बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

बिबटे लाजाळू असतात, आक्रमक नाही

विद्या अत्रेया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
वन्यजीवांबद्दलची आपली कल्पना ही बऱ्याचदा वास्तवाशी विसंगत असते. काहीवेळेस ती एखादी साप्ताहिक सुट्टी जंगलात घालवून मिळालेल्या अनुभवावर आधारित असते. आपल्या काँक्रीटच्या जंगलातून निघून आपण चहूबाजूंनी हिरवेगार जंगल असलेल्या आरामदायी आणि रुबाबदार रिसोर्टमध्ये चेक-इन करतो. ड्रिंक्स, एअर कंडिशनरमधून येणारी वाऱ्याची मंद हळुवार झुळूक, आरामदायी बिछाणे यांच्यासह होणारे आल्हाददायक स्वागत. जंगलाच्या हिरव्या, तपकिरी रंगांच्या विविध छटांमधून मजेदार सफारी, काही व्याघ्र दर्शने, सूर्यास्त झाल्यावर परती, मनसोक्त जेवण, ड्रिंक्स आणि आपण आपल्या छान स्वच्छ बिछाण्यावर परत! आपण किती संतुष्ट होतो ना? भारत खरच किती आश्चर्यकारक आणि सुंदर देश आहे! वन्यजीवांसोबत राहण्याची ही खरोखरच सर्वोत्तम पद्धत आहे, नाही? – ज्यात तुम्ही त्यांच्या जागेवर पायही ठेवत नाहीत. तुम्ही त्यांना पाहता चारचाकीच्या सुरक्षित काचेतून. त्यांच्याशी जवळून संबंध न येताच तुम्ही त्या जागेवरून बाहेर पडता आणि तरीही तुमच्या सोबत राहतात जबरदस्त आठवणी. वन्यजीवन हे खूपच चित्ताकर्षक आहे, आपल्याला ते हवे आहे, ते आपल्याला आराम देणारे आणि आपल्या आत्म्याला संतुष्ट करणारे आहे पण कदाचित फक्त शहरी आत्म्यांनाच.

ग्रामीण भारतीयांसाठी मात्र वन्यजीव हे खूप काळोख्या, कधीकधी रक्तरंजित लाल छटा घेऊन येणारे आहेत. एकीकडे ते दोन वेळच्या भाकरीसाठी धडपडत करत असतांना हत्ती, बिबटे, नीलगाय यांसारख्या विविध वन्यजीव प्रजाती त्यांच्या पिकांच नुकसान करतात, त्यांची गुरेढोरे मारून टाकतात. हे लोक नेशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी चेनलद्वारे गौरवांवित एलईडी टीव्हीच्या स्क्रीनवर हे प्राणी पाहत नाहीत, हे त्यांना पाहतात आपल्या शेजारी! हे लोक या प्राण्यांसोबत आपला परिसर शेअर करतात. ग्रामीण भारतीयांना वन्य प्राणी त्यांच्या सोबत राहतात हे माहित आहे. तरसाच्या आईला आपल्या तीन पिल्लांसह जाताना ते पाहतात, ते उसतोडी करत असलेल्या शेतात बिबट्याची पिल्ले आहेत हे त्यांना माहित असते, हत्तींद्वारे आपली घरे तुटतांनाही ते पाहतात. असे असूनही ते या प्राण्यांना मारत नाहीत. याचे कारण म्हणजे कठोर कायदे आणि फक्त भारतीयांमध्येच दिसून येणारी अगाध सहनशीलता यांचे मिश्रण.  
गुरव धनगर आपला कुत्रा आणि मेंढ्यांसोबत
ही समस्या जरी साधी सोपी वाटत असली तरी शहरी लोकांनी वन्यप्राण्यांना आपल्या कल्पनेच्या लोलकातून पाहणे आणि ग्रामीण लोकांनी आपल्या घर अंगणातील बिबटे, लांडगे आणि हत्तींसारख्या प्रजातींसह जीवन जगणे याचे परिणाम खूपच गंभीर होऊ शकतात. नीती आणि धोरणे ही शहरी लोकांकडून ठरवली जातात आणि परिणाम मात्र घातक प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. बिबट्याचेच उदाहरण घ्या. बिबट्यांबद्दल आपल्याला जे काही माहित आहे ते मुख्यतः दोन स्त्रोतांकडून – प्रसारमाध्यमे आणि जिम कॉर्बेट. यांतील पहिले बिबट्यांचे माणसांवरील आणि/अथवा माणसांचे बिबट्यांवरील हल्लेच तेवढे अधिकाधिक प्रसिद्ध करतात. आणि दुसरे हे नरभक्षी बिबट्यांना मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापेक्षा जास्त आपण काही जाणतही नाही आणि जे जाणतो त्यातील सत्यासत्याची उलटतपासणीही करत नाहीत. आपण हेच स्वीकार करून घेतो कि कॉर्बेट बरोबर होते आणि एक सर्रास मत बनवतो कि सगळे बिबटे हे आक्रमक आणि मानवी रक्तासाठी आसुसलेले असतात. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही परीसंस्थांच्या अभ्यासाकडे पाहाल ज्यात बिबटे मानवांच्या सहवासात आले आहेत तेव्हा तुम्हाला एखाद दुसरा बिबट्याच असा असल्याचे समजेल. बिबट्या हा एक खूपच लाजाळू प्राणी आहे आणि म्हणूनच त्याचा अभ्यास करणे हे ही वाटते तेवढे सोपे काम नाही. त्यांचा जीवनक्रम आणि अधिवास अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला एक साधन मदद करते ते म्हणजे कॉलर आयडी. एकीकडे जेथे आफ्रिकेत आणि इतर देशांत शेकडो बिबटे आणि सिंहांना कॉलर आयडी लाऊन त्यांचा अभ्यास केला गेला आहे तेथे दुसरीकडे भारतात हा आकडा १० पेक्षाही कमी आहे. आपल्याला जे माहित नाही ते आपल्याला कधीच समजणार नाही. वैज्ञानिक तथ्यांऐवजी लोकांच्या मतांवर आधारित समजूत ही अशाप्रकारच्या व्यवस्थापन निर्णयांना कारणीभूत ठरू शकते जे मनुष्य आणि वन्यप्राणी दोघांसाठी धोकादायक ठरू शकतील.

जिम कॉर्बेट यांनी गढवाल आणि कुमाऊमध्ये बरेच नरभक्षी वाघ आणि बिबटे मारले होते. नंतर त्यांनी बंगालच्या वाघासाठी व्याघ्र अभयारण्य निर्माण करण्यात मदद केली. १९५७ मध्ये या उद्यानाचे त्यांच्या नावावरून पुनर्नामकरण करण्यात आले, त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी.  







माणसे टाळण्यासाठी बिबटे खूपच प्रयत्नशील असतात. त्यांची समस्या ही आहे कि ते अत्यंत संयोजनक्षम प्राणी आहेत आणि ते माणसांच्या अगदी जवळ राहू शकतात. विकसित देशांमध्ये माऊन्टन लायन, अस्वले आणि कोयॉट (उत्तर अमिरिकेत आढळून येणारा लांडग्यासारखा एक जंगली कुत्रा) हे असेच करतात. ते शहरी भागांतील जीवन अंगवळणी पाडून घेतात. ते टाकून देलेले अन्न आणि पाळीव प्राण्यांच्या अन्नावरही गुजराण करून घेतात. भारतात लांडगे, बिबटे, तरस, कोल्हे आणि जेकॉल हे सुद्धा असेच ग्रामीण लोकांच्या आसपास राहत जगतात. परंतु येथे वन्यजीवनाबद्दलची शहरी कल्पना बिबटे हे फक्त जंगलातच आढळून येतात अशी आहे ते लोक मानवी वस्त्या या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या बिबट्या सारख्या मांसाहारी प्राण्यांसाठी खाद्यानुकुल असतात हे समजून घेण्यास असमर्थ असतात. याचे कारण म्हणजे भारतात उपलब्ध असलेल्या गुरेढोरे(गाय-बैल, बकऱ्या, मेंढ्या) आणि पाळीव पशुंचे(कुत्रे, मांजरी) मोठे प्रमाण जे जंगली मांसाहारी प्राण्यांचे खाद्य आहेत. एखादा बिबट्या एखाद्या झाडावर अगदी शांतपणे जरी बसलेला दिसला तरी लगेच तमाशा सुरु होतो, वृत्त वाहिन्यांचे पत्रकार त्याठिकाणी उड्या घेतात आणि माणसांची झुंड तयार होते. ही झुंड नंतर नियंत्रणात आणता येत नाही आणि जास्तीत जास्त वेळेस बिबट्या यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. असे करतांना त्याच्याकडून काही लोकांना इजा होते आणि मग त्यांना जणू त्या बिबट्याला मारायचा अधिकारच मिळतो. आणि हा सगळा प्रकार टीव्हीवर सारखा झळकत असतो.

केॅमेरा ट्रॅपने घेतलेले छायाचित्र

बिबटे हे अत्यंत लाजाळू असतात, त्यांचा उपजत स्वभाव हा माणसांना टाळण्याचा असतो. ते माणसांवर हल्लाही करतात आणि त्यांना आपले भक्ष्य बनवतात, साधारपणे लहान मुलांना. परंतु प्राप्त भूभागावरील त्यांच्या संख्येचा विचार करता हे हल्ले फारच विरळ आहेत मात्र तेच जास्तीतजास्त प्रसिद्ध केले जातात. अशाप्रकारचे खळबळ उडवून देणारे वार्तांकन हे फक्त बिबट्यांचेच नव्हे तर माणसांचेही मोठे नुकसान करू शकते. जास्तीतजास्त भीती निर्माण केली गेली कि लोकांकडून त्यांना आपल्या परिसरातून काढून टाकण्याची मागणीही वाढायला लागते. वन विभाग दबावाखाली येऊन या प्राण्यांना पकडून जवळच्या जंगलात सोडून देते. परंतु बिबट्याच्या मूळप्रकृतीमुळे ही समस्या आणखीनच बिघडते. बिबट्या हा एक अत्यंत स्थाननिष्ठ प्राणी आहे. प्रौढ बिबटे आपले घर सोडत नाहीत. आता जर अशा एखाद्या प्राण्याला पकडून ४०० कि.मी. दूरही नेऊन सोडले तरी तो परत आपल्या घरी येण्याचा प्रयत्न करतो. असे प्राणी नवीन आणि अनोळखी प्रदेशांतून परतीचा प्रवास करतात आणि भारतात जेथे मानवी लोकसंख्येची घनता ३०० प्रती चौ.कि.मी.पेक्षाही जास्त आहे, संघर्षाची शक्यता वाढते. पुढे असेही म्हटले जाते कि त्यांना मारूनच टाका. परंतु ताजे संशोधन असे दर्शविते कि या मोठ्या मार्जारवर्गातील प्राण्यांना मारल्यामुळे आणखी समस्या निर्माण होतात. कारण रिकाम्या झालेल्या क्षेत्रांवर लहान प्राणी येऊन वस्ती करतात जे १०० कि.मी. दुरूनही येऊ शकतात आणि ते त्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे समस्या अधिकच वाढतात.

याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे कि बिबट्याची आई ही आपल्या जीवनाचा मोठा भाग आपल्या पिल्लाची काळजी करण्यात आणि त्याला शिकविण्यात घालविते. ती आपल्या पिल्लांसोबत अडीच वर्षे राहते आणि आपल्या पिल्लांना मानववस्ती असलेल्या भूप्रदेशांत माणसांना कसे टाळावे, शिकार कशी करावी इत्यादी गोष्टी शिकविते. जर आईला काढून टाकले तर अननुभवी तरुण प्राणी समस्या निर्माण करू शकतात. अशाप्रकारे त्यांचा समाज आणि त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या आपल्या अज्ञानामुळे आपण स्वतःसाठी एक जास्त मोठी समस्या निर्माण करू शकतो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बिबट्यांना मानवी वस्तीतून पकडून जेथे जंगलात सोडले जाते तेथे माणसांवर हल्ले होतात.

देशव्यापी धोरणाचा विचार केला तर संरक्षित क्षेत्रांवरच जास्तीतजास्त लक्ष केंद्रित केले जाते. संरक्षित क्षेत्रे ही महत्त्वाची असली तरी त्यांची काळजी करायला कर्मचाऱ्यांची अख्खी फौज असते. परंतु जे वन्यप्राणी दीर्घक्षेत्रव्यापी आहेत, मानवी वस्ती असलेल्या भूप्रदेशांत राहतात आणि मानवांच्या संपर्कात येतात त्यांच्या परिसंस्था आणि वर्तणुकीविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. अशाप्रकारे माहितीचा अभाव हा अशा प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या माणसांसाठी अहितकारक आहे. याच्या भरीला तो ग्रामीण भारतीयांमध्ये वन्यप्राण्यांविषयी असलेली सहनशीलताही कमी करतो. जगात इतरत्र कोठेही तुम्हाला इतकी दाट मनुष्यवस्ती आणि इतके विविध प्रकारचे वन्यप्राणी एकत्र नांदतांना दिसणार नाहीत. जर आपण आपली समज वाढविण्याची गरज वेळीच ओळखली नाही तर आपल्या प्राचीन संस्कृतीच्या या भागाशीच नव्हे तर या प्राण्यांसोबत राहणाऱ्या लोकांच्या हिताशीही आपल्याला तडजोड करावी लागेल. 

लेखिका या वाईल्डलाईफ स्टडीज बेंगलोर येथे वाईल्डलाईफ बायोलॉजीस्ट आहेत ज्यांच्या संशोधनाची पर्यावरण आणि वन मंत्रालयाला मानव-बिबटे संघर्ष कसा हाताळावा यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे तयार करतांना मदद झाली.  
विद्या अत्रेया यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्या खालील संकेतस्थळांना भेट देऊन!
http://wcsindia.org/home/ 
suryavanshipd@gmail.com
@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा