गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

जागतिक पर्यावरणविषयक अवैध व्यापार २१३ अब्ज डॉलर्सपर्यंत: युएन अहवाल

आनंद बॅनर्जी, अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी   
पर्यावरणविषयक अपराधांवरील एका मुल्यांकन अहवालानुसार जागतिक पर्यावरणविषयक अवैध व्यापार २१३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे.
भारतात वन्यजीव व्यापारात झालेल्या प्रचंड वाढीकडे मात्र या अहवालाचे दुर्लक्ष झाले आहे - फोटो - AFP
हे पैसे गुन्हेगार, उग्रवादी, आतंकवादी गटांना मदत म्हणून पुरविले जातात आणि अनेक देशांच्या सुरक्षिततेला आणि शाश्वत विकासाला धोका निर्माण करतात. द एन्व्हायर्नमेंट क्राईम क्रायसिस नावाचा हा अहवाल युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट असेम्ब्लीच्या पहिल्या सभेत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.  
हा अहवाल आफ्रिकेतील वन्यजीव आणि वनस्पतींच्या संघटीत गुन्हेगार टोळ्यांकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील कत्तलीकडे आणि त्यानंतर चीन आणि इतर दक्षिण पूर्व एशियायी देशांशी होणाऱ्या त्यांच्या व्यापाराकडे लक्ष वेधतो. या देशांत या परकीय वनस्पती आणि प्राण्यांची मुख्य बाजारपेठ आहे. पूर्व आफ्रिकेत कार्यरत अशीच एक दहशतवादी संघटना चारकोलच्या अवैध व्यापारातून दरवर्षी ३८ ते ५६ दशलक्ष डॉलर्स कमवत असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  
याच अहवालात पुढे आफ्रिकेतील एकूण ४,२०,००० ते ६,५०,००० हत्तींपैकी दर वर्षी २०,००० ते २५,००० हत्ती मारले जात आहेत असे म्हटले आहे. ९४% गेंड्यांची अवैध शिकार झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत होते, जेथे त्यांची शेवटची सर्वांत मोठी लोकसंख्या शिल्लक आहे. गेल्या वर्षी अवैधरीत्या शिकार केल्या गेलेल्या गेंड्यांच्या शिंगांची किंमत ६३ ते १९२ दशलक्ष डॉलर्स इतकी ठरविली गेली.
मात्र हा अहवाल भारतात २००९ पासून अवैध वन्यजीव व्यापारात झालेल्या प्रचंड वाढीकडे दुर्लक्ष करतो. TRAFFIC-WWF India, द वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडीया (WPS) आणि वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो(WCCB) यांनी ही वाढ दस्तऐवजांद्वारे दाखवून दिली आहे.
९ जून रोजी झालेल्या एका बैठकीत धोरणकर्ते, वैज्ञानिक, संशोधक, संरक्षणवादी, कार्यकर्ते आणि वन विभाग तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेंगोलीन(खवले मांजर), पक्षी, कासव, शार्क्स यांच्यासारख्या काही कमी माहित असलेल्या प्रजातींच्या, ज्यांच्या अवैध व्यापाराबद्दल भारतात कमी माहिती आहे, संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची चर्चा केली. भारतात दरवर्षी अवैधरीत्या हजारो खवले मांजर, सरडे आणि कासवे मारली जातात, अंदाजे ७,००,००० पक्षी बेकायदेशीररीत्या जाळ्यात अडकवले जातात आणि ७०,००० टन शार्क्स पकडले जातात.
भारतात TRAFFIC चे प्रमुख असलेले शेखर कुमार नीरज म्हणतात, “एकीकडे जेथे अवैध वन्यजीव व्यापाराकडून भारतातील काही प्रतिष्ठित प्रजाती जसे वाघ, गेंडा यांना असलेल्या धोक्याला खूप प्रसिद्धी दिली जाते तेथे दुसरीकडे भारताच्या बऱ्याच कमी माहित असलेल्या प्रजातीही अवैध शिकारीला बळी पडून वेगाने नामशेष होत असतांना त्यांच्या नशिबी मात्र अनुल्लेखच येतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवैध व्यापाराचा भाग असल्यामुळे खवले मांजर अत्यंत संकटग्रस्त प्रजाती आहे तरीही त्यांची दुर्दशा संरक्षण आणि माध्यम वर्तुळात क्वचितच प्रसिद्ध पावते. इतर प्रजाती जसे मोनिटर लिझार्ड, मुंगूस, स्टार कासव, स्पाईनि-टेल्ड लिझार्ड, गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कासवे यांच्याकडेही ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे.”
WWF-India चे सरचिटणीस रवी सिंग म्हणतात, “आम्ही लहान असतांना पाहत असलेल्या काही प्रजाती जसे बेंगाल मोनिटर आणि खवले मांजर या त्यांच्या बऱ्याचशा मूळ क्षेत्रातून नामशेष झाल्या आहेत.”  
सी कुकुम्बर, सीहोर्सेस आणि रेड सेंड बोआ यांच्या अवैध व्यापाराच्या प्रमाणाबद्दल आणि त्याचा त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल खूपच कमी माहिती आहे.
हा अहवाल भारतात अवैध वन्यजीव व्यापारात दहशतवादी संघटना अल-कैदाचा सहभाग असल्याचे नोंदवतो. “वन्यजीव शोषण अनेक गैर सरकारी सशस्त्र गटांना मदत करते, अल-कैदाशी संबंधित स्थानिक बांग्लादेशी फुटीरतावादी; आणि भारतातील इतर उग्रवादी जमाती अवैध वन्यजीव व्यापारात गुंतलेले असल्याची नोंद आहे(हस्तिदंत,व्याघ्र अंगे, गेंड्यांची शिंगे). अल-कैदा आणि हक्कानी गट अवैध लाकूडतोड आणि त्याच्या व्यापारातून निधी उभारण्याचे आरोपी आहेत.”
या अहवालानुसार, फुटीरतावादी जमाती, बंडखोर आणि मुस्लीम अतिरेकी संघटना यांसह अनेक सशस्त्र संघटने काझीरंगा आणि त्याच्या आसपासच्या भागात अवैध शिकार करतात. या भागात जवळजवळ दोन डझन अतिरेकी संघटने सक्रीय आहेत.
यांपैकी अनेक संघटना आपला निर्वाह निधी उभारण्यासाठी उद्यानाच्या आत वाघ, हत्ती आणि गेंड्यांची अवैध शिकार करतात. असे मानले जाते कि या संघटना नेपाळ, थायलंड आणि चीन मधील गुन्हेगारी गटांशी जोडलेल्या आहेत.
द कार्बी पीपल्स लिबरेशन टाईगर्स (KPLT) अवैध शिकारीला प्रोत्साहन देते आणि तिचे आयोजन करते, यावेळी शिकाऱ्यांना शिंगांसाठी गेंड्यांना मारण्यासाठी आणि फोरेस्ट गार्डशी लढण्यासाठी एके47 दिल्या जातात.
कुकी नेशनल लिबरेशन फ्रंटच्या एका सदस्याला अटक झाल्यानंतर त्याने सहा गेंड्यांना मारल्याची कबुली दिली. २०१३ मध्ये काझीरंगामध्ये कमीतकमी ४१ गेंडे अवैध शिकारीत मारले गेले, त्याच्या आधीच्या वर्षी याच्या दुप्पट गेंडे मारले गेले. यातील जास्तीतजास्त अतिरेकी गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या एके-47 आणि .303 रायफल्सद्वारे मारले गेले.
first published:
suryavanshipd@gmail.com

@@@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा