रविवार, १९ जुलै, २०१५

अंबोलीचा ईमेमल प्रकल्प!

आरेफा जोहरी, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

ई मेमल प्रकल्पाचे उद्दिष्ट जंगल भागात राहणाऱ्या शालेय विध्यार्थ्यांना केमेरा ट्रॅप्सद्वारे स्थानिक प्राण्यांचा अभ्यास करायला शिकवणे आहे. या प्रकल्पातून वन्यजीवांची मनमोहून टाकणारी अनेक आश्चर्यकारक छायाचित्रे मिळाली.


महाराष्ट्रातील अंबोलीत केमेरा ट्रेपमध्ये कैद झालेला बिबट्या. सर्व छायाचित्रे : ई मेमल प्रकल्प
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली गावच्या रहिवाश्यांना हे माहिती तर होते कि आंबोलीच्या जंगलात वाघ आणि बिबटे राहतात परंतु ते गावाच्या इतक्या जवळ येतात हे त्यांना माहिती नव्हते. त्यांना हे तेव्हा समजले जेव्हा स्थानिक शाळेतील मुलांनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात केमेरा ट्रॅप्स बसवले आणि रात्री उशिरा बिबटे गावाजवळ येतात एवढेच नव्हे तर ते येथील माणसे वापरत असलेल्या रस्त्यांवरूनही फिरतात याचे छायाचित्रांच्या रूपाने स्पष्ट पुरावे दिले.




इन्फ्रारेड आणि मोशन सेन्सरयुक्त केमेरा ट्रॅप्स भारतात मुख्यत्वे संकटग्रस्त वाघांच्या संख्येवर नजर ठेवण्यासाठी वापरले जात आलेले आहेत. परंतु अंबोलीचे गावकरी त्यांचा वापर रानडुक्कर, उदमांजर, गवा आणि स्थानिक हरीण या प्राण्यांची, जे सहसा नजरेस पडत नाहीत, चित्ताकर्षक छायाचित्रे काढण्यासाठी करत आहेत.

लहान मुले आणि सामान्य नागरिकांनी छायाचित्रे आणि व्हिडीओद्वारे आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अध्ययन करावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उपक्रम आखण्यात आला - ई मेमल. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून पश्चिम घाटातील या डोंगराळ, निसर्गरम्य आणि जैवविविधतेते नटलेल्या ठिकाणी केमेरा ट्रॅप्स बसवण्यात आले. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ ई मेमलच्या वेबसाईटवर आणि फेसबुक पेजवर अपलोड केली जातात.

तीन वर्षांपूर्वी नॉर्थ कॅरोलाईना म्युझिअम ऑफ नेचरल सायन्सेसने हा प्रकल्प अमेरिकेत सुरु केला आणि गेल्या वर्षी मेक्सिको आणि भारत या दोन देशांत त्याचा विस्तार करण्यात आला.
भारतात ई मेमल हा प्रकल्प बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने राबवला जात आहे. यात सिंधुदुर्ग, पालघर आणि नागपूरमध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्रातील तीन शाळांची निवड केली आहे. अंबोली येथे मलबार नेचर कन्झर्वेशन क्लबने, जे या क्षेत्रात गेल्या १२ वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचे काम करीत आहेत, या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. यासाठी लागणारी साधने बीएनएचएसने पुरविली. राष्ट्रीय स्तरावर या प्रकल्पाचे समन्वयन बीएनएचएस करत आहे.  




“या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्राण्यांच्या सवयी, अधिवास आणि वर्तनाच्या अभ्यासातून मुलांना त्यांच्या परिसरातील प्राणी समजून घेण्यास मदत करणे हा आहे.” असे बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे अभिरक्षक आणि ई मेमलचे भारतातील अध्यक्ष राहुल खोत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “हा एक ‘नागरिक वैज्ञानिक’ प्रकल्प असल्यामुळे कधीकधी आम्हाला स्थानिक प्राण्यांबद्दल व्यावसायिक संशोधकांपेक्षाही अधिक माहिती मिळते.”


भारतातील काही क्षणचित्रे
२०१४ च्या मध्यात, खोत आणि नॉर्थ कॅरोलाईना येथील तज्ञांच्या एका टीमने उपरोक्त तीन शाळेतील शिक्षक आणि विध्यार्थ्यांना व्यावसायिक केमेरा ट्रॅप्स कसे लावावेत आणि त्यांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले आणि लवकरच सस्तन प्राण्यांच्या रहस्यमय विश्वाचे दर्शन, विशेषतः रात्रीच्या समयीच्या, व्हायला लागले.


पवनी, नागपूर येथील विध्यार्थी केमेरा ट्रेप कसा लावावा हे शिकतांना
“गेल्या सहा महिन्यांत आमच्या मुलांनी केमेरा ट्रॅप्सद्वारे सस्तन प्राण्यांच्या कमीतकमी १० ते १२ प्रजातींची छायाचित्रे घेतली आहेत, ज्यातील काही त्यांनी पूर्वी कधीच पाहिलेल्या नव्हत्या.” असे अंबोली येथील युनियन पब्लिक स्कूलचे शिक्षक प्रसाद गावडे म्हणाले. या शाळेतील सहावी ते आठवीची मुले दर रविवारी ई मेमल प्रकल्पांतर्गत जंगलभेटीवर जातात. या शाळेला तीन केमेरा ट्रॅप्स देण्यात आलेले आहेत. ते हे केमेरा ट्रॅप्स वेगवेगळ्या ठिकाणी एका वेळी एका आठवड्यासाठी ठेवतात. गेल्या काही महिन्यांत त्यांनी आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील १६ ठिकाणी केमेरा ट्रॅप्स लावले आणि पुढील सहा महिन्यांत आणखी बऱ्याच ठिकाणी ते लावण्याची त्यांची योजना आहे.


नागपूर जिल्ह्यात आढळून आलेला रिंग टेल्ड स्मॉल इंडिअन सिव्हीट

गावडे यांच्या विध्यार्थ्यांना आढळून आलेली सर्वांत मजेशीर गोष्ट म्हणजे जंगलाच्या आजूबाजूचे तेच रस्ते प्राणी वापरतात जे माणसे वापरतात – त्यांच्या वापराच्या वेळा वेगळ्या असतात एवढेच!
नागपूरमधील पवनीयेथील जय सेवा आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाघांबद्दल हाच पाठ शिकला. त्यांचे गाव काही संरक्षित व्याघ्र क्षेत्रांतर्गत येत नाही तरीही त्यांच्या केमेरा ट्रॅप्समध्ये दोन पट्टेरी वाघ रात्रीच्या वेळी त्याच रस्त्यावरून फिरतांना दिसले ज्यावरून दिवसा स्थानिक लोक ये-जा करत असतात.
नॉर्थ कॅरोलाईना म्युझिअम ऑफ नेचरल सायन्सेसच्या बायोडायव्हर्सिटी लॅबचे संचालक, रॉलेंड केय्स म्हणाले, “दोन व्याघ्र उद्यानांदरम्यान ये-जा करण्यासाठी वाघ कोणत्या असंरक्षित जोडमार्गांचा वापर करतात याचा शोध लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या शालेय मुलांनी ही माहिती मिळविण्यासाठी मदत केली हे पाहून खरंच आश्चर्य वाटते.”


नागपूरमध्ये वाघ माणसे वापरत असलेला रस्ता वापरतांना आढळून आले

मुलांना निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ई मेमल हा प्रकल्प अत्यंत परिणामकारक ठरला असल्याचे गावडे म्हणाले. ते म्हणतात, “मुलांना आता जंगल नष्ट झाल्यास उद्भवणाऱ्या धोक्याची जाणीव झाली आहे कारण यामुळे कोणते प्राणी बेघर होतील हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.”    

अमेरिका आणि मेक्सिकोत
महाराष्ट्राच्या शाळेतील विध्यार्थी आपल्या अमेरिका आणि मेक्सिकोतील समकक्ष मित्रांशी अधूनमधून संवाद साधतात. यात ते एकमेकांना आपापल्या परिसरात घेतलेली सस्तन प्राण्यांची छायाचित्रे दाखवतात आणि त्यांच्याबद्दल माहित झालेल्या गोष्टी सांगतात.


मेक्सिकोतील गुडालाजरायेथे एक जागुआरूंडी एका खारीची शिकार करतांना. ही रानमांजर सहसा माणसांना दिसत नाही त्यामुळे हा फोटो पाहून विध्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटले. 

युएसएमधील व्हर्जिनिया प्रांतातील एका जंगलातील अस्वले.

अंबोलीतील आठव्या वर्गात शिकणारा पार्थ भिसे म्हणतो, “दुसऱ्या देशातील प्राणी पाहणे ही खरोखर खूपच मजेदार गोष्ट आहे. अमेरिकेतील बॉबकेट हा माझा आवडता प्राणी आहे.” या प्रकल्पाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढच्या महिन्यात आपल्या शिक्षकांसोबत नॉर्थ कॅरोलाईनाला जाण्यासाठी पार्थची निवड झाली आहे.


नॉर्थ कॅरोलाईनात केमेरा ट्रेपमध्ये कैद झालेली एक बॉबकेट

केमेरा ट्रेपकडे जिज्ञासेने पाहतांना व्हर्जिनियातील कोयॉट्स

suryavanshipd@gmail.com
@@@@


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा