बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

खरिप जाण्याची भीती, शेतकऱ्यांचा हवामान खात्यावर रोष

निधि जम्वाल, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
अस्मानी संकट पाठ सोडत नसलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांत भारतीय हवामान खात्याने सुल्तानीची भर घातली आहे. पावसाअभावी खरिपाचे पिक हातातून जाण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांचा चुकीची भाकिते केल्याबद्दल सध्या या खात्यावर बराच रोष आहे.
 या खरिप हंगामात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चौफेर संकटांशी सामना करावा लागत आहे. (छायाचित्र: निधी जम्वाल)
१४ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील आनंदगावच्या काही शेतकऱ्यांनी भारतीय हवामान खात्याविरुद्ध एफआयआर नोंदवली. हवामान खात्याने “बियाणे आणि कीटनाशक उत्पादकांशी संगनमत करून पावसाचा अंदाज फुगवून सांगितल्याचा” आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यातील भारतीय हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची धमकी दिली आहे. संघटनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे कि हवामान खात्याने यावर्षी “समाधानकारक पाऊस” पडणार असल्याचे भाकीत केले होते परंतु राज्यातील अनेक भागांत अत्यल्प पाऊस झालेला असून सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांसारखी खरिप पिके मरणाला टेकली आहेत.
“जूनच्या पहिल्या आठवड्यात लातूरसह मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या करण्यात आल्या. परंतु १६ जूनपासून कुठेमुठे थोडेफार शिपकारे वगळता पावसाने दडी मारली. गेल्या जवळपास तीन आठवड्यांपासून एकही चांगला पाऊस झालेला नाही.” तीन एकर जमीन असेलेले लातूरच्या भिसेवाघोली गावचे वेंकट बलभीम भिसे सांगत होते.
ते पुढे म्हणाले, “पुढच्या १० दिवसांत पाऊस परतला नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातचे खरिपाचे पिक गेले म्हणून समजा कारण इथं सिंचनाच्या सुविधाच नाहीत. माझे सोयाबीनचे पिक जाणार.” भिसे यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ऊस लावला होता पण पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेली ५५० फुट खोलीची कूपनलिका (बोरवेल) आटली आणि त्यांना आपले संपूर्ण पिक गमवावे लागले. आता त्यांच्यावर एका खाजगी सावकाराचे २ लाखाचे देणे झाले आहे.

लातूरच्या सोनवती गावचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीपान बडगिरे यांच्यामते, मुख्यमंत्र्यांचा पेरणी लांबणीवर टाकण्याचा सल्ला निरर्थक आहे कारण लातूर जिल्ह्यातील ८५% पेरण्या झालेल्या असून मोठ्या उघडिपीमुळे रोपे वाळत आहेत. (छायाचित्र: निधी जम्वाल)
एवढ्या दिवसांच्या उघडिपीची नोंद घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ जुलै रोजी म्हणजेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर जवळजवळ महिन्याभराने, पेरणी २० जुलैपर्यंत पुढे ढकलावी असा सल्ला जाहीर केला. परंतु लातूरच्या सोनवती गावचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीपान बडगिरे यांच्या म्हणण्यानुसार “मुख्यमंत्र्यांचा हा सल्ला निरर्थक आहे कारण लातूर जिल्ह्यातील ८५% पेरण्या झालेल्या आहेत.”
पाऊस होता खोटा
यावर्षी २९ मे ला मराठवाडा आणि विदर्भात पूर्व-मोसमी पावसाच्या सरी यायला सुरुवात झाली. “उन्हाळा आणि दक्षिणपश्चिम मान्सून यांच्या मधला काळ हा मान्सून-पूर्व काळ म्हणून ओळखला जातो. या काळात बऱ्याचदा विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळतात.” अक्षय देवरस यांनी ही माहिती दिली. अक्षय हे लीड्स विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट एंड एट्मोस्फरिक सायन्समधील मास्टर ऑफ रिसर्चचे विद्यार्थी आहेत.
“जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात, मराठवाड्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी खरिप पिकांची पेरणी केली. परंतु हा मान्सून नसून पूर्व-मोसमी पाऊस होता. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात हवामान खाते अपयशी ठरले, आता शेतकरी आपल्या मरत्या पिकांकडे निराश दृष्टीने पाहत आहेत.” देवरस सांगत होते.
आणि लहरी
त्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल झाला तो २३ जून नंतरच. परंतु अनेक जिल्ह्यांत १५ जुलै पर्यंतही तो अनियमितच होता. उदाहरणार्थ, भारतीय हवामान खात्याच्या हायड्रोमेट विभागात उपलब्ध असलेल्या पर्जन्यमानविषयक आकडेवारीनुसार, मराठवाड्यात १ जून ते ३० जून दरम्यान सरासरी पडणाऱ्या १४३.३ मिमी ऐवजी १८१.९ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु यातील अधिकांश पाऊस हा जूनच्या पूर्वार्धात कोसळणाऱ्या पूर्व-मोसमी पावसाचा भाग होता.
“मराठवाड्यासारख्या बऱ्यापैकी रुक्ष प्रदेशात १८१ मिमी म्हणजे चांगला पाऊस मनाला जातो. परंतु पिकांसाठी तो तेव्हाच चांगला ठरतो जेव्हा तो जवळपास सर्व ३० दिवसांत थोडा थोडा करत पडला असेल, आतासारखा १०-१५ दिवसांतच नाही.” भारतीय हवामान खात्यचे पुण्यातील माजी शास्त्रज्ञ अशोक जैस्वाल सांगत होते. ते पुढे म्हणाले, “अल्पावधीत पडलेला अतिरिक्त पाऊस हा फक्त पिकांचेच नुकसान करतो असे नाही तर त्यामुळे जमिनीची झीज होते तसेच कीटकनाशके आणि रसायनेही वाहून जातात.”
याबाबीला दुजोरा देत देवरस म्हणाले, “पावसाचे एकंदरीत प्रमाण हे फसवे असते, कारण पिकांना नियमित चांगल्या पावसाची गरज असते. आकडेवारीवरून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची कमतरता भासत नाही परंतु येथे तीन आठवठे पाऊस पडलेला नाही जे पिकांसाठी खूपच हानिकारक आहे.” २० जुलैपर्यंत मराठवाड्यात सरासरी पडणाऱ्या २५०.६ मिमी ऐवजी २५३.३ मिमी इतका तर विदर्भात सरासरी ३६८.३ मिमी ऐवजी ३५०.१ मिमी इतका पाऊस झाला होता. राज्यातील – परभणी, अमरावती आणि सांगली – या तीन जिल्ह्यांत उणे ५९% ते उणे २०% पर्यंतच्या अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे.
अपुऱ्या पावसाचे परिणाम
पावसाच्या कमतरतेचे परिणाम जाणवायला लागले आहेत. लातूरचे कृषी अधिकारी, मोहन गोजमगुंडे सांगतात, “पावसात एवढा मोठा खंड पडल्यामुळे मुग आणि सोयाबीनसारख्या अल्पमुदतीच्या पिकांची वाढ खुंटली आहे. “पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांची नीट वाढ न होता त्यांना लवकरच फुले येतील. यामुळे उत्पन्न कमी निघेल.”
गोजमगुंडे यांच्या मते, पुढच्या काही आठवड्यात किती पाऊस पडतो यावरून पिक उत्पन्नात १५% ते ५०% इतकी घट संभवते. कृषी विभागाने माती घट्ट होऊ नये आणि तिच्यात हवा खेळती राहावी म्हणून शेतकऱ्यांना आंतरमशागतीचा (पिकाच्या दोन ओळींमधून नांगरणे) सल्ला दिला आहे. पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी पिकांवर द्रवरूप पोटॅशयुक्त खतांचा शिडकावा करण्याचा सल्लाही देण्यात आला असल्याची माहिती गोजमगुंडे यांनी दिली.
संकटातील शेती आणि बेभरवशाची खाती
पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी दक्षिणपश्चिम पावसाची सुरुवात खूपच महत्त्वाची असते. करंट सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार - पावसावर आधारित शेती करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा, क्षेत्र आणि उत्पादन मूल्य दोन्हीदृष्ट्या, प्रथम क्रमांक लागतो.
भारतातील निव्वळ मशागतीखालील १४.०३ कोटी हेक्टर जमिनीपैकी ५७% पेक्षा जास्त क्षेत्र पावसावर अवलंबून असून अन्नधान्याच्या एकूण उत्पादनापैकी ४४% उत्पादन या क्षेत्रातून मिळते. शिवाय, पूर्ण सिंचन क्षमता प्राप्त केल्यानंतरही निव्वळ मशागतीखालील जमिनीपैकी जवळपास ५०% जमीन पावसावरच अवलंबून राहील असा अंदाज आहे. पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेली शेती ही अशाप्रकारे, भारताच्या जवळपास ४०% लोकसंख्येचे भरणपोषण करत आहे.  
पावसाअभावी खरिपाची पिके संकटात सापडली आहेत, मराठवाड्यातील शेतकरी चिंतीत आहेत. (छायाचित्र: निधी जम्वाल)
भारतीय शेती अशाप्रकारे, प्रचंड प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा कृषी हवामानशास्त्र विभाग कृषीविषयक हवामान बुलेटीन राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर जारी करत असतो. राज्यस्तरावरून दर मंगळवारी आणि शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या या वृत्तातून जिल्हास्तरावर वातावरण कसे राहील याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. पुढील पाच दिवसांतील पावसाच्या अंदाजाबरोबरच पेरणी, लागवड पद्धती, कीटकांपासून संरक्षण इत्यादीसंबंधी मार्गदर्शनही यातून केले जाते.  
परंतु या वृत्तातील अंदाज हे बऱ्याचदा चुकीचे आणि पिकांचे संरक्षण करण्यास अपुरे असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. उदा. यावर्षी मार्चमध्ये मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली ज्यामुळे ८०,००० हेक्टरवरील रब्बीचे उभे पिक नष्ट झाले. परंतु भारतीय हवामान खात्याकडून कडून शेतकऱ्यांना सावध राहण्याची सूचना मिळाली नाही.
फसवी भाकिते
अशाचप्रकारे, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या महिन्यात पाऊस थांबल्यावर कोणतीही सूचना देण्यात आली नाही. ९ जूनच्या लातूर जिल्हा कृषीविषयक हवामान वृत्तात सोयाबीन आणि बाजरी पेरण्याच्या सल्ल्यासह “मुसळधार पावसाच्या” धोक्याची सूचनाही देण्यात आली होती. १६ जूनच्या वृत्तात “मध्यम स्वरूपाच्या पावसाची” शक्यता वर्तवून “कोरडवाहू जमिनीत सोयाबीन आणि तूर यांचे आंतरपिक घेण्याचा” सल्ला देण्यात आला होता. तर चार दिवसांनी म्हणजेच, २० जूनच्या वृत्तातून “कोरडवाहू बीटी कॉटन” तसेच उडीद आणि मुग पेरण्याचा सल्ला देण्यात आला.
शेवटी ३० जून रोजी पावसाच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी पिकांवर पॉटेशियम नायट्रेट शिंपडण्याचा आणि तुषार सिंचन पद्धतीने पिकांना पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु, तोपर्यंत पावसात खंड पडून १२-१४ दिवस झाले होते आणि पेरणी वाया जायला लागली होती.
जुलैच्या मध्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात थोडा पाऊस पडला. परंतु तो सगळीकडे सारख्याच प्रमाणात बरसला नाही. “गेल्या काही दिवसांत पाऊस आला परंतु खरिपाची पिके वाचण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.” बडगिरे सांगत होते.
१८ जुलै रोजी लातूर, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यांत अनुक्रमे १३.८ मिमी, १३.१ मिमी, ३.८ मिमी आणि १.१ मिमी इतकी पर्जन्यवृष्टी झाली. “बरेच दिवस पावसाअभावी गेलेल्या प्रदेशात पाण्याची कमतरता भरून येण्यासाठी एकाच दिवसात कमीतकमी १०० मिमी पाऊस आणि तो ही व्यापक क्षेत्रावर पडण्याची गरज असते. खात्रीचा आणि नियमित पाऊस असेल तरच दुबार पेरणी मदतरूप ठरेल. परंतु, विस्तारित अवधी पूर्वानुमान (Extended range forecasting models) २१ जुलै पासून महाराष्ट्रात आणखी एका उघडीपीची शक्यता दर्शवत आहेत.” देवरस पुढील धोक्याची सूचना दिली.
आरोप-प्रत्यारोपांचा खेळ
भारतीय हवामान खात्याच्या पुण्यातील कृषी हवामानशास्त्र विभागाचे (एग्रोमेट) डीडीजीएम असलेले, एन चट्टोपाध्याय वर्तमान समस्येसाठी संचारव्यवस्थेतील कमतरतांना दोषी ठरवतात. “आम्ही हवामानावर दररोज नजर ठेऊन आहोत आणि अद्ययावत वृत्त जारी करत आहोत. परंतु सगळ्यात मोठी समस्या आहे ती संचार व्यवस्थेतील कमतरतेची.” ते म्हणतात.    
भारतीय हवामान खात्याच्या एग्रोमेट व्यवस्थे अंतर्गत संपूर्ण भारतात १३० केंद्रे आहेत. यांतील बहुतेक कृषी विद्यापीठे आहेत जी भारतीय हवामान खात्याकडून मिळणारा हवामानाचा पूर्वानुमान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. “२१ जूनपर्यंत मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला होता. २४ जूननंतर पाऊस कमी व्हायला लागला.....७ जुलैला आम्ही पुढच्या दोन आठवड्यांसाठी लागू असलेले, विस्तारित अवधी पूर्वानुमान जारी केले, ज्यात मराठवाड्यात पुढचे १४ दिवस पेरणी न करण्याचा सल्ला देण्यात आला.” चट्टोपाध्याय सांगत होते.      
शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी विविधप्रकारचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्यात एसएमएस अलर्टचा देखील समावेश आहे. “महाराष्ट्रातील १.३४ कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त ७० लाख शेतकऱ्यांनाच एसएमएस अलर्ट प्राप्त होतो. हा आवाका वाढवण्याची गरज आहे.” चट्टोपाध्याय म्हणाले. शेतकऱ्यांना याबाबतीत अद्ययावत ठेवण्यासाठी एका विशिष्ट पोर्टलच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.
बदलते वातावरण
जैस्वाल यांच्यामते, भारतीय हवामान खात्याच्या मध्यम अवधी पुर्वानुमानात (पुढच्या ५-७ दिवसांसाठीच्या) गडबड आहे जी तपासली गेली पाहिजे. “भारतीय हवामान खात्याकडे आवश्यक ती सर्व साधने आहेत, परंतु अचूकपणा नसणे ही समस्या आहे. बदलत्या हवामानामुळे मान्सूनचा अंदाज बांधणे अधिकाधिक अवघड होत चालले आहे.”
भारतात साधारणपणे मान्सूनशी संबंधित असलेल्या वातावरणातील कित्येक घटना आता बदलल्या आहेत. “पूर्वी जून महिन्यात पश्चिम किनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर एक गर्त(trough) तयार होत असे जी महाराष्ट्रापासून ते अगदी केरळपर्यंत पसरत जात असे. ती अरेबियन समुद्राकडून तीव्र वेगाचे वारे वाहून आणी, हे वारे पश्चिम घाटावर आदळून मोठा पाऊस होत असे. आता असे होत नाही.” जैस्वाल सांगत होते.
याचप्रमाणे, मान्सूनशी संबंधित असलेले जमिनीजवळून वाहणारेही वारे (जमिनीजवळून वाहणारे क्षोभावरणातील (troposphere) तीव्र वेगाचे वारे) कमजोर झाले आहेत. मराठवाड्यातील अवर्षणाबद्दल बोलतांना जैस्वाल म्हणतात, “जुलै मध्यात मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडला नाही कारण बंगालच्या खाडीत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही. पूर्वी, हे कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्रातील या भागांत चांगला पाऊस घेऊन येत.”
महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकरी हे मोठ्या संकटात आहेत हे स्पष्ट आहे. भारत सरकार आणि भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ दोहोंनीही आपली हवामान पूर्वानुमान प्रणाली सुधारण्याची आणि शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचेल याची अशी व्यवस्था करण्याची आज खरंच गरज आहे. क्लायमेट चेंजच्या या दुर्दैवी काळात शेतकऱ्यांसाठी ते कमीतकमी एवढे तरी करू शकतात.
निधि जम्वाल मुंबईस्थित पत्रकार आहेत.   

हा लेख प्रथम ग्रामीण भारताच्या व्यापक हितावर चर्चा करणाऱ्या VillageSquare.in या वेबसाईटवर इंग्रजीत प्रकाशित करण्यात आला.

@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा