रविवार, २६ जानेवारी, २०१४

गजराजाला नाही तिन्ही लोकी ठाव....

आनंदा बॅनर्जी 
अनुवाद- परिक्षित सूर्यवंशी
रेखाटन-पियुष सेक्सारिया
हत्तीचा अवाढव्य आकार आणि भारतात त्याला जवळजवळ सर्वत्र मिळणारा सन्मान दोन्हीही दिखाऊ आहेत असे वाटावे इतके त्याचे नशीब वाईट आहे

नवी दिल्ली: भिक मागायला लावणे, तासंतास दोन पायांवर उभे ठेवणे, खाचखळग्यांनी भरलेल्या डांबरी रस्त्यावर अनवाणी चालायला लावणे, तस्करी केली जाणे, एकटे ठेवणे, आणि रस्ते अपघातात मारलेही जाणे; हत्तीचे नशीब हे फक्त त्याच्या आकारालाच नव्हे (ज्याचे वजन जवळजवळ ३ हजार किलो आणि उंची १० फूट आहे त्याची तस्कारी करणे शक्य तरी कसे होते!) तर भारतात त्याला जवळजवळ सर्वत्र मिळणाऱ्या सन्मानालाही खोटे ठरवते.
यावर्षी आतापर्यंत दोन हत्ती पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये सर्कसमध्ये मेले, कमीतकमी दोन हत्ती दक्षिण भारतात मंदिरात मेले. एक हत्ती महाराष्ट्रात भिकारी माफियांच्या छळामुळे मेला. तीन हत्ती केरळमध्ये मेले. खेळ सादर करतांना येणाऱ्या ताणामुळे निरंकुश होऊन गर्दीच्या ठिकाणी हत्ती सैरावैरा पळायला लागल्याच्या जवळजवळ २४० घटना नोंदल्या गेल्या. एक हत्ती दिल्लीजवळ हाईवे वर मेला.
बंदिस्त हत्तींचे हित आणि व्यवस्थापन यासाठी काम करणाऱ्या कम्पॅशन अनलिमिटेड प्लस एक्शन (सीयुपीए) या गैर-सरकारी संघटनेच्या अध्यक्षा सुपर्णा बक्षी-गांगुली म्हणतात, “या प्राण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, क्रूर वागणूक दिल्यामुळे आणि छळ केल्यामुळे कदाचित आणखीही बरेच मृत्यू झाले असतील, ज्यांच्या बद्दल आपल्याला माहितच नाही.”
या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या दोन घटनांकडे विशेष लक्ष लागले आहे. पहिली घटना १४-१९ नोव्हेंबर दरम्यान होणारे प्रथम आंतरराष्ट्रीय हस्ती संमेलन (इंटरनेशनल एलिफंट कॉंग्रेस) म्हणजेच मंत्र्यांची शिखर परिषद  E 50:50. (टीप: ही परिषद पुढे ढकलण्यात आली आहे). E 50:50 परिषदेची “जेथे वन्य हत्तींची वस्ती आहे अशा ५० देशांची आद्य परिषद” अशी वाखाणनी करणारे पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे विधान म्हणते, “आपल्यासोबत या पृथ्वीवर राहणारे, या भूतलावरील सर्वांत मोठे प्राणी, हत्ती, हे जगातील जैवविविधता संवर्धनाचे जणू सुकाणूच आहेत! आज हत्तींच्या तीन प्रजाती ५० देशांमध्ये विखुरलेल्या आढळून येतात. भू-राजकीय सीमारेषांपलीकडे जगभरातील हत्तींना बेकायदेशीर शिकारी, अधिवास विनाश आणि मानवाशी संघर्षाच्या समान संकटांना तोंड द्यावे लागत आहे”.
दुसरी घटना, जी योगायोगाने या परिषदेच्या काळातच होणार आहे, ज्यात जगभरातून वैज्ञानिक, संशोधक, संवर्धन क्षेत्रात काम करणारे आणि धोरणकर्ते दिल्लीत हत्ती विज्ञान आणि संवर्धन यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत, ती म्हणजे बिहारमधील सोनेपुर मेळा जो १७ नोव्हेंबरला सुरु होणार आहे आणि महिनाभर चालणार आहे. या मेळ्यात हत्ती प्रदर्शनासाठी ठेवले जातील आणि त्यांची बेकायेशीर विक्री होईल.   
खरतर, हत्तींसंबंधी कोणताही व्यापार हा बेकायदेशीर आहे म्हणूनच ज्याचा बऱ्याचदा एशियातील सर्वांत मोठा गुरांचा मेळा असा उल्लेख होतो त्यात हत्तींना ठेवले जाऊ नये. परंतु भारतात नेहमीप्रमाणे या बंदीलाही अनेक पळवाटा आहेत. 
वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार या विषयातील तज्ञ आणि TRAFFIC India/WWF Indiaशी संलग्न असलेले, ज्यांनी गेल्या वर्षी सोनेपुर मेळ्याला भेट दिली ते अबरार अहमद म्हणतात, “वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जिवंत हत्ती आणि हस्तिदंताच्या व्यापारावर प्रतिबंध आहे. परंतु दात्याने तो या प्राण्याची काळजी घेण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केल्यास सवारीसाठी हत्ती भेट किंवा दान देता येतात. जे लोक या प्रजातींचा व्यापार करतात त्यांच्याकडून कायद्यातील या तरतुदीचा आच्छादन म्हणून दुरुपयोग केला जातो.”
एक फोफावत चाललेला व्यापार 
सुळ्यांसाठी हत्तींची बेकायदेशीरपणे शिकार केली जाते. आज हत्ती ही एक विलुप्तप्राय प्रजाती असण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
अहमद यांच्यानुसार गेल्या वर्षी सोनेपुर मेळ्यात ज्या हत्तीमालकांनी आपले हत्ती प्रदर्शनासाठी ठेवले होते त्यांपैकी एकानेही ते विक्रीला असल्याचे मान्य केले नाही, परंतु अबरार यांनी केलेल्या चौकशीतून हे सत्य उघडकीस आले कि ते हत्ती तीन ते चार लाख रुपयांपर्यंत विकत घेतले जाऊ शकतात.
यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे अबरार यांना प्रदर्शनासाठी असलेले हत्तीं मूळचे कुठले आहेत हे ओळखता आले नाही, विशेषकरून बछडे. ते जंगलातून पकडले गेले आहेत वा एका मालकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित केले गेलेले आहेत याची त्यांना काहीच कल्पना आली नाही.    
TRAFFIC Indiaचे अधिकारी आणि हत्ती संवर्धनवादी ठामपणे सांगतात कि भारतात जिवंत हत्तींचा व्यापार फोफावला आहे. ते पुढे म्हणतात, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या शिकारीच्या जागा आहेत, जेथे तरुण हत्ती आणि बछड्यांना पकडले जाते.
अहमद म्हणतात, सोनेपुर ही भेटीची जागा आहे. या प्राण्यांची तस्करी म्यानमारपर्यंत केली जाते. बनावट कादापत्रे तयार केली जातात आणि हत्तींची ओळख बऱ्याचदा बदलली जाते.
भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कोणीही व्यक्ती राज्य मुख्य वन्यजीव प्रबंधकाकडून (चीफ वाईल्डलाईफ वार्डन) मालकीहक्क प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हत्ती बाळगू किंवा मिळवू शकत नाही आणि जर कोणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हत्ती नेत असेल तर संबंधित मुख्य वन्यजीव प्रबंधाकाला ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे.   
या पाळीव म्हटल्या जाणाऱ्या प्राण्याला येथे मिळणाऱ्या वागणुकीचे आश्चर्य वाटू नये कारण येथील जंगली हत्तींना कसे हाताळावे हे या देशाला माहितच नाही. जिथे विकासाच्या धबडग्यात सापडून भयंकर वेगाने होत चाललेल्या वन्यजीव अधिवांसांच्या विनाशामुळे मानव-प्राणी संघर्ष रोजचाच झाला आहे! देशाच्या इतिहास, संस्कृती आणि धर्माचा अंगभूत भाग असूनही भारतात हत्ती हे जंगल आणि जेल दोन्हीं ठिकाणी त्रास सोसतच आहेत.

सामान्य लोकांना हत्तीची खूप आवड असली तरी त्याच्या गरजांबद्दल त्यांच्यात अज्ञान आहे
फेब्रुवारी १९९२ मध्ये भारत सरकारने संवर्धनाच्या दिशेने एक पाउल म्हणून देशातील हत्तींच्या संवर्धन आणि कल्याणासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर, हत्ती प्रकल्प सुरु केला परंतु प्रत्यक्षात फारसे काहीच बदलले नाही. दरवर्षी मानव-हत्ती संघर्षामुळे जवळजवळ ४०० माणसे आणि १०० हत्ती मृत्युमुखी पडतात, दरवर्षी जंगल भागातून धावणाऱ्या रेल्वेंमुळे हत्ती मारले जातात.
तज्ञ मंडळी भारतात वन्य हत्तींची संख्या २६,००० ते २८,००० तर बंदिस्त हत्तींची संख्या ३,४०० ते ३,६०० दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करतात. E 50:50 ला दिलेल्या आपल्या संदेशात पर्यावरण मंत्री जयंती नटराजन म्हणाल्या “एशियातील एकूण वन्य हत्तींपैकी ६०% आणि बंदिस्त हत्तींपैकी २०% भारतात आहेत”
राष्ट्रीय वारसा
भारतीय समाजात हत्तींना पूजनीय मानले जाते. धर्म ग्रंथांत विविध कथा प्रसंगी अनेक वेळा हत्तींचा उल्लेख आढळून येतो. 
फेब्रुवारी २०१० मध्ये भारत सरकारने हत्ती प्रकल्पात सुधारणा करण्यासाठी आणि देशातील वन्य त्याचबरोबर बंदिस्त हत्तींचे संवर्धन आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षमरित्या करता यावे यासाठी तपशीलवार शिफारशी पुरविण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली. गजः या शीर्षकाचा तो अहवाल ऑगस्ट २०१० मध्ये सुपूर्द करण्यात आला. “परंतु त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत फारशी प्रगती झालेली नाही” हे म्हणणे आहे आर. सुकुमार यांचे, ते सेंटर फॉर इकोलॉजीकल सायन्सेस, इंडिअन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील हत्तीतज्ञ आणि कृतिदलाचे सदस्य आहेत.
या अहवालाच्या फक्त या प्रजातीला राष्ट्रीय वारसा प्राणी घोषित करणे आणि आगामी आंतरराष्ट्रीय हत्ती संमेलनाचे आयोजन करणे याच शिफारशी स्वीकारल्या गेल्या आहेत. अधिक तातडीच्या आवश्यकता जसे लेन्डस्केप लेवल कन्झर्वेशन आणि मानव-हत्ती संघर्ष या दुर्लक्षितच राहिल्या आहेत.
सुकुमार म्हणतात, “लोकांशी होणाऱ्या गंभीर संघर्षामुळे काही वन्य हत्ती अपरिहार्यपणे बंधीवासात येतील म्हणून बंदिस्त हत्तींच्या वापर आणि हिताकडे आपण पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे.”  
ताबडतोब संघर्ष शमविण्याचे उपाय योजण्यासाठी कृतीदलाने खालील भागांची यादी केली आहे:
सोनितपूर, माजुली (आसाम), रानी, हसन (कर्नाटक), केऑन्ज्झार/सुंदरगढ (ओरिसा), तीरुपात्तुर (तामिळनाडू), सारीआकेला/खरसावन, रोम-मुसाबरी (झारखंड), रायगढ/जशपुर (छत्तीसगड) आणि दक्षिण पश्चिम बंगाल.  
भारताला अजूनही वाघाचेच वेड लागलेले आहे. हत्ती प्रकल्प या वर्षी मेपासून अध्यक्षाविनाच राहिला आहे आणि शेवटची मार्गदर्शक समिती, जी नोव्हेंबर २०१२ मध्ये स्थापण्यात आली तिची अजून एकही बैठक झालेली नाही.
पंतप्रधान कार्यालयाने, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) धर्तीवर राष्ट्रीय हत्ती संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला. या प्राधिकरणाने विकासाच्या दबावापासून हत्तींच्या अधिवासाचे संरक्षण केले असते. हत्तींसाठी आरक्षित ४०% पेक्षाही जास्त क्षेत्राचा संरक्षित क्षेत्र (राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्य) किंवा संरक्षित वनांत समावेश होत नाही.
अनामिक राहणे पसंत करणारे एक वन्यजीव संवर्धनवादी “राष्ट्रीय वारसा प्राण्याच्या” पवित्रतेबद्दल प्रश्न उभा करतात. ”सोनेपुरचे अस्तित्त्व कसे टिकून आहे? हत्ती हा काही मुंगी नाही; संगनमत असल्याशिवाय हत्तींचे हस्तांतरण कसे घडून येते?”
कृतीदलाचा अहवाल म्हणतो, “जरी वन्य आणि बंदिस्त दोन्हीप्रकारच्या हत्तींना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शेड्यूल १ प्राणी असा दर्जा देण्यात आला असला तरी कोणत्याही रोकटोकीशिवाय त्यांचा वापर सुरूच आहे.” हा अहवाल पुढे म्हणतो, “याचा परिणाम, बंदिस्त हत्तींची वैध स्थिती ही वन्यजीव कायदा आणि प्राण्यांप्रती क्रूरता प्रतिबंधक कायदा या दोन्हींच्या मध्ये कोठेतरी पडते जी भयंकर पिळवणूक आणि छळवणुकीला कारणीभूत ठरते.”
एलिफंट चार्टर
सीयुपीएच्या बक्षी-गांगुली म्हणतात काहीच केले गेलेले नाही
“सर्कशीत होणारे हत्तींचे प्रदर्शन थांबवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीयेत; खाजगीरीत्या बाळगलेल्या हत्तींना वाणिज्यिक प्रसंग आणि कार्यक्रमांत प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारण्यासाठी राज्य सरकारांना कोणत्याच सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. त्यांना विक्रीसाठी किंवा शहरातील गर्दीने गजबजलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेले जात आहे हे माहित असूनही, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र किंवा प्रवास परवाना देण्यावर कोणतेच बंधन नाही. याशिवाय, अत्यंत वाईट परिस्थितीत असलेले हत्ती जप्त करण्यासाठीही कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत, वन विभागाला या बाबतीत कार्यवाही करण्याचा पूर्ण अधिकार असूनही.”
अग्रगण्य क्षेत्र जीवशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संवर्धनवादी आणि हत्ती-मानव संबंधाचे विद्वान यांच्याद्वारे स्वाक्षरीत ग्लोबल एलिफंट चार्टर म्हणते, “विज्ञान आणि पारंपारिक शहाणपण हे हत्तींचे हित ओळखण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी भरपूर ज्ञान पुरविते. हे चार्टर हत्ती हे आश्चर्यजनक शारीरिक जोम, असामान्य सामाजिक व्यामिश्रता आणि महत्त्वपूर्ण बौद्धिक क्षमता दर्शवतात हे मान्य करते. पुढे ते हे ही स्वीकारते कि हत्ती हे गुंतागुंतीचे, आत्मसचेत प्राणी आहेत, जे भिन्न-भिन्न इतिहास, व्यक्तिमत्त्व आणि आवडींना धारण करतात आणि ते शारीरिक आणि मानसिक त्रास अनुभवण्यास सक्षम असतात.”
यावर्षी एप्रिलमध्ये एन अपोलॉजी टू एलिफंट (http://www.youtube.com/watch?v=2-c4kexoI1U) या माहितीपटाने बंदिस्त हत्तींना कशाप्रकारे वाईट वागणूक दिली जाते आणि त्यांचा दुरुपयोग केला जातो हे उघड केले. या माहितीपटाने यातनामय प्रशिक्षण प्रक्रिया आणि जगभरातील काही प्राणीसंग्रहालय आणि सर्कशीतील जीवनमानामुळे होणारा मानसिक आघात आणि शारीरिक नुकसान दाखवले. दिल्लीत, आपल्या मालकांची सेवा करण्यासाठी भेगाळलेल्या आणि फोडे आलेल्या पायांनी तळपत्या डांबरी रस्त्यावर हत्ती चालतच आहेत. प्राण्यांना वाचवणारी एक संघटना, वाईल्डलाईफ एसओएस म्हणते, दिल्ली सरकारने आताच केलेल्या एका सक्तीमुळे हत्ती मालकांना शेजारील राज्यात किंवा उत्तराखंडमधील पर्यटनस्थळी स्थलांतरित व्हावे लागले.
गांगुली म्हणतात, “जर लोकांना हत्तींच्या मुलभूत गरजांबद्दल, ज्या बंदिस्त अवस्थेत दिल्या जाणे अवघड आहे, जागृत करण्यात आले तर त्यांची मागणी हळूहळू कमी होईल. आणि जर सरकारने जेथे त्या गरजा पुरविल्या जाऊ शकत नाहीत तेथे मालकीची परवानगी नाकारली तर या समस्येच्या नैसर्गिक आणि तर्कसंगत उपयापर्यंत पोहचता येणे शक्य आहे.”
अनैसर्गिक जीवनपद्धती
२००९ मध्ये भारताच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने देशात हत्तींना प्राणीसंग्रहालयात आणि सर्कशीत ठेवण्यावर प्रतिबंध आणला. दुर्दैवाने, प्राधिकरणाने या महाकाय प्राण्याच्या पुनर्वसनासाठीचे उपाय योजले नाही. कृतीदलाने खाजगी हत्तींची, व्यापारी कंपन्यांच्या मालकीचे सर्कशीतील हत्ती, पर्यटन अयोजाकांकडील पर्यटक हत्ती, उदाहरणार्थ, जयपूरमध्ये सवारीसाठी वापरले जाणारे किंवा भटक्या फकीरांकडून (पंजाब, जयपूर, मुंबई, गोवा, दिल्ली, पुणे) भिक मागण्यासाठी वापरले जाणारे हत्ती आणि मंदिर, चर्च आणि मस्जिद यांसारख्या धार्मिक न्यास आणि संस्थांमध्ये असलेले उत्सवांमध्ये वापरले जाणारे हत्ती अशी वर्गवारी केली.
सीयुपीए आणि एशियन नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन (एएनसीएफ) यांनी तयार केलेला ट्रेव्हलिंग एन्ड बेगिंग एलिफंट्स ऑफ इंडिया या शीर्षकाचा अहवाल म्हणतो, मुख्यत्वे पैसे कामावण्यासाठी प्रवास करत भिक मागण्याच्या कामात लावलेल्या हत्तींना त्यांच्या नैसर्गिक वास्तव्य क्षेत्रापासून खूप दूर आणि अनैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्यास भाग पाडले जाते. गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब यांसारख्या राज्यांत वन्य हत्ती नाहीत परंतु येथे बंदिस्त हत्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहेत. असे हत्ती, जे बहुधा दिवसभराच्या काबाडकष्टांमुळे तीव्र भुकेने व्याकूळ झालेले आणि थकून गेलेले असतात, कोणतेही अन्न खातात, ते त्यांच्या नैसर्गिक आहाराच्या कितीही विरोधी असले तरी! यात वाया जाणारे अन्न जसे भाज्यांच्या साली, निकस आणि तेलकट, गोड आणि मसालेदार पदार्थांचा उरलेला भाग यांचा समावेश असतो.
सामान्य माणसांना या प्राण्यांमध्ये स्पष्ट रुची आणि आदरभाव असला तरी एका हत्तीच्या गरजा काय आहेत हे त्यांना माहित नाही. यामुळे ते हत्तींना अनैसर्गिक आणि अनारोग्यकारक जीवनप्रणाली व्यतीत करण्यास भाग पाडतात. केरळ मध्ये जास्तीतजास्त हत्ती हे मलबद्धते मुळे मृत्युमुखी पडतात, जी भक्तांकडून अतिप्रमाणात केळी आणि तालपत्र खाऊ घातल्याने होते.
मंदिरातील हत्ती हे सगळ्यात वाईट अवस्थेत असलेल्यांपैकी आहेत
एएनसीएफ, सीयुपीए आणि वाइल्डलाईफ रेस्क्यू एन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर (वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र) यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कॅप्टिव्ह एलिफंट्स ऑफ कर्नाटका: एन इन्वेस्टीगेशन इनटू द पॉप्युलेशन स्टेटस, मेनेजमेंट एन्ड वेल्फेअर सिग्निफिकंस, या अभ्यासात म्हटले आहे, ”त्यांना इतका सन्मान दिला जात असला तरी ज्यांचा सर्वाधिक छळ होतो ते मंदिरातील हत्ती आहेत”
“हत्तींना दिवसातून अनेकदा आशीर्वाद देणे आणि भिक मागणे, काँक्रिट, डांबर किंवा तत्सम कठीण पृष्ठभागावर दीर्घकाळ स्थिर उभे राहणे यांसारखे अनैसर्गिक वर्तन तासंतास करावे लागते. जास्तीतजास्त मंदिरातले हत्ती हे जागेचा अभाव, एकटेपणा यांनी त्रस्त असतात. त्यांच्या व्यायामासाठी, अंघोळीसाठी, मोकळेपणाने फिरण्यासाठी आणि परस्परक्रियांसाठी काहीच व्यवस्था केलेली नसते. शिवाय, मंदिर अधिकाऱ्यांना या चुकीच्या व्यवस्थापन पद्धतींच्या परिणामांची जाणीवही नसते ज्यामुळे माहूत, सामान्य लोक आणि हत्तींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
हस्ती कृतिदलाचे सदस्य सांगतात कि वन्य हत्तींचे भवितव्य मुख्यत्त्वे याच गोष्टीवर अवलंबून आहे कि आपण त्यांच्या अधिवासांचे संरक्षण आणि शिफारशींची अंमलबजावणी किती चांगल्या प्रकारे करतो. यावर हस्ती संमेलनात पुन्हा चर्चा होईलच. त्या दरम्यान सोनेपुर येथे कमीतकमी काही हत्तींचे तरी मालक बदलेले असतील.
संशोधनाने सिद्ध झाले आहे कि हत्ती हे भावनाप्रधान प्राणी आहेत त्यांना आपल्या सोबत्यांच्या विरहाचे अत्यंत दुःख होते.

हत्तींची महाराष्ट्रातील स्थिती
महाराष्ट्रात मागील शतकभराहून जास्त काळ वन्य हत्ती नव्हतेच परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास २००१ साली कर्नाटकातील हलियाल-दंडेली या अभयारण्यातून काही हत्ती नवीन अधिवासाच्या शोधात भटकत भटकत बेळगावच्या वनक्षेत्रात आले तेथून पुढे ते सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या वनक्षेत्रात घुसले. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी धरणाच्या परिसरात असते. कधीकधी ते पुढे गोवा राज्यातही जातात. कर्नाटकातील हलियाल-दंडेली भागात कालीनदी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी आणि इतर विकास कामांमुळे हत्तींच्या पारंपारिक अधिवासाचे विखंडन झाले. त्या ठिकाणी मानवी क्रियाकलाप वाढले, त्यांच्या अधिवासावरील जैव भार वाढला. आपल्या पारंपारिक निवासस्थानात राहणे कठीण झाल्यामुळे या हत्तींना वास्तव्यासाठी नवीन जागेचा शोध घेणे भाग पडले. हत्तींकडून पिक आणि मालमत्तेचे नुकसान होत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना परत पाठविण्यासाठी सरकारी तसेच स्थानिक पातळीवर लोकांकडून बरेच प्रयत्न करण्यात आले परंतु त्यांना त्यात यश आले नाही. येथील लोकांना हत्तींची सवय नाही, त्यांच्या कित्येक पिढ्यात त्यांनी आपल्या शेतात, परिसरात हत्ती पाहिले नाहीत यामुळे त्यांचा हत्तींशी संघर्ष होतो. हा संघर्ष दक्षिण भारतातील इतर भागांसारखा तीव्र नसला तरी त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. वनविभागाने त्या दृष्टीने अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. वनक्षेत्रांचे संरक्षण करणे, नुकसान भरपाई तत्परतेने आणि पुरेशी देणे अवश्यक आहे. पिक संरक्षणासाठी सध्या येथे खंदक खोदणे, सोलार कुंपण बांधणे यांसारखे उपाय केले जात आहेत. यांबरोबरच पिक बदल, गावकऱ्यांनी समन्वयाने आणि आळीपाळीने राखण करणे, कुंपणाला मिरची पेस्ट लावणे, मिरचीचा धूर करणे, कुंपणाला हत्तींना न आवडणारी झाडे लावणे यांसारखे उपाय करता येतील. तज्ञांशी चर्चा करून पारंपारिक तसेच नाविन्यपूर्ण उपाय शोधले गेले पाहिजेत परंतु यामुळे हत्तींना इजा होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. हत्ती हे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे व लोकांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. वन्य हत्तींच्या संरक्षणासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचा वावर असलेल्या जंगल कॉरीडोर्सचे संरक्षण केले गेले पाहिजे. या क्षेत्रात जलविद्युतनिर्मिती प्रकल्प, खाणी, कारखाने, रेल्वेलाईन इत्यादी विकासकामांना परवानगी देण्यात येऊ नये यामुळे हत्तींचा अधिवास नष्ट होतो आणि त्यांचे अतोनात नुकसान होते.
याशिवाय महाराष्ट्रातील बंदिस्त हत्तींबद्दल बोलणेही अत्यंत आवश्यक आहे. हत्तीला बंदिस्तावस्थेत पाहणे ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांनी हत्तींना बंदिस्तावस्थेत ठेवले जाते. धार्मिक संस्था, भिक्षुकी करणारे, सर्कस आणि प्राणीसंग्रहालय यांच्याकडे बंदिस्त हत्ती आढळून येतात. धार्मिक संस्था धार्मिक विधी-पूजा, मिरवणूक इत्यादींसाठी हत्ती ठेवतात. हे हत्ती त्यांना एकतर दानात मिळतात किंवा त्या ते विकत घेतात. भिक्षुकी करणाऱ्या लोकांनी देशातील कोणत्यातरी भागातून हे हत्ती विकत, किंवा जंगलातून पकडून आणलेले असतात. या हत्तींना दिवसभर शहरांमधून भिक मागत फिरवले जाते. यावेळी लोक जे काही खाऊ घालतील तोच त्यांचा आहार असतो. सर्कशीतील हत्तीही अशाच प्रकारे मिळवलेले असतात. त्यांना सर्कशीत खेळ सादर करायला लावले जाते. हे खेळ किंवा क्रिया त्यांच्या नैसर्गिक क्रीयांपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्या शिकवितांना त्यांना खूप त्रास दिला जातो. या गोष्टींचा त्यांच्यावर मानसिक ताण येतो. काही दिवसांपूर्वीच पद्मा नावाची एक हत्तीण सर्कशीतील शेवटचा खेळ संपल्यावर अर्धांगवायूचा झटका येऊन पडल्याची बातमी वृत्तपत्रात आली होती (दैनिक दिव्यमराठी दिनांक १ नोव्हेंबर २०१३). प्राणीसंग्रहालयातील हत्ती हे अभयारण्यातून किंवा इतर प्राणी संग्रहालयातून आणलेले असतात. येथेही लोकांच्या करमणुकीसाठी त्यांना बंदिस्त करून ठेवले जाते. बंदिस्तावस्था ही हत्तीच्या नैसर्गिक जीवनप्रणालीच्या अगदी विरुद्ध आहे. या अवस्थेत त्यांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.
हत्तींचे संरक्षण व्हावे यासाठी वन्यजीव प्रेमी, या विषयातील तज्ञ मंडळी, संशोधक यांनी सुचविलेल्या सुधारणांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हत्ती संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. पर्यावरण पर्यटनासारखे उपाय योजल्यास स्थानिक लोकांना उत्पन्न आणि पर्यावरण संरक्षण असा दुहेरी लाभ प्राप्त करता येईल. बंदिस्त हत्तींबद्दल नियमांची कठोर अंमलबजावणी आणि जनजागृती करणे आवश्यक आहे. हत्ती आपला राष्ट्रीय वारसा आहे तो जर आपल्याला जपायचा असेल तर थोडा त्याग करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. जंगल क्षेत्राच्या आजूबाजूला असलेल्या गावांच्या नुकसान भरपाईसाठी नवनवीन उपाय योजता येऊ शकतात. सरकारसोबतच शहरी भागातील लोकांनीही यात सहभागी होऊन आपापल्या परीने मदत केली तर मानव-हत्ती संघर्ष कमी होऊ शकतो. प्रश्न मात्र एवढाच आहे कि या शरीराने बलदंड परंतु मनाने अत्यंत हळव्या प्राण्याला आपण जपू इच्छितो कि नाही? पर्यावरण आणि वन्यजीव यांची हानी करूनही आपण सुखाने जगू शकू असे जर आपण समजत असू तर तो आपला मोठा गैरसमज आहे.  
-परीक्षित सूर्यवंशी
नोट : हत्तींच्या महाराष्ट्रातील स्थितीबद्दल अमुल्य अशी माहिती दिल्याबद्दल लेखक सुपर्णा गांगुली, शकुंतला मजुमदार आणि सुभोब्रतो घोष यांचे अत्यंत आभारी आहेत.
संदर्भ : १. An overview of Asian Elephants in the Western Ghats, southern India: implications for the conservation of Western Ghats ecology Nagarajan Baskaran
२. Captive Elephants of Maharashtra: An Investigation into the Population Status, Management and Welfare SignificanceSurendra Varma, S.R. Sujata and Nilesh Bhanage, Elephants in Captivity- CUPA/ANCF Technical Report No 8

परीक्षित सूर्यवंशी 

First published
In livemint 
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा