रेडीओ-कॉलरचा सिग्नल चेक करतांना विद्या अत्रेया आणि सहकारी |
सरळधोपट नौकरी-व्यवसायाचा मार्ग सोडून तुम्ही वन्यजीवांच्या
अभ्यासाकडे कशा काय वळलात?
प्राण्यांबद्दल मला नेहमीच जिव्हाळा होता. पण पहिल्यांदा
जेव्हा मी एका जंगलात, तामिळनाडूतील अन्नामलाई जंगलात, गेले तेव्हा मला जाणवले कि
हे खरोखर असे काहीतरी आहे कि ज्याची मला खूप आवड आहे.
अभ्यासासाठी इतर कोणताच प्राणी न निवडता तुम्ही बिबट्याचीच
निवड का केली? वाघाभोवती तर फार मोठे प्रसिद्धीचे वलयही आहे.
माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय म्हणून मी बिबट्याची निवड केली
नाही. मी संघर्षाची निवड केली जो चित्ताकर्षक आहे कारण त्यात फक्त प्रण्यांचाच
अभ्यास नाहीये तर माणसांचा आणि माणूस आणि वन्यजीव यांच्या परस्परक्रियांचाही
अभ्यास आहे. याला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलू आहेत जे या अभ्यासाला खरोखरच
मनोरंजक बनवतात.
बिबट्या हा हिंस्र प्राणी आहे. त्यावर काम करतांना तुमच्या
जीवाला धोका निर्माण झाला असे कधी झाले का?
बिबट्याने मारलेल्या शेळीसोबत तिचा मालक - फोटो- विद्या अत्रेया |
नाही. तो हिंस्र होतो तेव्हा जेव्हा त्याला डिवचले जाते. जेव्हा
आम्ही या प्राण्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक
मिळू नये याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम पद्धतींचा वापर करतो. जेव्हा
एखाद्या प्राण्याला रेडीओ-कॉलर लावायची असते तेव्हा तज्ञ पशुवैद्यकांच्या
देखरेखीखाली त्याला भूल (अनेस्थेशिया) दिली जाते. अशाप्रकारे आम्ही त्या
प्राण्याचे आणि आमचेही जीवन धोक्यात घालत नाही.
तुमच्या संशोधनातून आणि इतिहासातूनही हे सिद्ध होते कि
बिबट्यासारखे वन्यप्राणी माणसांच्या आसपास शांततेने राहत आले आहेत तर आताच हा मानव-प्राणी
संघर्ष वाढलेला का दिसतो आहे आणि यावर उपाय काय?
मला नक्की नाही सांगता येणार कि खरोखरच संघर्ष वाढलाय कि
माध्यमांद्वारे संघर्षाच्या घटनांचे होणारे प्रसिद्धीकरण वाढले आहे. माध्यमे ही
मानव आणि वन्यजीव यांच्यातील नकारात्मक परस्परक्रियांना (ज्याला आपण संघर्ष
म्हणतो) मोठ्याप्रमाणावर प्रसिद्धी देतात. म्हणूनच आपल्याला असे वाटते कि
वन्यप्राणी फक्त संघर्षच निर्माण करतात. तुम्ही जर या वन्यप्राण्यांसोबत काम
करणाऱ्या लोकांपैकी कोणालाही विचारले तर ते तुम्हाला सांगतील कि भारतात
जास्तीतजास्त ठिकाणी स्थानिक लोकांनी या प्राण्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाशी
जुळवून घेतले आहे. परंतु शहरी संशोधक आणि मिडिया प्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा
कधी ग्रामीण लोकांना प्रश्न विचारतो तेव्हा फक्त संघर्षाबद्दलच विचारतो, मग
त्याचेच तेवढे वार्तांकन केले जाते. यावर काही १००% यशस्वी उपाय नसेलही परंतु हा
विषय अधिक चांगल्याप्रकारे समजून, अशा परिस्थिती
हाताळण्याच्या पारंपारिक पद्धती शिकून आपण वन्यप्राण्यांकडून आपल्याला होणारे
नुकसान कमीतकमी करू शकतो आणि हे फक्त स्थानिक लोकांशी चर्चा करूनच करता येईल.
या विषयात काम करतांनाची सर्वांत संस्मरणीय आठवण आम्हाला
सांगाल?
तशा खूप आठवणी आहेत, परंतु त्यातल्या जास्तीतजास्त अकोले
संगमनेर येथील स्थानिक वन विभागासोबत काम करतांनाच्या आहेत. एकदा आम्ही एका बिबट्याला
पिंजऱ्यात पकडले आणि त्याला रेडीओ-कॉलर लावली. तो
वनविभागाच्या नर्सरीत त्या पिंजऱ्यात शांत बसलेला होता. कोणी त्या बिबट्याजवळ जाऊन
त्याला त्रास देऊ नये म्हणून तेथे स्थानिक वन विभागाचा एक कर्मचारी थांबला होता.
त्याने मला संध्याकाळी ५:०० वाजता फोन केला आणि सांगितले कि जेव्हा तो घरी
जाण्यासाठी तेथून निघून बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबला होता तेव्हा एक पत्रकार आपल्या
मोटारसायकलवरून त्या बिबट्याच्या शोधात नर्सरीकडे गेला. आम्हाला सगळ्यांना टेंशन
आले कारण बिबट्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हला नको होता. म्हणून मी त्या
कर्मचाऱ्याला सांगितले कि तू पळत जा आणि तो पत्रकार बिबट्याला काही उपद्रव करणार
नाही याची खात्री कर. मी तेथे थोड्यावेळाने पोहचले. तेथे गेटवर काही पहारेकऱ्यांची
मुले बसलेली होती त्यांनी मला सांगितले कि त्या पत्रकाराने त्यांना बिबट्या कोठे
आहे म्हणून विचारले आणि त्यांनी त्याला सांगितले कि त्याला तर कधीच येथून घेऊन
गेले. आणि खास म्हणजे त्यांनी ते अगदी निर्विकार चेहऱ्याने सांगितले. मग आम्ही
त्या मुलांना एक किलो जिलेबीची मेजवानी दिली. ज्या मला नेहमी स्मरणात राहतील अशा, ज्यात माणूस आणि बिबटे दोघांचाही समावेश आहे अशा माझ्या
आठवणीतील गमतीदार घटनांपैकी ही एक.
बिबट्याच्या हल्ल्यात कुटुंबातील एखादा सदस्य गमावलेल्या
कुटुंबाला तुम्ही कधी भेटला आहात का? त्यांची प्रतिक्रिया कशी होती?
बिबट्याद्वारे मारला गेलेला कुत्रा – फोटो - विद्या अत्रेया |
हा या कामाचा सर्वांत दुःखद भाग आहे जो मला आवडत नाही. पण
या प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अशा घटनांचा इतिहास नाही अशा भागात
लोक गोंधळलेल्या मनःस्थितीत असतात आणि काही भागांत जेथे मोठ्या प्रमाणावर माणसांवर
हल्ले होतात (जसे उत्तराखंड राज्यात) तेथे लोक रागावलेले असतात.
वन्यप्राण्यांसोबत काम करतांना एखाद्या प्राण्याचा लळा
लागला असे कधी झाले का?
नाही. मी या क्षेत्रात एक प्रोफेशनल म्हणून काम करते, मी
बिबट्यावर “प्रेम” करते म्हणून नाही. प्रत्येकाची अशी अपेक्षा असते कि मी
बिबट्यावर “प्रेम” करावं. मला वाटत तुम्ही ज्या प्रजातीवर काम करत आहात तिच्यात
भावनिकरित्या गुंतणे हे कधीकधी तुमच्या संशोधनासाठी नुकसानकारक ठरू शकत कारण मग
तुम्ही त्या प्रजातीबद्दल पक्षपाती होऊ शकता. मी जेव्हा बिबट्यासारख्या एखाद्या
प्रजातीवर, जी माणसांच्या आसपास राहते, काम करत असते तेव्हा मी बिबट्याला
माणसांपेक्षा जास्त महत्त्व देऊ शकत नाही.
मायक्रोचीप, रेडीओ-कॉलर या वस्तूंचा वन्यप्राण्यांना त्रास
होत नाही का?
होऊ शकतो पण तेवढाच जेवढा आपल्याला एखाद्या सोन्याच्या
साखळीच्या वजनाचा किंवा घ्याव्या लागलेल्या एखाद्या इंजेक्शनचा होतो. परंतु हे
अत्यंत गरजेचे आहे कारण वन्यप्राणी हे खूपच बुजरे असतात, विशेषकरून
मार्जारवर्गातील मोठे प्राणी. माणसांच्या सहवासात राहणाऱ्या या प्राण्यांबद्दल
आपल्याला पुरेशी माहिती असेल तरच आपण त्यांना अधिक चांगल्याप्रकारे हाताळू शकतो. तुम्हाला
जर अत्यंत गूढ स्वभावाच्या अशा या प्रजातींचा अभ्यास करायचा असेल तर या पद्धतींचा
वापर करणे हाच एकमेव मार्ग आहे. एक संशोधक म्हणून मी मला शक्य असेल तितक्या
चांगल्या पद्धतीने या प्राण्यांना वागवण्याचा प्रयत्न करते.
या क्षेत्रात इतके झोकून देऊन काम करतांना आपले कौटुंबिक, सामाजिक
संबंध सांभाळण्यात काही अडचणी आल्या का?
मी स्वतःला पूर्णपणे या कामाला समर्पित केलेले नाही. मला
कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आहेत याचे मला भान आहे. तुम्ही असे म्हणू शकता कि
कामाच्या वेळेत मी शक्य असेल तितके अधिक काम करते तितकेच जितके एखादा सामान्य
माणूस करेल मात्र त्यापेक्षा जास्त नाही.
तुमचे असे काही
विशिष्ट तत्त्वज्ञान किंवा जीवनाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी आहे का जिची
तुम्हाला तुमच्या या कामात मदत झाली?
बिबट्याच्या पावलांचे उमटलेले ठसे – फोटो - विद्या अत्रेया |
सर्वांना समानतेची वागणूक देण्यावर माझा विश्वास आहे. मला
वाटत जीवन जगण्याचा हा मुलभूत मार्ग आहे कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा लोकही
तुम्हाला चांगली वागणूक देतात.
बिबट्यासारख्या प्रजातींबद्दल सामान्य लोकांच्या
प्रतिक्रियांविषयी तुम्हाला त्यांना काय संदेश द्यायला आवडेल?
स्थानिक लोक जे या प्राण्यांच्या सहवासात राहतात त्यांनी
रात्रीच्या वेळी आपली गुरेढोरे चांगल्या गोठ्यात ठेवणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून
त्यांचे नुकसान कमीतकमी होईल. आणखी एक मी असं म्हणेन कि सर्व वन्यप्राणी माणसांना टाळण्याचा
अगदी आटोकाट प्रयत्न करतात. जर आपण त्यांच्या त्यांच्या स्पेसचा आदर केला तर तेही
आपल्यापासून अंतर राखून राहतील.
-परीक्षित सूर्यवंशी
First published in http://paryavaran.org/
First published in http://paryavaran.org/
suryavanshipd@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा