सोमवार, १५ जून, २०१५

जैवविविधतेचा बळी देऊन केलेला विकास धोकादायक

गिरीश पंजाबी, झिअस पुरस्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना
गिरीश अर्जुन पंजाबी हे वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी इंडिया आणि नेशनल सेंटर फॉर बायोलॉजीकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या पद्युत्तर अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. सह्याद्री भागातील वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या संशोधन आणि प्रयत्नांसाठी आताच त्यांना कार्ल झिअस वन्यजीव संवर्धन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा हा एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे. विख्यात लेखक आणि व्याघ्र संवर्धनात मोलाचे योगदान असलेले वाल्मिक थापर यांच्या अध्यक्षतेखालील समिती या पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड करते.
मांसाहारी प्राण्यांच्या परिसंस्थांचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, विज्ञानाधारित संवर्धन या गोष्टींत गिरीश यांना विशेष रुची आहे.

वन्यजीव अभ्यास आणि संवर्धन या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात?
राजस्थानातील सवाई मानसिंग वन्यजीव अभयारण्यातील बलास, जो आता रणथंबोर व्याघ्रप्रकल्पाचा भाग आहे, या ठिकाणी असतांना मला पहिल्यांदा ही जाणीव झाली कि माझी या क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यावेळी मी अगदी नवशिक्या होतो परंतु दहा दिवस वन संरक्षक म्हणून काम करतांना मला ते शिकायला मिळाले जे शिकण्याची मला खरोखर खूप इच्छा होती. एके दिवशी खूप पाउस पडून गेला होता, तेथील इतर मंडळीसोबत मी एका टेकडीवर बसून सूर्यास्त पहात होतो, मला वाटत त्याच वेळी मी मनाशी निश्चय केला कि मी याच क्षेत्रात काम करीन. २००८ मध्ये माझ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मी एनसीबीएस आणि डब्ल्यूसीएस-इंडिया यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड केली. हा अभ्यासक्रम निसंशयपणे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.   


पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना सादर करावयाच्या शोध प्रबंधासाठी तुम्ही कोल्ह्याची निवड का केली? या संशोधनातून तुम्हाला काय आढळून आले? 
कोल्हा हा प्राणी नेहमीच माझ्या आवडीचा राहिला आहे. मला या सर्वांत लहान श्वानवर्गीय प्राण्याबद्दल अधिक जाणून घेण्याची खूप इच्छा होती. मला आठवत मी माझ्या एका मित्राबरोबर मे महिन्याच्या तळपत्या उन्हात राजस्थानभर या प्राण्यांच्या शोधात बाईकवरून फिरलो होतो. उत्तर-पश्चिम भारतात आढळून येणाऱ्या वाळवंटी कोल्हा या प्रजातीच्या शोधात आम्ही राज्यभरात १२०० किलोमीटर्सचा प्रवास केला. जेव्हा प्रबंधासाठी विषय निवडण्याची वेळ आली तेव्हा मला ती निवड करणे अजिबात अवघड गेले नाही कारण मला कशाचा अभ्यास करायचा आहे हे माझ्या डोक्यात स्पष्ट होते. मी सोलापूर मधील माळढोक (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) अभयारण्याजवळील मानवी वास्तव्य असलेल्या प्रदेशांत भारतीय कोल्ह्यांच्या निवास-निवडीचा अभ्यास करायचे ठरविले.
आम्हाला असे आढळून आले कि जेथे कृषी क्षेत्र आहे अशा विस्तृत भागात निवासासाठी कोल्हे मोठ्या प्रमाणावर गवताळ प्रदेशाची निवड करतात. जेव्हा क्षेत्र संकुचित असते तेव्हा दृष्टीक्षेपात येणारा परिसर, उंदीर, घुशी इत्यादी खाद्याची उपलब्धता, बांध, विहिरी इत्यादींसारख्या मानव-निर्मित संरचना या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भारतात आज गवताळ प्रदेश अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत आणि या प्रजातीसाठी गवताळ प्रदेशच सर्वांत महत्त्वाचा अधिवास असल्याचे आम्हाला आढळून आले आहे मात्र परिस्थितीशी जुळते घेण्यासाठी या प्राण्यांनी मानव-निर्मित संरचनांचा आधार घ्यायला सुरुवात केल्याचे दिसून आले.

संशोधन आणि वन्यजीव अभ्यासासाठी तुम्ही उत्तर पश्चिम घाटाची निवड का केली?
एकतर मला खूप आकर्षक वाटला तो भाग! हा प्रदेश खूप वेगळा आहे. दक्षिण पश्चिम घाट मी बघितलेला आहे पण येथील वनस्पती वेगळ्या आहेत. येथल्या वन्यजीव, सस्तन प्राण्यांवर म्हणावा तितका अभ्यास झालेला नाहीये, हीच गोष्ट माझ्यासाठी प्रेरणादायक ठरली. आता जस जस माझं काम पुढे सरकतंय मला जाणवतंय कि या प्रदेशात अभ्यासाला भरपूर वाव आहे. यामुळे माझ्या रुचित आणखी वाढ होत आहे. जर मी अजून थोडी वर्ष या भागात काम केल तर येथील वन्यजीव संवर्धनात मला चांगले योगदान देता येईल असे वाटते.
हा प्रदेश कोयना वन्यजीव अभयारण्यापासून गोवा कर्नाटका सीमेपर्यंत पसरलेला आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश होतो. हे साधारणपणे ७००० चौ.किमी क्षेत्र आहे. यात प्रचंड जैवविविधता आहे.

गिरीश, वन खात्यातील कर्मचाऱ्यासोबत कॅमेरा ट्रॅप बसवतांना

या भागात बरेच पवनचक्की प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
हा प्रदेश वन्यजीवांसाठी आश्रयस्थान आहे. तोही जर आपण विकासाच्या नावाखाली अतिक्रमित केला तर त्याचे परिणाम वाईट होतील. या प्रकल्पांसाठी जंगलतोड करावी लागेल, जंगलातून रस्ते निर्माण करावे लागतील यामुळे वन्यजीवांना खूप त्रास होईल. अशाप्रकारे जंगल आणि त्यात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांचे जीवन उध्वस्त करून प्राप्त केल्या गेलेल्या उर्जेला कोणत्या दृष्टीने शाश्वत उर्जा किंवा ग्रीन एनर्जी म्हणता येईल? या ठिकाणी केवळ पक्ष्यांच्याच जवळजवळ २०० प्रजाती आहेत. शासनाला याबद्दल सांगितले गेले पाहिजे. लोकांना जागरूक केले पाहिजे.
तिल्लारी क्षेत्राचच एक उदाहरण पहा. तेथे जवळपास ७०० एकरभर रबर लागवड पसरलेली आहे. २००१ मध्ये याच परिसरात एक वाघाच पिल्लू सापडलं होत. तरीही ती जमीन रबर लागवडीसाठी विकून टाकण्यात आली. (त्या पिल्लाला प्राणी संग्रहालयात ठेवले होते. दोडामार्गमध्ये सापडला म्हणून त्याच नावही दोडा ठेवण्यात आल होत.)
आता परिस्थिती थोडी बदलली आहे. आम्ही तेथे केमेरे वगैरे लावले आहेत. पुरावे आहेत म्हणून आशा वाटते कि या पुढे तरी असे होणार नाही.

तुमचे प्रकल्प आणि तुमच्या आवडीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील वन्यजीव क्षेत्रांना तुम्ही भेटी दिल्या आहेत. याबाबतीत तुमचे निरीक्षण काय आहे? एकंदरीत परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटते?
वन्यजीव आणि त्यांचे अधिवास या बाबतीतील भारताचे वैविध्य प्रचंड आणि नेत्रदीपक आहे. एक देश म्हणून आतापर्यंत ही जैवविविधता जपण्यासाठी आपण केलेले प्रयत्नही खरोखर प्रशंसनीय आहेत. पण अचानक मला आता अस वाटायला लागल आहे कि गोष्टी बदलताहेत, आपल्या या वन्यजीव वारश्याबद्दलचे आपले प्रेम कमी होतांना दिसते आहे. मी जेथे कोठे जातो तेथे मला ‘विकासाच्या’ गप्पा ऐकायला मिळतात, वन्यजीवांचे अधिवास विखंडीत होत आहेत, जैवविविधता नष्ट होत आहे. या नाशामुळे भविष्यात आपल्याला कोणता दिवस पहावा लागेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही.

उत्तर पश्चिम घाटात मोठे मांसाहारी प्राणी यांच्या क्षेत्रव्याप्तीवरील (ऑक्युपन्सी) एका प्रकल्पावर तुम्ही काम केले आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा.
हो. मी डॉ. अद्वैत एडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर काम केले. यात आम्ही उत्तर पश्चिम घाटात वाघ, बिबटे, ढोले आणि अस्वल किती क्षेत्र (ऑक्युपन्सी) व्यापून राहतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रदेशातील सस्तन प्राणांच्या खूप कमी अभ्यास झाला आहे, त्यांच्या अभ्यासाला मोठा वाव आहे. एखाद्या प्रदेशातील वनप्रदेश, मोठ्या प्रमाणावर भक्ष्याची उपलब्धता आणि मानवी अस्तित्त्व यांचा मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या विभागणीवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास आम्ही केला. या प्रकल्पाला क्रिटीकल इकोसिस्टिम पार्टनरशिप फंड आणि अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड एन्व्हायर्नमेंट यांनी अर्थसहाय्य केले आणि सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज बेंगलोर यांनी या प्रकल्पाला पाठींबा दिला.
सध्या तुम्ही काम करत असलेला सह्याद्री कॉरीडोर हा प्रकल्प काय आहे?
हा प्रकल्प म्हणजे माझ्या डोक्यातील उपज! परंतु माझ्या या प्रयत्नात मला अनेक संघटना आणि लोकांची मदत लाभली आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्धिष्ट उत्तर पश्चिम घाटात मोठ्या मांसाहारी प्राण्यांना जंगलांत ये-जा करण्यासाठी असलेल्या जोडमार्गांचे संरक्षण करणे, त्यांत सुधारणा करणे आणि प्राण्यांचे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात येणे-जाणे सुकर करणे हे आहे. हे काम या क्षेत्रात ज्यांचे हितसंबंध आहेत त्यांच्या सहभागाशिवाय खचितच संभव नव्हते म्हणून आम्ही या प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या लोकांसोबत पार्टनरशिप करण्यावर लक्ष केंद्रित केले. या प्रकल्पात सर्वांत महत्त्वाचा सहभाग हा महाराष्ट्र वन विभागाचा आहे. यांच्याद्वारे संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर कोरीडोर्समध्ये लावलेल्या केमेरा-ट्रेप्समार्फत आम्हाला आश्चर्यकारक अशी माहिती प्राप्त होत आहे.  

महाराष्ट्रातल्या तिल्लारी भागात तुम्ही केलेले काम परिणामकारक ठरले आहे. त्याबद्दल सांगा.
महाराष्ट्रा, गोवा आणि कर्नाटकच्या सीमांवर असलेला तिल्लारी हा एक अद्भुत प्रदेश आहे! २०१० मध्ये मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या क्षेत्र व्याप्तीच्या (ओक्युपन्सी सर्वे) एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदा मी हा प्रदेश पाहिला आणि तेव्हापासून मी तिल्लारीच्या मोहातच पडलो. आता आम्ही केमेरा ट्रेप्सद्वारे या प्रदेशातील वन्यजीवांच्या अगदी बारकाईने नोंदी ठेवत आहोत. आम्हाला वाघ आणि हत्तींच्या अस्तित्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. या भागात सांबर आणि गवाही मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाणवते. या भागात वन्यजीव संवर्धनाला खूप मोठा वाव आहे आपण फक्त विकासाच्या बालिश कल्पनांना बळी पडता कामा नये.
नुकत्याच पिल्लांना जन्म दिलेल्या एका मादी बिबट्याचा कॅमेरा-ट्रेप ने घेतलेला फोटो 
तिल्लारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आलेली वाघाची पाउलखुण
सावंतवाडी-दोडामार्ग भागातील २५ गावांत तुम्ही जलद जैवविविधता सर्वेक्षण केले. यात तुम्हाला काय आढळून आले?
या भागात प्रचंड जैवविविधता आहे आणि याचा सज्जड पुरावा म्हणजे आमच्या केवळ एका आठवड्याच्या जलद सर्वेक्षणात आढळून आलेल्या पशु-पक्षी, वन्यजीव आणि कीटकांच्या अनेक प्रजाती. येथील लोकांना या जैवविविधतेचे महत्त्व माहित आहे. त्यांच्या स्वतःच्या उपजीविकेसाठी ही जैवविविधता कशी आवश्यक आहे हेही त्यांना समजते. मात्र दुर्दैवाने हा प्रदेश पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याचे घोषित करण्याला विरोध करण्यासाठी त्यांचे कान भरले जात आहेत. या प्रदेशाला प्रस्तावित खाणी आणि रबर लागवडींपासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे, यासाठी  शेकडो एकर जमीनीवरील जंगल नष्ट केले जात आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, आशा करूयात यापुढे हे होणार नाही.  

तुमच्या लेखांमधून आणि कामातून संवर्धनासाठी विज्ञानाचा वापर करण्यावर तुम्ही भर देत आला आहात. वन्यजीव संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करता येईल?
संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, विशेषकरून संरक्षित क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी वन्यजीव संरक्षक आणि संशोधक आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून घेऊ शकतात. केमेरा ट्रेप्सचेच उदाहरण घ्या – मी याचा वापर अशा वन्यजीवांच्या नोंदींसाठी करत आहे ज्या या भागात क्वचितच नोंदल्या गेल्या होत्या. मानवी वस्ती जास्त असलेल्या भागात जेथे साधारणपणे वन्यजीव सहसा नजरेस पडत नाहीत त्या ठिकाणी, या तंत्रज्ञानाचा विशेष फायदा होतो. केमेरा ट्रेप्समुळे एकदा आम्ही शिकाऱ्यांनाही पकडले होते. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात एक सांबर मारला होता. त्यांचे चेहरे केमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्यामुळे हे शक्य झाले. आजकाल तर केमेरा ट्रेप्स इमेल/एमएमएसच्या सुविधेसह उपलब्ध झाले आहेत यामुळे संरक्षित प्रदेशांवर वर्तमानात नजर ठेवणे शक्य होते आणि कोणतीही बेकायदेशीर अथवा वन्यजीवांना नुकसान पोहोचवणारी घटना वेळीच थांबवता येते. 
गिरीश, वन खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत कॅमेरा ट्रॅप बसवतांना

तुम्ही मांसाहारी प्राण्यांच्या परिसंस्थांचा अभ्यास करता आहात. मानव-प्राणी परस्परक्रिया हा या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, तुम्ही याकडे कसे पाहता?
हो. या प्राण्यांच्या संवर्धनात या क्रिया खूप महत्त्वपूर्ण आहेत. या प्राण्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोण सकारात्मक आहे कि नकारात्मक यावरून मानवी वस्तीत हे प्राणी राहू शकतील कि नाही हे ठरत असते. एक सुखद आश्चर्य आहे, मी काम करत असलेल्या काही भागांमध्ये वाघ आणि बिबट्यांना देव मानले जाते आणि लोकांना ते आपल्या गावाभोवती असावेत असे वाटते. परंतु आता जग झपाट्याने बदलत चालले आहे, पैशाला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत वन्यजीव संवार्धानावरील गावकऱ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हा विषय खूप व्यापक आणि क्लिष्ट आहे. यात वेगवेगळे दृष्टीकोण आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात जेव्हा हत्ती शेतात यायला लागले तेव्हा लोकांनी त्यांच्या पायांच्या ठशांची पूजा केली पण ते परत परत यायला लागले आणि हे लोकही वैतागले. यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. जसे पिक विमा अनिवार्य करणे इत्यादी. संशोधन आणि व्यायास्थापन यांचा योग्य मिलाफ साधने आवश्यक आहे.  

या क्षेत्रात काम करतांना आलेले काही संस्मरणीय अनुभव आम्हाला सांगाल का?
कोयना अभयारण्यातील एक आठवण आहे. २०१० मध्ये आम्ही तेथे ऑक्युपन्सी सर्वे करत होतो आणि अचानक पुढे झुडुपात काहीतरी हालचाल झाली. माझ्या लक्षात आले कि तेथे काहीतरी आहे आणि आम्ही लगेच खाली बसलो. तेवढ्यात त्या झुडुपातून काही शिट्ट्या ऐकू आल्या. ते रान कुत्रे होते. ते आपल्या शिकारीचा पाठलाग करत होते. शिकारीच्या वेळी ते एकमेकांना शिट्टीद्वारे खुणावतात. ही त्यांची एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत आहे. मी कधीच ती शिट्टी ऐकली नव्हती, पहिल्यांदा एवढ्या जवळून ऐकली. ते आमच्यापासून फार तर पाच मीटर अंतरावर असतील परंतु शेवटपर्यंत आम्हाला दिसले नाहीत. रान कुत्रा हा खूप लाजाळू प्राणी आहे तो माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येतोय हे कळल्यानंतर ते आमच्यापासून दूर गेले परंतु सुरुवातील जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ असल्याचे त्यांना माहित नव्हते तोपर्यंत त्यांचे वागणे अत्यंत नैसर्गिक होते जे सहसा माणसांना पाहायला मिळत नाही. ते सांबर वगैरे कशाचातरी पाठलाग करत होते. ते व्हिसल वाजवून संवाद साधतात म्हणून त्यांना व्हिसलिंग हंटर्स म्हटले जाते.
यानंतर एक आठवण आहे ती राधानगरीतील. तेथे वाघाने मारलेला एक खूप मोठा गवा पाहिला. तो एक पूर्ण वाढ झालेला नर गवा होता. त्याचे वजन कमीत कमी ७०० ते ८०० किलो तरी असेल. एवढा मोठा गवासुद्धा वाघ मारू शकतो हे पाहून आश्चर्य वाटले. मोठ्या नर वाघाचे वजन २०० ते २२५ किलो असू शकते. मादीचे वजन १०० ते १५० किलोपर्यंत असते. एखाद्या मोठ्या नर वाघानेच तो मारलेला असावा कारण मादी एवढामोठा गवा मारू शकेल असे मला वाटत नाही. असा गवा मारणे म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. त्याला मारून साधारण महिना झाला असेल. तिथे त्याची हाड वगैरे पडलेली होती. त्याच डोक खूप मोठ होत त्यावरून आम्ही अंदाज लावला कि तो ७००-८०० किलोचा असेल. त्या वाटेवर वाघाची खूप विष्टाही पडलेली होती.
जंगलात पायी फिरत असतांना येणारे अनुभव हे खूप वेगळेच असतात. खासच म्हण हव तर! पर्यटन वगैरे करतांना येणाऱ्या अनुभावांहून वेगळेच असतात ते. तुम्ही जेव्हा चालत जंगलात जाता तेव्हा तुम्हाला खूप अनुभव अनपेक्षितपणे येतात. एक सततच्या धोक्याची जाणीव असते. त्याची मजा काही औरच असते.

वन्यजीव पर्यटनाबद्दल आपले काय मत आहे. ते चांगले कि वाईट?
मला वाटत वन्यजीव पर्यटनात तसे वाईट काही नाहीये पण त्यावर नियंत्रण असयला हवे. पर्यटनामुळे वन्यजीवांना थोडाफार व्यत्यय नक्कीच होतो पण तेथे जंगलांच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना पर्यटनातून उत्पन्न प्राप्ती होऊ शकते आणि त्यामुळे वन्यजीव संरक्षणाला त्यांचा पाठींबा मिळू शकतो जो खूप महत्त्वाचा आहे.

भारत आणि एकंदरीत जगाचा विचार करता वन्यजीवांचे, जंगलांचे भविष्य कसे वाटते?
अजूनही आशा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये. खूप लोक प्रयत्न करताहेत पर्यावरण संरक्षणासाठी. शासनाने मात्र हे मान्य करणे गरजेचे आहे कि आज पर्यावरण संरक्षणाला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासकामासाठी पर्यावरणाची हानी करणे हे बंद झाले पाहिजे. जे काही विकासप्रकल्प असतील ते पर्यावरण तज्ञांना सोबत घेऊन तयार केले पाहिजेत.
भारताच्या बाबतीत मला वाटत पर्यावरण संरक्षणाला खूप साऱ्या लोकांचा पाठींबा आहे. मानवी हक्क, वन्यजीव, पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी आज कधी नव्हे इतके लोक काम करताहेत. हा बदल नक्कीच स्फूर्तीदायक आहे.  
जागतिक पातळीवरून विचार करता, लोकांची जागरुकता खूप वाढली आहे तरीही पर्यावरण आणि वन्यजीवांच्या बाबतीत आपण खूप गंभीर संकटात आहोत. जागतिक पातळीवर फोफावलेल्या वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापारामुळे वाघ, सिंह, चित्ता, गेंडा इत्यादी सर्वच मोठ्या प्राण्यांना असलेला धोका खूप वाढला आहे. चीन, जपान, दक्षिणपूर्व एशिया इत्यादी ठिकाणी त्यांची खूप जास्त मागणी आहे. चीन किंवा जपानमध्ये तर हस्तिदंताचा वापर ठसा बनवण्यासाठी केला जातो. प्रत्येक मोठा माणूस त्यापासून स्वतःचा ठसा बनवतो!
कोठे कोठे सकारात्मक गोष्टीही आहेत. युरोपमध्ये बघितले तर लांडगे वगैरे आता सगळीकडे दिसतात. आधी खूप कमी ठिकाणी राहिले होते. तेथे संवर्धनाचे खूप चांगले प्रयत्न झाले आहेत. आफ्रिकेत, भारतात समस्या मोठी आहे. ब्राझीलमध्ये खूप मोठी आहे.

वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन या व्यतिरिक्त तुमच्या आवडी कोणत्या आहेत?
मी या गोष्टीचा क्वचितच विचार केलाय पण आता तू विचारलेच आहेस तर मला हायकिंग खूप आवडते. मला प्रवासवर्णने आणि भारतीय लेखकांचे लिखाण वाचायला आवडते. मला फुटबॉल खेळायला आवडते पण आजकाल त्यासाठी वेळच मिळत नाही. मला सायकलिंगही आवडायचे पण एकदा मोठा अपघात झाला आणि माझे सायकलिंग बंद झाले.

धन्यवाद आणि वन्यजीव संवर्धनाच्या तुम्ही करत असलेल्या या कामात आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत आहेत!

सह्याद्रीकॉरीडोर प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया खालील वेबसाईटला भेट द्या :
परीक्षित सूर्यवंशी

@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा