल्प आणि इतरही काही कारणांमुळे आज मोठ्या संकटात सापडली आहे.  

१८२२ साली स्कोटीश चिकित्सक आणि निसर्गवैज्ञानिक फ्रान्सिस बुचनान हेमिल्टन यांनी सर्वप्रथम विज्ञानाला महाशिरची ओळख करून दिली परंतु १८३३ मध्ये ओरिएन्टेड स्पोर्टिंग मेगॅझीन मध्ये आलेल्या लेखानंतरच महाशिरला खरी प्रसिद्धी मिळाली. काही निसर्गवैज्ञानिकांच्या मते महाशिर हा शब्द इंडो-पर्शियन आहे. ज्याचा अर्थ मही (मासा) आणि शेर (वाघ) किंवा माशांमधला वाघ असा होतो. (किंवा शरीराच्या एकूण रुंदीपेक्षा डोक्याची रुंदी बरीच मोठी असते म्हणूनही महाशिर - महा=मोठा आणि शिर=डोके - हे नाव पडले असावे असेही मानले जाते) आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी महणून प्रयत्नशील ब्राह्मण आणि वनांत वास्तव्य करणारे संत याचा आवडता मासा म्हणून महाशिरचा उल्लेख वैदिक ग्रंथांत आढळून येतो. 
महाशिर हे शुद्ध आणि स्वच्छ नदीच्या पात्रातच आढळून येतात. यात होणारा थोडासाही बदल त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. असे म्हटले जाते कि पाण्याच्या तापमानाचा त्यांच्या विकासदर, वृद्धी, दीर्घायुष्य आणि आकारावर परिणाम होतो. याबाबतीत सुवर्ण महाशिरसाठी परिस्थिती फारशी अनुकूल नाही. भारतातील महाशिर संरक्षणावरील डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचा एक अहवाल ही गोष्ट खालीलप्रमाणे नमूद करतो, मानवी क्रियाकलापांची शिक्षा या माशांना भोगावी लागत आहे. धरणांचे बांधकाम, दुष्काळ किंवा महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नद्या आटणे, त्यांचा मार्ग बदलणे, माशांच्या अधिवासात बदल होणे या गोष्टींचा महाशिरवर खूपच गंभीर परिणाम होत आहे. 
१९५० मध्ये परिस्थिती इतकी वाईट नव्हती, त्यावेळी मान यांचे कुटुंब हरिद्वार आणि ऋषिकेश यांच्या मध्ये असलेल्या, सोंग आणि गंगा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या राईवाला या गावाला वारंवार भेट देत असत.
मान म्हणतात, त्यावेळी गंगा माशांनी भरलेली आणि एकदम स्वच्छ होती. तिच्यातील पाणी इतके स्वच्छ आणि नितळ होते कि मासे पकडण्यासाठी पावसामुळे ते थोडेसे गढूळ होण्याची वाट पहावी लागत असे अन्यथा मासे आमिष खायला येत नसत. ते आपले वडील शिविंदर पाल सिंग मान, सध्या वय ९३ वर्षे, आणि स्वर्गीय काका राजदेव सिंग अकोई यांच्याबद्दलची आठवण सांगतात, कसे ते तासंतासाच्या लढाईनंतर महाशिरला हरवून, पकडून मग त्याला पाण्यात परत सोडत असत.
आपल्या आठवणीत ते पुढे सांगतात, एकदा एका ६५ पौंडाच्या (२९ किलो) माशाशी रंगलेली लढत चक्क ३ तासांहून जास्त वेळ चालली. आपल्या काळात मान यांनी अनेक ४० पौंडी पकडले आहेत, आज तिशीच्या जवळ असलेली त्यांची मुले मेहर आणि शिव आपल्या आधुनिक रोड्स आणि रील्ससह १० पौंडी ही पकडू शकत नाहीत. नदीत आता माशेच नाहीत. राईवाला हे आता एक खूप वर्दळीचे शहर झाले आहे. येथील संपूर्ण परिसंस्था ही ओळखू येण्यापलीकडे बदलली आहे.
महाशिरला जिवंत राहण्यासाठी टेकड्यांवरील प्रवाहातील शुद्ध नैसर्गिक पाण्याची आवश्यकता असते यामुळे ते परिसंस्थेच्या आरोग्याचे सूचक मानले जातात. तज्ञांच्या मते गेल्या काही दशकांत महाशिरच्या संख्येत झालेल्या ऱ्हासमुळे हे सिद्ध होते की पाण्यातील वातावरणात झालेल्या बदलांना ते सहन करू शकत नाहीत.
वीरभद्र आणि भीमगोडा बंधाऱ्यांनी, जे गंगा नदीच्या (ऋषिकेश ते हरिद्वार दरम्यान) १४ किमीच्या पात्रात बांधले गेले आहेत, महाशिरच्या अधिवासाला तुकड्यांमध्ये विभागून त्यांचे खूप मोठे नुकसान केले आहे. हे बंधारे माशांच्या वार्षिक स्थलांतरात अडथळा आणतात. ते त्यांना अंडी घालण्याच्या आणि पिल्लांच्या पालनपोषणाच्या जागांकडे जाण्यास मज्जाव करतात. राष्ट्रीय मत्स्यवयवसाय विकास मंडळाचे (NFDB) वरिष्ठ मत्स्य वैज्ञानिक, शशांक ओगले म्हणतात, धरणे आणि बंधारे यांचे नदीतील माशांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आजपर्यंत कोणतेच प्रयत्न केले गेलेले नाहीत.
उत्तराखंडमधील हेमावती नंदन बहुगुणा (एचएनबी) गढवाल विद्यापीठाचे वैज्ञानिक, प्रकाश नौटियाल म्हणतात, दरवर्षी गाळ काढण्यासाठी साठी जेव्हा चिल्ला कालवा आणि गंगा नदीचे पूर्व व पश्चिम कालवे बंद केले जातात तेव्हा सुवर्ण महाशिरच्या संख्येत खूप मोठी घट होते.
अँगलिंगच्या दोन लोकप्रिय पद्धती आहेत. स्पिन फिशिंग आणि फ्लाय फिशिंग. अँगलिंग शौकिनांच्या मते रॉडद्वारे महाशिर पकडण्यासाठी मोठे कौशल्य, तंत्र, अभ्यास आणि खूप साऱ्या संयमाची आवश्यकता आहे. मासा पूर्णपणे थकून शरणागती पत्करेपर्यंत त्याला खेळवणे हे यातील आव्हान आहे. गळाला अडकल्यानंतर सुवर्ण महाशिर पाण्याच्या वेगाचा उपयोग करण्यासाठी प्रवाहाच्या मधोमध जातो आणि प्रवाहाच्या दिशेने पोहायला लागतो.
अशावेळी अँगलर रॉड वर उचलतो आणि त्याला मागे ओढून रीळवर दोरा गुंडाळायला सुरुवात करतो. यातील युक्ती मासा पोहून पोहून स्वतःला थकवत नाही तोपर्यंत पुरेशी दोरी सोडत राहण्यातही आहे. जर दोरी संपली तर मग मासा प्रवाहाच्या दिशेने नेईल तिकडे जाण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. मान म्हणतात, या खेळात किती हूक्स, रॉड्स, स्पूनस् आणि ल्युअर्स तुटले याचा काही हिशेबच नाही.
मान यांचा कावेरी नदीत हा खेळ खेळण्याचा अनुभव मात्र वेगळा आहे. येथे हम्पबॅक(Hypselobarbus mussullah) आणि डेक्कन महाशिर (Tor khudree)  हे मोठे मासे आहेत, त्यांचे वजन ६० पौंडांपेक्षाही जास्त असते परंतु ते सुवर्ण महाशिरसारखे लढवय्ये नसतात.
आमिष धरता क्षणीच हम्पबॅक(Hypselobarbus mussullah) आणि डेक्कन महाशिर (Tor khudree) सूर मारून नदीच्या मध्यभागी जाऊन बसतात. या माशांना डिवचून थकवण्यासाठी उत्तर भारतात वापरले जातात त्यापेक्षा खूप मोठ्या रॉड्स आणि रील्सची आवश्यकता असते. येथील दुसरे आव्हान म्हणजे हिमालयातील नद्यांमधल्या गोल दगडांऐवजी येथे असलेले तीक्ष्ण ग्रेनाईटचे खडक जे दोरी कापून टाकतात.
अँगलिंगची अत्यंत आवड आणि वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी अधिष्ठाता असलेले डॉ.ए.जे.टी. जॉनसिंग यांना असा विश्वास वाटतो की, लोकसमुहाधारित कॅच एन्ड रिलीज कार्यक्रमाला प्रोत्साहन दिल्यास महाशिर संरक्षणात खूप मोठी मदत होईल. या कार्यक्रमाचा स्थानिक लोक, महाशिर तसेच त्याचा अधिवास यांना फायदा होईल. डॉ.जॉनसिंग म्हणतात, वर्तमानात या प्रजातीच्या संरक्षणासाठी कायद्याची कोणतीच तरतूद नाही. यामुळे हा मासा जास्तच असुरक्षित झाला आहे.
२००४ मध्ये एन्व्हायर्नमेंट एन्ड अँगलर्स असोसिएशन, वन विभाग आणि उत्तराखंड वन विकास महामंडळ यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार कॉर्बेट व्याघ्र अभयारण्याच्या बफर झोनमध्ये सुरु करण्यात आलेल्या लोकसमूहाधारित रामगंगा महाशिर संरक्षण प्रकल्पामुळे या माशाचे संरक्षण झाले आणि कमीत कमी पाच गावांना अँगलिंगमुळे आर्थिक लाभही झाला. परंतु सरकारच्या किचकट नियमांमुळे हा कार्यक्रम बंद पडला. तज्ञांच्या मते हे सहज टाळता आले असते.
उत्तराखंडचे निवृत्त भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी श्री ए.एस. नेगी म्हणतात, एन्व्हायर्नमेंट एन्ड अँगलर्स असोसिएशनद्वारे दिल्या जाणाऱ्या परिणामकारक संरक्षणामुळे संपूर्ण जगातून मोठ्या प्रमाणावर अँगलर्स रामगंगा नदीकडे आकर्षित झाले होते. श्री मिस्टी धिल्लन यांनी पहिल्यांदाच सुवर्ण महाशिरवर फ्लाय फिशिंगला प्रोत्साहन दिले आणि या ठिकाणाला त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट फ्लाय फिशिंग ठिकाणांपैकी एक बनवले. २०११-१२ मध्ये वन विभागाने २,२६,०००/- रुपयांचा महसूल कमावला आणि याच काळात दोन इको डेव्हलपमेंट कमिटींनी २३,३००/- रुपये कमावले.
दक्षिणेत शिवासमुद्रम ते होगेनक्कल धबधबा या दरम्यानच्या कावेरी नदीच्या ४० किमीच्या पात्रात अँगलिंगने स्थानिक लोक आणि महाशिर यांचा फायदा करवून दिला आहे. अनेकजण म्हणतात, ज्यात अजूनही ५० किलो आणि त्यापेक्षा जास्त वजनाचे महाशिर आहेत असा हा या नदीचा एकमेव पट्टा आहे.
डॉ.जॉनसिंग म्हणतात, हा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणीय पर्यटनाचे एक आदर्श उदाहरण होते. कॅच एन्ड रिलीज अँगलिंग शिबिरांमधून मिळालेल्या पैशातून स्थानिक मासेमार आणि पूर्वी जे बेकायदेशीररित्या माशांची शिकार करत होते अशा ४०-५० जणांना संरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून रोजगार मिळाला होता. १९७२ मध्ये सुरु झालेले अँगलिंगचे उपक्रम २०१० पर्यंत सुरु होते. दुर्दैवाने, २०१० मध्ये एका न्यायालयीन खटल्यामुळे हा कार्यक्रम बंद पडला. ते पुढे म्हणाले, जर अँगलिंगला पुन्हा सुरुवात केली गेली नाही तर कावेरी लवकरच महाशिररहित होऊन जाईल. एका सर्वोत्कृष्ट स्पोर्ट फिशला देशातील या भागातून आपण कायमचे गमावून बसू.
धिल्लन म्हणतात, नद्यांच्या संरक्षणात कोणालाच स्वारस्य नाही. स्नोर्केल (पाण्यात श्वाश घेण्याची नळी) लावून तुम्ही जेव्हा नदीच्या तळाशी पाहाल तेव्हा तुम्हाला तेथील विनाश दिसेल. नदीचे तळ हे भूसुरुंगांनी पडलेल्या पांढऱ्या डागांनी आच्छादलेले दिसेल. वन विभागाने फिशिंग बिट्स बंद केल्यामुळे रामगंगामध्ये बेकायदेशीर मासेमारीला पुन्हा उधाण आले आहे.
गोड्यापाण्यातील माशांचे वैविध्य आणि वातावरण बदलांचा तसेच धरणे आणि बंधारे यांचा माशांवर होणारा परिणाम यात डॉक्टरेट करत असलेले श्री विद्याधर अटकोरे यांच्या मते, आज सुवर्ण महाशिरची भरभराट रामगंगा नदीच्या आणि तिच्या उपनद्यांच्या फक्त त्याच पट्ट्यात होत आहे जो कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसुरक्षित भागातून वाहतो.
जिम कॉर्बेट यांचे तर महाशिरने मन मोहून घेतले होते, त्याबद्दल त्यांनी खूप लिहिले आहे. आपल्या Man-eaters of Kumaon (कुमाऊचे नरभक्षक) या पुस्तकात ते महाशिरला माझ्या स्वप्नातील मासा असे म्हणतात.
महाशिरच्या संख्येत धोकादायकप्रमाणात होणाऱ्या ऱ्हासाकडे पाहून तज्ञमंडळी, महाशिरची देशातील व्याप्ती विचारात घेता त्याला भारताचा गोड्या पाण्यातील राष्ट्रीय मासा घोषित केले जावे असे सुचवतात. या गोष्टीला पुष्टी देतांनाच डॉ.जॉनसिंग म्हणतात महाशिरचे अधिवास हे वन विभागाच्या नियंत्रणात असल्यामुळे सर्वच स्तरावरील वन अधिकाऱ्यांना महाशिरला वाचविण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले जावे.
अँगलिंगचे शौकीन आणि संरक्षणात रुची असलेल्यांच्या मते, व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या धर्तीवर महाशिर संरक्षण प्रकल्पाची आज नितांत गरज आहे. त्यांचा तर्क आहे की, महाशिर हा नदीतील वाघ आहे म्हणून त्याचे संरक्षण केले गेले तर त्यामुळे इतर माशांचेही संरक्षण होईल आणि नद्याही स्वच्छ आणि शुद्ध राहण्यास काही प्रमाणात का होईना मदत होईल.
डेक्कन महाशिर
भारताच्या तीव्रवाही नद्यांमध्ये आढळून येणारा डेक्कन महाशिर (Tor khudree) हा एक गोड्यापाण्यातील मासा आहे. भारतातील मोठ्या सपोर्ट फिश मध्ये याची गणना केली जाते. इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (IUCN) या माशाचा सामावेश धोकादायक स्थितीत असलेल्या प्रजाती (Endangered species) या गटात केलेला आहे. विविध कारणांनी या माशांच्या संख्येत गेल्या केवळ दहा वर्षांत ६० टक्क्याहून अधिक घट झाली आहे. यातील प्रमुख कारण अंधाधुंद मासेमारी हे आहे.
पश्चिम घाटात प्रामुख्याने आढळून येणाऱ्या या माशांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. १९८० मध्ये जसे पूर्ण वाढ झालेले महाशिर सापडत होते तसे आता सापडत नाहीत आता फक्त कधीतरी लहान आकाराचे महाशिर सापडतात असे येथील मासेमार म्हणतात. केरळ मधील नद्या आणि धरणांमध्ये मासेमारीसाठी भूसुरुंग लावण्यासारख्या विध्वंसक आणि बेकायदेशीर पद्धतींचा सर्रास वापर केला जातो. त्रावणकोर कोचीन फिशरीज अ‌‍‍ॅक्ट १९५० (भारत सरकार, भारत) अंतर्गत भूसुरुंगाद्वारे मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशाप्रकारची बेकायदेशीर मासेमारी येथील अगदी अभयारण्याच्या सुरक्षित भागातही सुरूच आहे.
डेक्कन महाशिर (Tor khudree), फोटो सौजन्य श्री विद्याधर अटकोरे
डेक्कन महाशिरपश्चिम घाटात प्रामुख्याने आढळून येतो. तेथील नद्यांवर बांधल्या गेलेल्या धरणांचा आणि बंधाऱ्यांचा याच्या प्रजननावर आणि संख्यावाढीवर विपरीत परिणाम होत आहे.
या प्रजातीला असणारा दुसरा मोठा धोका म्हणजे माशाच्या मुळच्या नसलेल्या प्रजातींचे आक्रमण. डेक्कन महाशिरच्या प्रमुख अधिवासांपैकी एक असलेल्या दक्षिण पश्चिम घाटातील पेरियार धरणात इतर नवीन माशांच्या प्रजाती सोडल्यामुळे ते यांना धोका निर्माण करत आहेत.
अधिवासातील बदल आणि पश्चिम घाटातील वरच्या भागातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्ये सोडले जाऊन त्यांच्यात झालेल्या प्रदुषणाचाही या माशावर खूपच विपरीत परिणाम होत आहे.
डेक्कन महाशिरच्या ऱ्हासाचे आणखी एक कारण म्हणजे पश्चिम घाटातील नद्यांवर बांधली गेलेली अनेक धरणे. अंडी घालण्यासाठी महाशिर हे नदीच्या वरच्या भागाकडे स्थलांतर करतात परंतु धरण आणि बंधाऱ्यामुळे त्यांच्या स्थलांतरास अडथळा निर्माण होतो. त्यांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होऊन त्यांची संख्या मर्यादित राहते.
नोट : या लेखाला वैज्ञानिक आधार प्राप्त करून दिल्याबद्दल आणि डेक्कन महाशिर चे फोटोग्राफ्स उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री विद्याधर अटकोरे यांचे अत्यंत आभारी आहोत.
- परिक्षीत सूर्यवंशी

परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com
===========================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा