बुधवार, २१ जानेवारी, २०१५

पंकज सेक्सारिया : एक संवेदनशील संशोधक

पंकज सेक्सारिया हे एक संशोधक, लेखक, फोटोग्राफर, अभ्यासक आणि पर्यावरण क्षेत्रातील सक्रीय कार्यकर्ते आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी व्यापक स्वरूपाचे काम केले आहे, विशेष करून अंदमान आणि निकोबार बेटांच्या संबंधात. या बेटांसंबंधित विषयांवर ते १९९८ पासून इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये नियमितपणे लिहित आहेत. त्यांनी या बेटांवर आधारित दोन ललितेतर पुस्तके Troubled Islands (2003; पत्रकार म्हणून त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह) आणि The Jarawa Tribal Reserve Dossier: Cultural And Biological Diversity in the Andaman Islands (Jt.Editor 2010) ही लिहिली आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून ते कल्पवृक्ष या पर्यावरण अॅक्शन ग्रुपशी जोडलेले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये अजूनही असलेल्या समस्यांबद्दल त्यांना काळजी आहे आणि त्या सोडविण्यासाठी ते आपले व्यापक संशोधन, कायदेशीर हस्तक्षेप, प्रचार पत्रकारिता आणि आपल्या नेटवर्किंगद्वारे सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपली मास्टर्स डिग्री जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली येथून पूर्ण केली आहे आणि सध्या ते मास्ट्रीच युनिव्हर्सिटी (Maastricht University, Netherlands), नेदरलँड्स येथून सायन्स, टेक्नोलॉजी अॅन्ड सोसल स्टडीज मध्ये पीएचडी करत आहेत.
नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांवर आधारित त्यांची एक कादंबरी “द लास्ट वेव्ह” हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स, इंडिया कडून प्रकाशित करण्यात आली आहे. वास्तविकतेचा भक्कम पाया असलेल्या या कादंबरीला टीकाकारांकडून भरपूर प्रशंसा प्राप्त होत आहे आणि देशभरातील वाचकही तिच्या प्रेमात पडले आहेत. तर जाणून घेऊयात पंकज यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांच्या कादंबरी विषयीही. 
१. मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर पारंपारिक मार्गाने न जाता पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्ही मास कम्युनिकेशन या विषयाची निवड केली आणि नंतर तुम्ही पर्यावरण आणि वन्यजीवांसंबंधित विषयांकडे आकर्षित झालात, हे कसे?
बघ अस आहे कि मला इंजिनीरिंगच करायचं अस काही मुख्य आकर्षण नव्हत. पर्यावरण आणि वन्यजीव यात माझी रुची आधी पासूनच होती. मी नववी दहावीला असतांनाच मला पक्षी निरीक्षण इत्यादीची आवड निर्माण झाली होती. ही आवड निर्माण होण्यात पियुषचा मोठा हातभार होता कारण माझ्याही आधीपासून त्याला या विषयात आवड होती. माझी बारावी झाली तोपर्यंत पर्यावरण आणि वन्यजीव या विषयात माझी रुची खूप वाढली होती. परंतु त्यावेळी म्हणजे २० वर्षांपूर्वी बारावी नंतर पर्यावरण या विषयात शिकायचं असेल तर पदवी स्तरावर काही फारसे करता येण्यासारखे नव्हते. आजकाल खूप पर्याय आहेत पण त्यावेळी काहीच नव्हते. माझ्या वडिलांसह इतरही बऱ्याच जवळच्या लोकांचे असे म्हणणे होत कि तुला नंतर जे करायचं असेल ते तू कर परंतु डिग्री करायची तर अशी डिग्री कर ज्याचा काहीतरी फायदा होईल. मला पर्यावरण या विषयात काम करायचे आहे असे माझे त्यावेळीही ठरलेलेच होते म्हणून मी इंजिनीरिंग केले परंतु इंजिनीरिंग करून काही मार्ग बदलला वगैरे असे काही नाही. माझी या विषयात विशेष रुची निर्माण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मी अकरावीत असतांना आपल्या महाराष्ट्रात पश्चिम घाट वाचविण्यासाठी एक “पश्चिम घाट बचाव” मोहीम झाली होती. या मोहिमेंतर्गत पश्चिम घाट बचाव मोर्चा असा एक मोर्चा ही काढण्यात आला होता. पश्चिम घाट ही एक खूपच महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी पर्यावरणीय प्रणाली (इकोलोजिकल सिस्टम) आहे. त्यात जंगलं आहेत, अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत, लोकही राहतात. तर या परिसंस्थेची काय परिस्थिती आहे याचे निरीक्षण करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पत्रकार अशा लोकांनी एक प्रकल्प हाती घेतला. यात पश्चिम घाटात काय होते आहे हे समजून घेण्यासाठी एक मार्च काढण्याचे ठरले. यात १०० दिवसांचा मार्च करायचा असे ठरले. काही लोकांनी पश्चिम घाटाच्या उत्तर टोकाकडून म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून आणि काही लोकांनी दक्षिण टोकाकडून म्हणजे केरळ आणि तामिळनाडूच्या सिमांवरून हा १०० दिवसांचा मोर्चा काढायचा. उत्तरचा गट दक्षिणेकडे येणार आणि दक्षिणेचा गट उत्तरला येणार आणि १०० दिवसांनी त्यांची गोव्याला मिटिंग होईल. त्यावेळी मी दहा दिवसांसाठी महाबळेश्वर ते पाटण दरम्यान या मोर्चात सहभागी झालो होतो. या मोर्चात अनेक लोकांशी पश्चिम घाटाबद्दल बोलणे झाले, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. यावेळी पश्चिम घाट काय आहे, तेथील परिस्थिती कशी आहे याचा मला खूप जवळून, वैयक्तित पातळीवर अनुभव घेता आला. हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता ज्यामुळे मी खूपच प्रभावित झालो होतो. याच दरम्यान पुण्यातही आम्ही छोटे मोठे कार्यक्रम सुरु केले होते. त्यावेळी नर्मदा बचाव आंदोलनचेही पुण्यात बरेच काम चालायचे. विध्यार्थी दशेत आम्ही एखादा मोर्चा किंवा थोडे निधी संकलन इत्यादीच्या निमित्ताने आम्हाला शक्य होईल तेवढा हातभार या आंदोलनाला लावत होतो. हे अनुभव खूप मोठे होते. पर्यावरण काय आहे, विकास काय आहे. “Whose development at whose cost” हा जो प्रश्न विचारला जात होता यामुळे शिकण्याची एक खूप चांगली संधी मिळाली. मग इंजिनीरिंगच्या काळातही हे सगळे असेच चालू राहीले. वन्यजीवन पाहण्यासाठी खूप भटकंती, खूप पक्षीनिरीक्षण इत्यादी केले.  
दुसरे महत्त्वाचे असे कि माझे काही पाच सात मित्र होते ज्यांच्याशी माझा या विषयावर खूप पत्रव्यवहार व्हायचा, त्याकाळात ईमेल वगैरे असे काही नव्हते. यात खूप मोठी म्हणजे १५-१५, २०-२० पानांची पत्रे आम्ही एकमेकांना लिहायचो. यात आम्ही पर्यावरण या विषयात काय आव्हाने, काय समस्या आहेत यावर एकमेकांचे विचार व्यक्त करायचो. आता हा पत्रव्यवहार चालू असतांना माझे जे काही मित्र मैत्रिण होते ते म्हणायचे कि तू खूप छान लिहतोस, तुझे पत्र कधी येते आणि आम्ही कधी ते वाचतो असे आम्हाला होते. यामुळे मला असे लक्षात आले कि आपण बऱ्यापैकी लिहू शकतो. माझी लिहिण्यातही रुची निर्माण झाली. मग मी असा विचार केला कि पर्यावरण आणि कम्युनिकेशन यांच्या इंटरसेक्शनवर काहीतरी काम करायचे. म्हणून मी इंजिनीरिंग झाल्यानंतर मास कम्युनिकेशनला गेलो परंतु याचवेळी मी हेही ठरवले होते कि मी फक्त पर्यावरणाशी संबंधितच काम कम्युनिकेशनच्या क्षेत्रात करणार कारण त्या क्षेत्रात इतर संधी खूप होत्या पण मला तिकडे जायचे नव्हते.
२. संपादक, फोटोग्राफर, संशोधक, पत्रकार, आंदोलक आणि अकॅडमिक – तुमचे व्यक्तिमत्त्व असे अष्टपैलू आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करणे तुम्हाला कसे काय शक्य होते?
कस करतो ते सांगण खूप अवघड आहे. खर म्हणजे व्यापक दृष्टीने बघितले तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्याच आहेत म्हणजे बघ ज्याविषयावर मी संशोधन करतो त्याच विषयावर मी फोटोग्राफी करतो त्याच विषयावर मग मी लिहितो, तेच विषय संपादनाचेही असतात. थोडक्यात हे एखाद्या जिग्सो पझल सारख असत ज्यात इकडचे तिकडे बसते. म्हणजे यात मेहनत करावी लागते पण खूप मेहनत करावी लागते असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त आवश्यक वाटते. मी जेव्हा एकाद्या कामाला लागतो तेव्हा त्यावर पूर्ण एकाग्रता मला करता येते. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एकच गोष्ट करत राहिलो कि एका बाजूला तर त्यात आपल्याला खूप बोरिंग होते पण त्याचवेळी ते काम आपण करत राहिलो तर ते करण्याची आपली कार्यक्षमता, आपले कौशल्य वाढते. मी हे सगळ कस करतो याचा  काही एक फिक्स फोर्मुला मला सांगता येणार नाही पण मला अस वाटत कि केल पाहिजे आणखी करण्याची आवश्यकता आहे.
So many fingers. Sea Anemones, Havelock Island
३. अभ्यास आणि कामासाठी तुम्ही देशातील इतर कोणत्याही भागाऐवजी अंदमान आणि निकोबार बेटांचीच निवड का केली?
निवड अशी केली नाही. माझी इंजिनीरिंग संपल्यावर जवळपास ६ महिने मला काही काम नव्हत. खर म्हणजे इंजिनीरिंगच्या आठही सेमिस्टरमध्ये मी कधीही पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो नव्हतो. तर शेवटच्या वर्षीही काहीतरी एक तोंडी परीक्षा (व्हायवा) बुडाली होती आणि जवळपास ६ महिने काही नव्हत करायला. त्यावेळी माझा एक खूप चांगला मित्र, ज्याच्यामुळे आम्ही पक्षी निरीक्षण वगैरे सुरु केले, तो आधी आयआयटी मुंबईला होता आणि नंतर त्याला नेव्ही मध्ये जॉब लागला आणि त्याची पोस्टिंग पोर्ट ब्लेअरला होती. तो मला म्हणाला तू जर रिकामा असशील तर येथे ये, दोन एक महिने आपण येथे फिरू, बोलू. ही एक खूप चांगली संधी होती म्हणून मी तिकीट काढून गेलो पोर्ट ब्लेअरला. या गोष्टीला आता २०-२१ वर्ष झाली. १९९३ च्या हिवाळ्यात मी गेलो होतो, काही काम नसल्यामुळे मी खूप भटकलो, अंदमानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, खूप चांगले चांगले अनुभव आले - कासवे, कासवांचे नेस्टिंग, तिथले जंगल, तिथला बीच, तिथला समुद्र इत्यादी पाहिले तिथल्या लोकांना भेटलो. तिथले सौंदर्य आणि तिथल्या समस्या यांची थोडी ओळख झाली, माहिती मिळाली. तेथे काही दोनचार लोक होते जे पर्यावरणाशी संबंधित काम करत होते त्यांच्याशी संबंध आला. मग या जागेबद्दल खूप आवड निर्माण झाली. पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रात काम करत असल्यामुळे येथील सौंदर्य आणि समस्यांची थोडी जाणीव झाली आणि असे वाटू लागले कि आपण तेथे जावे आणि काम करावे. तेथील वास्तव्याचे दोन महिने संपल्यावर मग मी पुण्याला परत आलो, इंजिनीरिंग पूर्ण केले आणि मग मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मी दिल्लीला गेलो. दिल्लीला कल्पवृक्ष संस्था होती, अजूनही आहे पण त्यावेळी ती पुण्याला नव्हती. या संस्थेचे काही सदस्य अंदमान मध्ये काम करत होते, मी अंदमानला जाऊन आलो होतो म्हणून येथेही त्यांच्याशी संपर्क झाला. त्या संस्थेचा मी सदस्य झालो. त्यांच्याबरोबर अंदमान आणि इतरही विषयांवर काम सुरु केले. मला नेहमी अंदमान आणि निकोबार बेटांवर परत जावे, तेथे काम करावे असे वाटायचे. माझे पदव्युत्तर शिक्षण जेव्हा संपले तेव्हा कल्पवृक्ष बरोबर अंदमान निकोबारला पर्यावरण निरीक्षणासाठी जाण्याचा एक प्रकल्प मुंबईच्या BNHS (बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी)कडे मंजुरीसाठी आम्ही पाठवला होता. एका वर्षानंतर तो प्रकल्प मंजूर झाला आणि पैसे आले. मग १९९७-९८ मध्ये मी परत अंदमान निकोबारला गेलो. यावेळी ६ महिन्यांसाठी गेलो, तेव्हा दोन-तीन मुद्यांवर अनुसंधान करायचे असे होते.
थोडक्यात तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला ती जागा खूप आवडली, मी तेथे थोडे काम सुरु केले आणि जसे एखाद्या विषयावर काम सुरु केल्यावर माणूस त्यात आणखी आणखी पुढे जात जातो तसे मी त्यात गुंतत गेलो. काही मुद्दे असेही होते ज्यांसाठी आम्ही कोर्टात गेलो. पर्यावरणाचे, तेथील आदिवासींच्या अधिकाराचे मुद्दे यांबद्दल ट्रबलड् आयलंड मध्ये मी खूप काही लिहिले आहे, त्याचवेळी मी वर्तमानपत्रातदेखील लिहित होतो. यासाठी मग फोटोग्राफ्स काढणे, लोकांशी बोलणे, तपासणी करणे इत्यादींसाठी जावे लागत होते. आपण इंग्रजीत one led to the other असे म्हणतो ना तसे मग हे काम सुरु राहिले आणि आज २० वर्षे झाली मी हे काम करतो आहे.  
जायंट रॉबर क्रॅब, साउथ सेंटीनल बेट
४. त्याच वेळी मग तुम्ही कल्पवृक्ष पुण्यात पण सुरु केली.....
मी सुरु केली नव्हती. कल्पवृक्षचे सदस्य काही वैयक्तिक कारणांसाठी पुण्याला स्थलांतरित झाले होते. त्यांनी पुण्याला ही कल्पवृक्ष संस्था सुरु केली होती. ते आल्यानंतर ६ महिन्यांनी मी ही माझे शिक्षण संपल्यावर पुण्याला आलो. आणि या संस्थेशी एक संशोधक म्हणून जोडला गेलो.
५. कल्पवृक्ष फक्त अंदमान निकोबार बेटांवरच काम करते कि इतरही विषयांवर?
कल्पवृक्ष या संस्थेच खूप मोठ काम देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालते. कल्पवृक्ष मुख्यत्वे पर्यावरण संरक्षण आणि मानवी हक्क किंवा सामाजिक समानता या मुद्द्यांवर काम करते. या संस्थेचे मानणे आहे कि जर पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समानता या दोन्ही गोष्टींना आपण बरोबर घेतले नाहीत तर समाजाचा किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही. आपण फक्त पर्यावरण संरक्षण केले आणि गरीब, आदिवासी यांच्या अधिकारांचे हनन केले तर तेही चालणार नाही आणि विकास करण्यासाठी पर्यावरणाचा नाश करूनही चालणार नाही.
कल्पवृक्ष संस्थे अंतर्गत अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवर काम करत असतात. मोठे बांध (जसे नर्मदा बचाव आंदोलन), कम्युनिटी कन्झर्वेशन(छोटे गाव, आदिवासी समूह यांच्या पातळीवर घेतले गेलेले छोटे छोटे पुढाकार), पर्यावरण शिक्षण, अनुसंधान, कम्युनिकेशन अशी बरीच कामे या संस्थेच्या छत्राखाली चालतात. मी अंदमानवर काम करतो बाकीचे लोक इतर विषयांवर काम करतात काही लोक शिषण, धोरणे इत्यादी विषयांवर काम करतात.
ही संस्था तशी खूप मोठी वगैरे नाही परंतु काम करणारी माणसे आपल्या कामाप्रती खूप समर्पित आहेत आणि वर्षानुवर्षे काम करत आहेत म्हणून ते काम खूप मोठ दिसत.
प्लायवुड-मिल
६. अंदमान ट्रंक रोड बंद न करता येथील अधिकाऱ्यांनी चालविलेला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान, पर्यटकांकडून जारावांना मिळणारी असंवेदनशील वागणूक इत्यादींकडे पाहता या बेटांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. ही बेटे, येथील पर्यावरण आणि येथील आदिवासी लोक यांना वाचविण्यासाठी गेली २० वर्षे तुम्ही करत असलेले अथक आणि सततचे प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत. आजूबाजूला अशी अत्यंत निराशाजनक परिस्थिती असतांना अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेरित करते आणि तुमची आशा जिवंत ठेवते.  
परिस्थिती थोडी निराशाजनक आहे परंतु जगात चांगल्या, सकारात्मक गोष्टीही खूप आहेत. आपल्या आजूबाजूला खूप लोक खूप संघर्ष करत असतात. मला अस वाटत कि जन्मापासून मी खूप भाग्यवान राहिलो आहे. मला कशाची कमतरता अशी कधी जाणवली नाही. आणि जर आपल्याकडे संधी आहेत, आपण सक्षम आहोत तर आपण काम करायला पाहिजे. म्हणजे मी शिकलोय, मला लिहिता येते, मला आवड आहे तर एकीकडे जेथे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तशा नसाव्यात, काय करणार, पण दुसरी कडे अशाही गोष्टी आहेत ज्या सुंदर आहेत, बघण्यासारख्या आहेत करण्यासारख्या आहेत आपण त्या करत राहाव्यात अस मला वाटत. गेल्या वीस वर्षांत अंदमानात खूप चांगले अनुभवही मला आलेले आहेत. माझी जगात सगळ काही बदलून टाकाव, क्रांती आणावी अशी काही इच्छा नाही परंतु छोटे छोटे बदल घडवून आणावेत आणि आपण ते घडवून आणू शकतो यावर माझा विश्वास आहे.
आताच माझी एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. ती लिहिण्यामागचेही एक कारण म्हणजे मला वाटत कि या जगात असे बरेच लोक आणि त्यांच्या गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते पण माहिती असायला हवी. आणि एक लेखक म्हणून मला असे वाटते कि माझी ती जबाबदारी आहे कि त्या गोष्टी मी इतर लोकांना सांगाव्यात. एक पत्रकार म्हणूनही मी जेव्हा एखादी घटना किंवा गोष्ट लिहायचो तेव्हा मला नेहमीच वाटायचे कि मला का ही गोष्ट लिहायची आहे तर, ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, त्यांना माहित होणे महत्त्वाचे आहे. तर सांगायचे तात्पर्य असे कि निराशा असते हे खरे आहे पण आपल्याला काय करता येईल ते आपण करावं हाच माझा अनेक वर्षांपासूनचा दृष्टीकोण राहिला आहे.
लाकडाचा मोठा ओंडका आणि हत्ती
७. या बेटांवरील तुमचे पहिलेच काल्पनिक लेखन – तुमची आताच प्रकाशित झालेली कादंबरी, द लास्ट वेव्ह ला टीकाकारांकडून चांगली प्रशंसा मिळाली आहे. या कादंबरीकडे तुमचे एक मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. तुम्हाला काय वाटते? एक कादंबरी लिहिणे हे एक पत्रकार म्हणून लिहलेल्या लेखांपेक्षा अधिक परिणामकारक आहे?
ही कादंबरी किती यशस्वी झाली आणि किती नाही हे मला माहित नाही. पण इतक्यात तिचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न आहेच. चांगली विक्री होते आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे खर आहे पण कोणत्या मानकांवर मूल्यमापन करायचे हा ही प्रश्न आहे. हे खूप मोठ यश आहे अस मला अजून तरी सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या यशाचे दोन मानांकन आपण विचारात घेऊ शकतो एक म्हणजे विक्री किती होते आहे आणि दुसरे म्हणजे टीकाकार, वाचक काय म्हणत आहेत. दोन्ही बाबतीत या कादंबरीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु येणाऱ्या काळातच आपल्याला खरे काय ते समजेल. खर म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे या प्रकारची पुस्तके कमी आहेत.
द लास्ट वेव्ह
पुस्तक का लिहिले याबद्दल तुला थोड सांगितलं कि तुझ्या लक्षात येईल. झाल अस कि आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी काम करत होतो. २००२ मध्ये आम्ही दाखल केलेल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून अंदमान ट्रंक रोड बंद करावा असा आदेश आला होता, याच बरोबर इतरही काही आदेश आले होते. आजही, बारा वर्षांनंतरही त्या आदेशाचे पालन झालेले नाही. हे पुस्तक मी २००५-०६ मध्ये लिहलेले आहे. २००२ ते २००५ ही दोन-तीन वर्षे आम्ही खूप प्रयत्न केला होता, कि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही आहे. या आपल्या लोकशाही असलेल्या देशात या पेक्षा पुढे जाऊन आपण काय करू शकतो, सर्वोच्च न्यायालयात जाऊन मिळालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तर आपण यापेक्षा जास्त काय करू शकतो. तर एका मानाने ते न होण हा खूपच निराशाजनक अनुभव होता. यावेळी आम्हाला अपयश आले असे मला वाटत नाही तर आपली व्यवस्था, सिस्टम अपयशी झाली असे मला वाटते. आता याला अपयश म्हणायचं तर आपण अपयश म्हणू पण त्याला माझी प्रतिक्रिया अशी होती कि पुढे आपण काय करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला, कितीतरी लेख लिहिले, प्लानिंग कमिशन (योजना आयोग)कडे दाद मागितली, अशाप्रकारे आम्हाला करता येण्यासारख सर्वकाही आम्ही केल परंतु आम्हाला यश लाभल नाही. मग मी असा विचार केला कि मला मोठ्या वाचकवर्गाकडे जाता येईल का? त्यासाठी मग मला वाटले कि मला कादंबरी लिहिता येईल. सत्य परिस्थितीवर आधारित तरीही एक काल्पनिक गोष्ट लिहिता येईल. तर हा म्हणजे एक प्रकारचा प्रतिसाद होता. अस नाही कि कादंबरी लिहिल्याने सर्वकाही ठीक होईल परंतु आपण हे सगळ केल आहे मग हे पण करून बघू या असा त्या मागचा विचार होता. एका दृष्टीने ही कादंबरी म्हणजे माझ्या लिखाणाचाच पुढचा एक भाग होती. तर दुसरीकडे ती त्या अपयशाला दिलेला प्रतिसादही होती. जे मुद्दे वर्तमानपत्र आणि कोर्टात मी मांडले होते तेच या पुस्तकातही मांडले आहेत मात्र त्यांची रचना बदलली आहे (मांडण्याची पद्धत), कँव्हास बदलला आहे, त्यांची व्याप्ती बदलली आहे.
तर एका अर्थाने ही कादंबरी माझ्या लिखाणाचाच पुढचा भाग आहेही आणि नाहीही.
आता आपण या विषयावर बोलतोच आहोत तेव्हा दुसरी एक गोष्टही सांगतो, २००४ला त्सुनामी आली, त्यावेळी मी तेथे नव्हतो पण नंतर बऱ्याच वेळेस जाऊन आलो आणि पाहिलं कि इतर लोकांच खूप नुकसान झालंय पण जारावा हे जे तिथले मूळ आदिवासी आहेत त्याचं काहीच नुकसान झालेलं नाही. आणि अस ही नाही कि त्सुनामी आली ते त्यांनी पाहिले आणि ते पळून गेले, अस जे सांगितले जातंय ते चुकीच आहे. हे आदिवासी जंगलात थोड्या उंचीवर, डोंगरावर राहणारे आहेत त्यामुळे जेव्हा त्सुनामी आली तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर नव्हतेच. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला कि एवढी मोठी त्सुनामी आली पण या लोकांना काहीच झाल नाही पण त्यांचा इतिहास जर आपण पहिला तर गेली १५०-२०० वर्ष एक अशी न संपणारी त्सुनामी त्यांच्या मागे लागली आहे. समुद्रातली त्सुनामी येऊन गेली, नाश झाला आणि जीवन पुन्हा सुरुही झाले परंतु हे आदिवासी आणि समाजातील दुसरेही अनेक असे आदिवासी समूह आहेत ज्यांच्यामागे इतिहासच जणू एक त्सुनामी म्हणून मागे लागला आहे जी थांबतच नाही. त्यांच्या मागेच लागलेली आहे. तर अस मला वाटल. हा एक प्रकारचा रूपकात्मक विचार होता. तर असाच विचार करून मी ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीला शीर्षकही आम्ही नंतर दिले ते असेच दिले कि वेव्ह म्हणजे लाट जी आहे ती खरी एक आहे आणि रूपकात्मक ही आहे. तर या कादंबरीच्या बाबतीत अशा या दोन तीन गोष्टी आहेत.
८. काही लोक म्हणतात कि आदिवासींना त्यांच्या पद्धतीने जीवन जगू दिले पाहिजे जसे ते शेकडो वर्षांपासून जगत आलेले आहेत तर काही जण म्हणतात त्यांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. यावर तुमचे मत काय आणि तसे का हे कृपया आम्हाला सांगा?
मला अस वाटत कि जे आपल्याला करायला हव आणि जी सत्य परिस्थिती आहे ती या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे. मी पुस्तकात ही अस लिहिलंय कि हा प्रश्न जारावा किंवा आदिवासी समाजाचा नाही तर तो आपला प्रश्न आहे कि आपल्याकडे ती समज, किंवा ती बुद्धिमत्ता किंवा ती नम्रता आहे का? आपण जारावा सारख्या समाजाला आदर देऊन, त्यांना बरोबरीचे समजून त्याच्याशी संपर्क करू शकतो का? कारण जर आपण इतिहास पाहिला तर अस लक्षात येत कि हा संपर्क जो आहे तो कधी बरोबरीचा झालेला नाही. नेहमी आपला जो समाज आहे तो या आदिवासींना टाकून बघतो, जसे हे आदिवासी म्हणजे खालचे लोक आहेत. तर हा प्रश्न आहे. जगभरात असे अनेक आदिवासी समूह अशा प्रयत्नात नामशेष झाले आहेत. अंदमानच्या जंगलात ही असे दोन आदिवासी समूह होते जे आता जवळजवळ नामशेष झाले आहेत. १८५० पासून जेव्हा ब्रिटीश आले आणि नंतर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पर्यंत. ग्रेट अंदमानिज आणि ओंगे नावाचे हे आदिवासी समूह होते. ते खूप कमी कमी असे राहिले आहेत. त्यांची संकृती, त्यांचा समाज, त्यांची जीवनपद्धती हे सर्व काही बदलले आहे. ते आधी जसे होते तसे नाहीच राहिले आता. जर तुम्ही हा इतिहास पहिला तर तुम्ही कशावरून म्हणता कि त्यांचे आधुनिकीकरण करून आम्ही त्यांना एक चांगल भविष्य देऊ. आपण जे काही आतापर्यंत केलेलं आहे त्यावरून तर अजिबात तसे वाटत नाही. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे परंतु त्याच उत्तर अस सरळ सरळ साध सोप नाहीये. त्यांना काय हवय हे आपल्याला कसे कळणार. हे समजणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते सोपे नाहीये. कोणीतरी म्हणतोय कि त्यांना जंगलात रहायचंय कोणीतरी म्हणतो कि नाही त्यांना बाहेर रहायचंय. आपल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करून नंतर त्यांनी त्यांना काय हव आहे हे ठरवलं तर ते ठीक आहे. पण त्यांच्याशी या विषयावर चर्चा कशी करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण जो पर्यंत आपण त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही तो पर्यंत आपण त्यांच्याशी बोलणार पण कसे? हा प्रश्न तर गुंतागुंतीचा आहेच परंतु तेव्हढी संवेदनशीलताही आपल्यात आहे कि नाही या बद्दलही मला शंका आहे.
Swiftlet-cave
९. या क्षेत्रात काम करतांना तुम्हाला आलेल्या अनुभवांमधील सर्वाधिक संस्मरणीय असे एक दोन अनुभव आम्हाला सांगाल का?
असे खूप अनुभव आहेत. एक अनुभव आठवतो, पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केला आहे, अंदमान मध्ये साउथ सेंटीनल नावाचे एक छोटे बेट आहे. एक वीस चौरस किलोमीटरचे हे बेट आहे. त्यावर मी खूप लिहिलेही आहे. एका रिसर्च टीम बरोबर १९९८ साली मी तेथे एकदाच गेलो होतो आणि १०-१२ दिवस राहिलो होतो. तेथे कोणी राहत नाही आम्ही तेथे समुद्र किनाऱ्यावर उघड्या जागेवर प्लास्टिक घालून झोपायचो. एकदा दिवसभर फिल्म शुटींगचे काम चालू होते, खूप भटकलो होतो आणि रात्री खूप थकून आम्ही झोपलो होतो. तेव्हा अचानक कोणीतरी प्लास्टिक ओढतंय अस वाटायला लागल. आम्ही खूपच थकलेलो होतो, निदान मी तरी, डोळेही उघडत नव्हते. वाटत होते आता रात्री येथे कोण हे प्लास्टिक ओढत असेल आणि काय त्रास आहे वगैरे. मी खूप कष्टाने डोळे उघडले. पाहतो तर दोनतीनशे किलो वजनाची ग्रीन सी टर्टल (हिरवा समुद्री कासव) त्या प्लास्टिकवरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती! तर झाल अस होत कि त्या समुद्र किनाऱ्यावर ग्रीन सी टर्टल अंडी घालायला येते. आम्ही झोपलो होतो ते बीचच्या एका कोपऱ्यात, तेथे एक ग्रीन सी टर्टल अंडी घालायला आली होती आणि ती ते प्लास्टिक पार करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही एका मानाने तिच्या रस्त्यात होतो. आता ती एक दोन-तीनशे किलो वजनाची कासव होती ती तेथे थोडी अडकल्यासारखी झाली होती कारण त्या प्लास्टिकवरून तिचे पाय घसरत होते आणि ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती म्हणून ते प्लास्टिक ताणले जात होते. मी जेव्हा उठलो आणि बघितलं तर मला एकदम एक धसकाच बसला कि अरे हे काय चाललंय. तर अशी ही माझी अविस्मरणीय आठवण आहे, कोणीही विचारलं तरी हा प्रसंग मला नेहमी आठवतो.
मग ती गेली पुढे?
हो मग आम्ही ते प्लास्टिक काढले, ती पुढे गेली. आपल्या मागच्या पायांनी खड्डा करून त्यात ती अंडे घालत असते तसे तिने ते घातले आणि ती परत गेली.
अंडी घातल्यानंतर समुद्रात परत जातांना एक ग्रीन सी कासव, साउथ सेंटीनल बेट

आणखी एखादा अनुभव सांगाल का?
त्याच ट्रीपमधलाच हा आणखी एक प्रसंग आहे. अंदमानमधल्या मॅनग्रोव्ह जंगलात (समुद्री किनाऱ्यावरील जंगल जे भरतीच्या काळात पाण्याखाली जाते आणि ओहोटीच्या काळात परत कोरडे होते) सर्पंट इगल नावाचा एक पक्षी राहतो. तर आम्ही त्या जंगलाच्या जवळून बोटीने चाललो होतो तेवढ्यात मला त्या पक्ष्याचे एक घरटे तेथे दिसले आणि मी माझ्या मित्रांना म्हणालो कि माझ्याकडे केमेरा आहे, मी जरा त्या घरट्याच्या समोरील झाडावर चढतो आणि त्या घरट्यात अंडी वगैरे आहेत का, कोणी पक्षी येतो का ते बघतो. मी ज्या झाडावर चढलो होतो त्यापासून १५-२० फुटांवर ते झाड होते आणि त्यावर ते घरटे होते. त्या घरट्यात अंडी होती. मी या झाडावर २०-२५ फुट उंचीवर बसलो होतो. त्या घरट्याच्या आसपास मादी वा नर पक्षी दिसत नव्हता, तो कुठेतरी गेला होता किंवा मला पाहून तो तेथे येत नव्हता. मला वाटल थोड्यावेळात मादी किंवा नर येईल ते तेथे बसेल आणि मग मी फोटो काढेल.
मी तेथे असा लपून बसल्यासारखा बसलेलो होतो आणि मला एक शिट्टी सारखा आवाज ऐकू आला, तेव्हढ्यात एका सेकंदाच्या आत माझ्या डोक्यावरून तो पक्षी एखाद्या बंदुकीतून निघालेल्या गोळीच्या वेगात उडत गेला. तो पक्षी माझ्यावर हल्ला करत होता. खर म्हणजे मी त्या ठकाणी असणे हे त्याला त्याच्या घरात अतिक्रमण वाटले असावे, किंवा त्याला काहीतरी धोका असल्याचे वाटले असावे. सुदैवाने मी बचावलो, मी जर थोडासा वर असतो तर त्याचे पंजे नक्कीच माझ्या डोक्यावर लागले असते. हे पक्षी सर्पभक्षी असतात त्यामुळे त्यांची नजर, त्यांच्या हल्ल्यातील तंतोतंतपणा, त्यांचा वेग यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. मी थोड सांभाळून बसलो पण त्याने दोन तीन वेळेस तशीच फेरी परत मारली मग मात्र मी घाबरलो कि हा प्रकार खूप धोकादायक होऊ शकतो म्हणून मग मी खाली उतरून गेलो.
१०. तुम्ही करत असलेल्या डॉक्टरेटबद्दल(पीएचडी) आम्हाला सांगा.
सामाजिक शास्त्रज्ञाने वैज्ञानिकांचा अभ्यास करणे. विज्ञानाचा समाजावर काय परिणाम होतो हे तर आपण नेहमी अभ्यासत असतोच परंतु यात सामाजिक परिस्थितीचा विज्ञानावर, वैज्ञानिकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. यात वैज्ञानिक ज्या समाजातून आला आहे त्या समाजातील परिस्थितीचा त्याच्या संशोधनावर परिणाम होऊ शकतो का? होत असेल तर कसा होतो? हे अभ्यासायचे आहे.
११. तुमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची अशी कोणती गोष्ट किंवा संदेश तुम्हाला आपल्या वाचकांना सांगायला आवडेल?
असे काही सांगणे खूप अवघड आहे पण मला अस वाटत कि खूप प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या गोष्टी उदा. अंदमान येथील आदिवासी, त्यांची जीवनपद्धती, त्यांची संस्कृती यांच्याबद्दल आपल्यात थोडी संवेदनशीलता असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे “at some point or other everybody is a minority and vulnerable”. एका परिस्थितीमध्ये एक माणूस बहुसंख्यांक असतो परंतु दुसऱ्या परिस्थितीमध्ये तोच मायनोरीटी होतो. जारावाच्या जंगलात दुसर कोणीही जगू शकत नाही, त्यांच्या पद्धतीने. मी जर तेथे गेलो तर मी चार दिवसही राहू शकणार नाही. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते चार दिवस राहू शकत नाहीत, किंवा ते मायनोरीटी होतात. जेव्हा आपल्याला असे लक्षात येईल कि समोरच्या माणसाची जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपलीही होऊ शकते तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडे अधिक संवेदनशील होऊ असे मला वाटते. ही गोष्ट समजणे हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची जाणीव आहे.
तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि आज जी परिस्थिती जारावा आदिवासी समूहांची आहे तशी परिस्थिती कधी आपली सुद्धा होऊ शकते, (राजकीय पक्ष, धार्मिक अल्पसंख्याक इत्यादी.) माझी अशी आशा आहे कि आपण जर बहुसंख्यांक असतांना संवेदनशील राहिलो तर समोरचा माणूस देखील तो बहुसंख्यांक आणि आपण अल्पसंख्याक झालेलो असतांना संवेदनशील राहील.     
-परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com 
@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा