सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

वन्यप्राण्यांसाठीची प्रयोगशाळा


-    परीक्षित सूर्यवंशी

गेल्या दोन हजार वर्षांत लुप्त झाल्या नाहीत त्यापेक्षा जास्त वन्यजीव प्रजाती १९७० ते २०१२ या काळात नष्ट झाल्या. याच वेगाने त्या नष्ट होत राहिल्यास २०२० पर्यंत जगातील एकूण वन्यप्राण्यांपैकी २/३ प्रजाती नष्ट होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. अशा भयंकर परिस्थितीत वन्यजीव संवर्धनासाठी नैसर्गिक अधिवास संरक्षणाबरोबरच जैवतंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशाळेत वन्यजीव संवर्धनासाठी प्रयत्न होणे देखील आवश्यक आहे. प्राण्यांचे वर्तन आणि उत्क्रांतीचा इतिहास समजून घेणे, अवैध शिकारीची प्रकरणे सोडवणे, रोगांचे लवकर निदान करून त्यांचा प्रसार रोखणे अशा अनेक क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते. 

हीच गरज ओळखून जगात अनेक ठिकाणी वन्यजीव डीएनए बँकेची स्थापना करण्यात आली आहे. जायंट पांडाच्या संवर्धनासाठी चीनने स्थापन केलेले चेंगडू पांडा संशोधन केंद्र आणि युकेची फ्रोझन आर्क ही अशीच दोन उदाहरणे. भारतातही संकटग्रस्त वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीद्वारे (सीसीएमबी) १९९८ साली हैदराबाद येथे लेकॉन्स (Laboratory for the Conservation of Endangered Species) ची स्थापना करण्यात आली. प्रयोगशाळेची स्थापना २००७ साली होऊन माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याहस्ते तिचे उद्घाटन झाले. सद्यस्थितीत लेकॉन्स ही भारतातील पहिली आणि एकमेव वन्यजीव डीएनए बँक आणि प्रयोगशाळा आहे. 

वन्यजीव संवर्धन क्षेत्रात लेकॉन्सचे योगदान 
वन्यजीवांची अवैध शिकार: आज जगात मादक पदार्थ आणि हत्यारांच्या तस्करीनंतर अवैध व्यापारांत सर्वांत वरचा क्रमांक लागतो तो वन्यजीवांच्या शिकारीचा. अवैध शिकारीचे प्रमाण प्रचंड वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे यांतील गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे अत्यल्प प्रमाण. अनेकदा शिकारी पकडले गेल्यानंतरही न्यायालयात त्यांच्याविरोधात पुरेसे भक्कम पुरावे सादर करता न आल्यामुळे सुटून जातात व पुन्हा तोच गुन्हा करण्यास धजावतात. शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू बरेचदा न्यायालयात पुरावा म्हणून कमकुवत ठरतात. अशावेळी जनुकीय तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते. उदा. डीएनएचा नमुना प्राण्यांचे शिजवलेले, वाळलेले मांस, सोललेले चामडे, नखे, माशांची वाळलेली परे, अंड्यांचे टरफल, प्राण्यांचे केस, हाडे, दात, हस्तिदंत, शिंगे, कासवाचे कवच, पिसे, माशांचे खवले आणि इतकेच नव्हे अवैध वन्यजीव उत्पादने वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या पिशव्यांमधून देखील घेता येतो. डीएनएच्या तपासणीतून तो प्राणी, त्याचे लिंग इत्यादी ओळखता येतात. डीएनए तपासणीचा अहवाल हा न्यायालयात भक्कम पुरावा ठरतो आणि गुन्हेगाराला शिक्षा होण्याची शक्यात अनेक पटींनी वाढते. 

रोगांचे निदान आणि प्रतिबंध: अवैध शिकारीप्रमाणेच एखाद्या रोगाची साथ देखील खूप मोठ्याप्रमाणावर वन्यजीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. लेकॉन्स डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा रोगांचे लवकर निदान आणि त्यांवर वेळीच उपचार करून त्यांच्या प्रसारास आळा घालण्यास मदत करते. 

संकटग्रस्त/लुप्त प्रजातींची पुनर्स्थापना: जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून संकटग्रस्त प्रजातींच्या युग्मकांचे संग्रहण आणि त्यातून त्यांच्या पुनर्स्थापनेच्या शक्यता यांविषयीचे संशोधनही लेकॉन्समध्ये सुरु आहे. 

कामगिरी 
लेकॉन्सने साध्य केलेल्या काही प्रमुख उपलब्धी खालीलप्रमाणे, 
१. वन्यजीवांचे अवयव, अवशेष किंवा मलमूत्र इत्यादींच्या तपासणीतून त्यांना ओळखता येण्यासाठी एका सर्वसमावेशक डीएनए आधारित मार्करची (सूचक) निर्मिती. 

२. तस्करांकडून सोडवलेल्या स्टार कासवांची जनुकीय तंत्रज्ञानाचा मदतीने त्यांच्या मूळ अधिवासात पुनर्स्थापना 

३. मांजरवर्गातील मोठे प्राणी आणि खुर असणाऱ्या प्राण्यांची प्रजननक्षमता आणि गर्भावस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी संपूर्णपणे इजारहित पद्धतींचा विकास. 

४. भारतातील वेगवेगळी प्राणी संग्रहालये आणि वन्यजीव अभयारण्यातील संकटग्रस्त वन्यजीवांच्या डीएनएचा अभ्यास करून त्यांच्यातील विशिष्ट परजीवी, जीवाणू आणि विषाणुजन्य रोगांचे निदान. 

५. सिंह, वाघ आणि बिबट्यांची विषमयुग्मकता(heterozygosity) मोजण्यासाठी आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापकांना प्राण्यांच्या अंतःप्रजननात मदत करण्यासाठी प्रजाती-विशिष्ट मायक्रोसेटेलाईट मार्करची निर्मिती. 

६. भारतातील २५० हून अधिक प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या डीएनएचे संग्रहण. 

७. क्रायोप्रिझर्वेशन (जैव घटकांचे अत्यंत कमी तापमानात जतन करणे) तंत्रज्ञानाद्वारे लुप्तप्राय प्राण्यांच्या जननग्रंथींचे संग्रहण आणि त्यांचा वापर करून कार्यशील युग्मकांचे पुनरुज्जीवन. 

८. कृत्रिम रेतानाच्या मदतीने एका चितळ हरिणीपासून ‘स्पॉटी’ तर एका काळवीट हरिणीपासून ‘ब्लेकी’चा जन्म 

९. डीएनए आधारित इजारहित पद्धतींचा वापर करून वाघांची संख्या, त्यांचे लिंग गुणोत्तर आणि त्यांच्या लोकसंख्येची रचना जाणून घेणे. 

अशाप्रकारे वन्यजीव संवर्धनात लेकॉन्स मोठे योगदान देत आहे. लेकॉन्सवरील कामाचा प्रचंड दाब आणि उत्तरभारतही अशा एक प्रयोगशाळेची गरज लक्षात घेऊन सीसीएमबीने बरेली येथे आणखी एक अशीच डीएनए बँक उभारण्याची तयारी सुरु केली असून या वर्षाच्या अखेर पर्यंत तीही कार्यान्वित होईल अशी आशा येथील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 


@@@@@ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा