सोमवार, १५ जून, २०१५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र

नद्यांची जोडणी आणि मोठ्या धरणांच्या उभारणीशिवायही ‘वॉटर स्मार्ट’ मुंबई शक्य आहे! 
जंगल दरी, मध्य वैतरणा धरणासाठी कायमची गमावली गेली. फोटो-परिणीता दांडेकर
आदरणीय मुख्यमंत्रीसाहेब,
राज्याच्या जलसंसाधन विभागात काही पुरोगामी बदलांना चालना दिल्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन. जसे जे धरण प्रकल्प ७५% पेक्षा जास्त पूर्ण झालेले आहेत तेच सुरु ठेवण्याचा निर्णय, स्वच्छ प्रतिमेच्या स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक जसे CADAचे मुख्य सचिव म्हणून श्री एच.टी.मेंढेगिरी यांची नियुक्ती, आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या (Economic Survey Report) नियमांत बदल, फक्त पाणी साठवले म्हणजे सिंचन क्षमतेत वाढ झाली असे समजले जाणार नाही असे म्हणणे.
असे असले तरी, ३ जानेवारी २०१५ च्या इंडिअन एक्प्रेस या वर्तमान पत्रात छापून आलेले मुंबईच्या विकास आराखड्याबद्दलचे तुमचे विचार वाचून निराशा झाली. हे शहर तोंड देत असलेल्या जास्तीतजास्त समस्या आणि त्यांवर करता येण्यासारखे उपाय यांची यादी मांडतांना पाणी या सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याला मात्र तुम्ही बगल दिली! त्या पूर्ण बातमीत पाण्याचा उल्लेख फक्त एकदाच केला गेला!
तुम्हाला माहितच आहे कि, पुरेश्या, स्वच्छ आणि खात्रीच्या पिण्याच्या पाण्याचा आणि विश्वासू पाणी नियोजनाचा अभाव या मुंबई आणि मुंबईकरांपुढील, खासकरून गरीबांपुढील प्रमुख समस्या आहेत.
गेल्या वर्षात आम्ही, मुंबईचा पाणी पुरवठा, पाण्याची उपलब्धता, मागणी आणि प्राप्तीची परिस्थिती यांचा अभ्यास केला. याबाबतीत आम्ही आमचा दृष्टीकोण आपल्या पुढे मांडू इच्छितो.
दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पाचा एक भाग, भूगड धरणाखाली बुडणार असलेली दरी. फोटो-परिणीता दांडेकर 
कृपया प्रा.माधव गाडगीळ यांची प्रस्तावना लाभलेला, सोबत जोडलेला अहवाल “मुंबई महानगर प्रदेशासाठी पश्चिम घाटाच्या आदिवासी पट्ट्यातील धरणे : अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतांनाची अन्यायपूर्ण प्रकल्पे” (Dams in tribal belt of Western Ghats for the Mumbai Metropolitan Region: Unjustified projects when better options exist) पाहावा. यात या आणि इतर बाबींबद्दल विस्ताराने लिहिले गेले आहे.
या अहवालातील निष्कर्षांवर आधारित NDTVने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात MCGM आयुक्त श्री सीताराम कुंटे आणि MMRDA मेट्रोपोलिटन आयुक्त श्री यूपीएस मदन यांनी मान्य केले कि, मुंबई आपल्या पाणी समस्येसाठी असे उपाय योजत नाहीये जे अधिक सोपे आहेत, पाण्याचा अकार्यक्षम वापर, पारेषण आणि वितरणात होणारी हेळसांड या मोठ्या समस्या आहेत आणि मोठ्या धरणांच्या दुष्परिणामांचा विचार करता त्यांचे समर्थन केले जाऊ शकत नाही, विशेषतः इतर अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतांना.
तुम्हाला हेही माहित आहे कि, मुंबई महानगर प्रदेश (MMR) हा मुंबईच्या पाणी पुरवठयासाठी अधिक धरणांची मागणी करतो आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात अशी १२ धरणे नियोजित आहेत (यात दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पाच्या तीन धरणांचाही समावेश आहे) जी एकत्रितपणे १,००,००० हून अधिक आदिवासींना विस्थापित करतील, २२,००० हेक्टर जमीन या धरणांखाली बुडेल ज्यातील ७००० हेक्टर जंगल आणि ७५० हेक्टर जमीन तानसा अभयारण्याची असेल.
दमणगंगा-पिंजल नदीजोड प्रकल्पामुळे प्रभावित आदिवासी फोटो-परिणीता दांडेकर
मुंबईच्या तहानेसाठी द्यावी लागणारी ही नक्कीच एक खूप मोठी सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक किंमत आहे. परंतु या मार्गावर जाण्यापूर्वी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर आपल्याकडून करून झाला आहे का? कोणत्याही दृष्टीने याला ‘स्मार्ट’ म्हणता येईल का?
कृपया ही वास्तविकता समजून घेण्यासाठी आपले काही क्षण द्या   
·            बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मूळस्त्रोताजवळ पुरवठ्यात कमतरता नाही : MCGM (Municipal Corporation of Greater Mumbai) ला स्त्रोताच्या ठिकाणी ३५२० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. एक कोटी चोवीस लाख सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील, झोपडपट्टी भागात ६८६ एमएलडी पाण्याचा वापर होतो आणि झोपडपट्टी नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांद्वारे १२९७ एमएलडी पाणी वापरले जाते. यांची बेरीज होते १९८३ एमएलडी. याचा अर्थ स्त्रोताच्या ठिकाणी होणारा ३५२० एमएलडीचा पुरवठा हा वास्तविक एकूण मागणीपेक्षा खूप जास्त आहे! यात आपण २६० एमएलडी व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी आणि १२० एमएलडी पुरवठा मार्गात होणारे नुकसान मानले तरीही अधिकचे ११५७ एमएलडी पाणी अजूनही उपलब्ध असले पाहिजे. याचा अर्थ असा कि स्त्रोताच्या ठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या पाण्यापैकी ३२.८६% पाण्याचा काही हिशेबच नाही. जरी आपण स्त्रोताच्या ठिकाणी होणाऱ्या पुरवठ्याच्या २५% गळती गृहीत धरली (जी खरतरं खूप जास्त होते, ती ५-१०%पेक्षा जास्त नसावी) तरीही अजूनही पुरवठ्याच्या ७.८६% पाण्याचा हिशेब लागत नाही. हे म्हणजे ८८० एमएलडी पाणी, जवळजवळ मुंबई बांधू पाहत असलेल्या दोन मोठ्या धरणांइतके!
·            अतिशयोक्तीपूर्ण मागणी अंदाज (४२४० एमएलडी?!) : शासकीय स्तरावर असे सांगितले जाते कि (पोपटपंची केली जाते) MCGM साठी पाण्याची खरी मागणी ४२४० एमएलडी इतकी आहे आणि सध्यस्थितीत कमीतकमी ७२० एमएलडी पाण्याची तुट आहे. मागणीचा ४२४० एमएलडी हा आकडा २४० एलपीसीडी (liters per capita per day) पाणी पुरवठ्यावर आधारित आहे, जो १९९९ च्या चितळे समितीच्या अहवालात वापरला गेला होता. २४० एलसीपीडी पाणी पुरवठा हा अनावश्यक, असमर्थनीय आणि अस्वीकारार्ह आहे आणि आंतरराष्ट्रीय मानांकनांनुसारही खूपच जास्त आहे!
·            MMR महानगरपालिका या त्यांच्या पाणी वापराबाबत उधळ्या आणि अकार्यक्षम आहेत : MMR महानगरपालिका या अगदी उच्चरवाने जास्त पाण्याची मागणी करीत असल्या तरी, उपलब्ध स्त्रोतांचा त्या ज्याप्रमाणे वापर करीत आहेत ते पाहता त्यांच्या या मागण्यांचे समर्थन कदापि केले जाऊ शकत नाही.
·            नवी मुंबई महानगरपालिकेचा अपवाद वगळता इतर कोणतीही महानगरपालिका आपल्या सांडपाण्यापैकी १५% पाण्यावरही प्रक्रिया करीत नाही. काही महानगरपालिका तर आपल्या सांडपाण्यावर अजिबात प्रक्रिया करीत नाहीत!
·            कार्यरत बल्क वॉटर मीटरच्या अभावी पाण्याच्या लेखापरीक्षणाची स्थितीही निराशाजनक आहे आणि लोकांना वास्तवात किती पाणी पुरवठा होतो आहे याचा विश्वसनीय असा हिशेबच नाहीये.
·            सध्या सर्व महानगरपालिकांची दरडोई पाणी उपलब्धता ही राष्ट्रीय प्रमाण १३५ एलपीसीडीपेक्षा जास्त आहे. ठाणे महानगरपालिका सारख्या क्षेत्रांत, ती २५१ एलपीसीडी पर्यंत जाते! याचवेळी यांसारख्या आणि यांहूनही मोठ्या भागांना आपल्या किमान गरजेइतकेही पाणी मिळत नाही.
·            स्थानिक जलस्त्रोत मरत आहेत, स्थानिक जलस्त्रोतांच्या वापरावर विचार करण्याऐवजी निधीचा वापर केवळ ‘सौंदर्यीकरणा’साठी केला जातो आहे. (सर्व माहिती सिटी सेनिटेशन रिपोर्ट्सवर आधारित)
गारगाई धरणाखाली बुडणारे जंगल फोटो-परिणीता दांडेकर
मुंबईच्या जलसुरक्षिततेसाठी स्मार्ट आणि स्वस्त पर्याय
1.   सांडपाणी प्रक्रिया : सध्यस्थितीत संपूर्ण MMRDA प्रदेशातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी जेमतेम १२-१३% पाण्यावरच प्रक्रिया केली जाते आणि त्याचा पुनर्वापर जवळजवळ होतच नाही. जवळपास १६८९ एमएलडी प्रक्रियारहित सांडपाणी दररोज मुंबईच्या नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांना अवरुद्ध करते. यातील केवळ ५०% ही प्रक्रियाकरून वापरले गेले तर मुंबईला ८४४ एमएलडी पाणी मिळेल, जे जवळजवळ २ मध्य वैतरणा प्रकल्पांएवढे आहे! यामुळे नद्या आणि समुद्र किनारे अधिक स्वच्छ राहतील हे वेगळे.  
2.   MMR प्रदेशात अनेक पारंपारिक जलसाठे आहेत : जे अस्तित्त्वात आहेत आणि अजूनही पाणी पुरवठा करीत आहेत. (उदाहरणार्थ, ठाण्यात ३५ तलाव आहेत, नवी मुंबईमध्ये असे २५ तलाव आहेत, कल्याण डोंबिवलीत २९ आहेत, इत्यादी.) यांपैकी अनेक अनौपचारिकपणे पाणी पुरवठा करतात आणि वर्हाला सारखे काही सक्रियपणे वापरले जातात. परंतु वरवरच्या सौंदर्यीकरणावर भर देणाऱ्या योजना या रचनांच्या पाणी पुरवठा क्षमतेकडे लक्ष देत नाहीत, जो अनेक शहरांसाठी अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि भरवशाचा पर्याय आहे. असे जलसाठे, ओढे-नाले आणि प्रवाह यांचे संरक्षण करण्याची आणि जे मृत झाले आहेत त्यांचे पुनर्रुजीवन करण्याची गरज आहे.
3.   रेन वॉटर हार्वेस्टिंग (वर्षा जल संचयन) आणि भूजल पुनर्भरण : मुंबई महानगरपालिकेच्या रेन वॉटर सेलची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग कागदावर अस्तित्त्वात आहे, परंतु सरकारकडून या योजनेला जाणीवपूर्वक कोणतीच मदत किंवा उत्तेजन दिले जात नाही. असे असले तरी, नागरिकांनी मात्र सी लाईन अपार्टमेंट, खेतवाडी झोपडपट्टी आणि जागो मुंबई चळवळ सारख्या विलक्षण यशकथा प्रत्यक्षात आणून दाखवल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण (अनेक अहवालांद्वारे भूजलाला कमी लेखले जात असले तरी मुंबईच्या पाणी वास्तवातील बोरवेल्स या एक सततचा महत्त्वाचा भाग आहेत, उदाहरणार्थ, जवळपास ६०% उल्हासनगर भूजलावर अवलंबून आहे!) यांचे पुनर्रुजीवन हे स्थानिक पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सोपे, परवडणारे आणि सर्वोत्कृष्ट उपाय आहेत, विशेषकरून त्या भागासाठी जेथे दर पावसाळ्यात २००० मिमी पाऊस पडतो आणि शहरी भागांत पूर येतो!   
4.   वितरणातील नुकसान आणि पाण्याचा हिशेब किंवा शिस्तीचा अभाव : आमच्या मुल्यांकनानुसार, सध्याची वितरणात होणारी हेळसांड पाणी पुरवठ्याच्या ३०% एवढी आहे. ही हेळसांड साधी १५% नी कमी केली तरी ९४१.३६ एमएलडी पाणी वाचेल!
5.   ही सूचक उदाहरणे आहेत, जी संपूर्ण जगभरातील गतिमान महानगरांद्वारे खूप दूरच्या जलस्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वापरली जातात. याशिवाय आणखीही अनेक पर्याय आहेत जसे, दोन पाईपलाईन्स वापरणे, काही कामांसाठी समुद्राचे पाणी वापरणे इत्यादी. जे सुद्धा मुंबईसाठी सहज वापरून पाहिले जाऊ शकतात. मोठी धरणे बांधण्यापेक्षा स्थानिक पातळीवर साधारण क्षार कमी करणे (desalinization) हा अधिक चांगला आणि स्वस्त पर्याय होऊ शकतो.
खूप दूरवरच्या नवीन धरणांवर अवलंबून राहणे ही केवळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत महागडी आणि पर्यावरणीय तसेच सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाबच नाहीये तर आजच्या तापमान बदलाच्या परिस्थितीचा विचार करता ती अविवेकी आणि बेभरवशाचीही आहे.
एक लवचिक आणि संवेदनशील महानगर हे स्मार्ट, विकेंद्रित आणि स्थानिक पर्यायांवर अभिमानाने उभे असते, सांस्कृतिक विविधतेत भर घालणाऱ्या आदिवासींना विस्थापित करणाऱ्या किंवा पाणलोट क्षेत्रांचे रक्षण करणाऱ्या जंगलांना बुडवून टाकणाऱ्या दूरवरच्या प्रकल्पांवर नाही.
आम्ही आशा करतो कि तुम्ही मुंबईला फक्त एक आर्थिकदृष्ट्या आकर्षक महानगर म्हणूनच नव्हे तर एक शाश्वत, सृजनशील आणि प्रेरणादायी केंद्र म्हणूनही विकसित कराल जे पाण्याच्या कार्यक्षम आणि समन्यायी वापराच्या बाबतीत सर्वोत्तमतेचे प्रात्यक्षिक ठरेल. मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू सारखी मोठी धरणे आणि दमणगंगा-पिंजल सारखे नदीजोड प्रकल्प, जे मुंबईचे संरक्षण करणाऱ्या जंगलांवर बांधले जातील, स्मार्ट नाहीत तर मूर्खपणाचे आणि विनाशकारी पर्याय आहेत.
कवी बा.सी. मर्ढेकरांसारख्या मुंबईप्रेमींनी कल्पना केलेल्या एका नव्या पहाटेची मुंबई आतुरतेने वाट पाहत आहे.
न्हालेल्या जणू गर्भवतीच्यासोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येईमाघामधली प्रभात सुंदर
  
  या प्रयत्नात आमच्याकडून होईल ती मदत करण्यात आम्हाला आनंदच होईल.

  आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत
  आपल्या विश्वासू
  परिणीता दांडेकर, अमृता प्रधान, SANDRP
अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com
@@@@


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा