रविवार, २५ जानेवारी, २०१५

शिक्षणपद्धतीत येऊ घातलेल्या क्रांतीची नांदी...... MOOC (Messive Open Online Courses)

परीक्षित सूर्यवंशी/त्रिशूल कुलकर्णी
शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन शिक्षणामुळे आज एक मोठी क्रांती येऊ घातलेली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठातील चांगल्यात चांगल्या शिक्षकांकडून आपल्याला आवडेल तो विषय आपल्या सोयीच्या वेळेनुसार घरबसल्या शिकण्याची संधी या पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. पारंपारिक शिक्षणपद्धतीत काही मर्यादा आहेत जसे तुम्ही विशिष्ट शाखेचे विध्यार्थी असाल तर तुम्हाला त्याहून एकदम भिन्न शाखा निवडता येणार नाही उदा. कला शाखेच्या विध्यार्थाला वनस्पतीशास्त्र आवडत असले तरी त्याला त्याचे औपचारिक शिक्षण घेता येत नाही. शाळा किंवा कोलेजच्या वेळेनुसार वर्गात बसून शिक्षण घेणे बंधनकारक असते. एखाद्या विषयाचे पारंपारिक शिक्षण घेण्यासाठी कमीत कमी काही महिने ते काही वर्षांचा कालावधीही लागू शकतो. याउलट ऑनलाइन शिक्षणपद्धतीत या मर्यादा नाहीत. तुम्ही इंजिनीअर असाल, कला शाखाचे असाल वा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तरीही तुमच्या साठी या शिक्षणाची द्वारे सदैव उघडी आहेत. या शिक्षण पद्धतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यांपैकी काही खालीलप्रमाणे
मोफत शिक्षण: या पद्धतीची जमेची बाजू म्हणजे येथील जास्तीतजास्त कोर्सेस हे अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एक इंटरनेटवर थोडा खर्च करण्याची आपली तयारी असेल तर आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण घरबसल्या घेऊ शकतो. परंतु मोफत मिळते म्हणून त्याचे मूल्य कमी होत नाही. या ठिकाणी आपल्याला अत्यंत उच्चप्रतीचे ज्ञान मिळते जे पारंपारिक पद्धतीने घ्यावयाचे ठरवल्यास आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते.
विषयाची आवड निर्माण करणे: एखाद्या कोर्सचा प्रास्ताविक व्हिडीओ पहिला कि तो करावाच असे वाटते. या ठिकाणी कोर्सेसची रचना इतक्या सुंदररीत्या केली जाते कि तुम्हाला त्या त्या विषयात हमखास रुची निर्माण होते. एखाद्या नावशिख्या पासून ते त्या विषयातील तज्ञापर्यंत सर्वांनाच काहीतरी नवीन मिळेल अशाप्रकारे हे कोर्स तयार केले जातात. हा सुवर्णमध्य साधणे हे किती मेहनतीचे काम आहे आणि कोर्स बनवणाऱ्यांनी किती जीव ओतून काम केले आहे हे आपल्याला हे कोर्सेस करतांना पदोपदी जाणवत राहते मग आपणही त्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणून मनापासून शिकण्याचा प्रयत्न करतो.
कमी कालावधीत जास्तीतजास्त ज्ञान: ऑनलाइन कोर्सेस हे साधारणपणे काही आठवड्यांचे असतात. आपण आपल्या वेळेनुसार घरबसल्या ते करू शकतो. यासाठी आपल्याजवळ हवे मात्र एक कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन! परंतु कालावधी कमी असला म्हणून आपण कमी शिकणार असे अजिबात नाही. खरतर कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त ज्ञान प्रदान करणे हे या पद्धतीचे वैशिष्ट्यच आहे. पारंपारिक पद्धतीने जो अभ्यासक्रम एक वर्षभर सहज पुरवून पुरवून शिकवला जाऊ शकतो तोच येथे काही आठवड्यात शिकवला जातो. आपण मात्र तेवढे कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.
समृद्ध अभ्यासक्रम: या कोर्सेसचा अभ्याक्रम खूप विचारपूर्वक त्या त्या विषयातील तज्ञ मंडळींद्वारे तयार केला जातो. यात व्हिडीओ लेक्चर, ई-बुक्स, ग्रुप डिस्कशन, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या इत्यादींचा समावेश असतो. तो कोठेच कंटाळवाणा होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते. शेवटपर्यंत विद्यार्थ्यांची शिकण्याची उत्सुकता टिकून राहील अशाप्रकारे तो तयार केलेला असतो.
निवडीचे स्वातंत्र्य आणि विषयांचे वैविध्य: या ठिकाणी तुम्हाला शिकण्यासाठी अक्षरशः शेकडो विषय आहेत. तुम्हाला आवडेल तो विषय तुम्ही येथे शिकू शकता. तंत्रज्ञानापासून ते मानसशास्त्रापर्यंत आणि व्यवस्थापनापासून ते वैद्यकशास्त्रापर्यंत खूप सारे विषय तुम्हाला येथे शिकता येतील.
जगभरातील विध्यार्थी: जगभरातील लाखो विध्यार्थी हे कोर्सेस करत आहेत. एखाद्या कोर्स मध्ये अगदी लाख ते सव्वा लाख विध्यार्थीही असू शकतात! तुम्हाला हे कोर्सस करतांना जगातील वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याची संधीही मिळते. डिस्कशन फोरमवर चर्चा करतांना, एकमेकांचे पेपर तपासतांना तुम्हाला इतरांचा दृष्टीकोन समजून घेण्याची, आपल्या विचारांच्या मर्यादा दूर करण्याची संधी मिळते. काही कोर्सेस गूगल हँगआउट सारखे पर्याय उपलब्ध करून देतात जेथे तुम्ही वेगवेगळ्या देशांतील लोकांशी प्रत्यक्ष बोलू शकता.
Photo : mcny.edu
प्रमाणपत्र: ऑनलाइन शिक्षण देणारी जास्तीतजास्त विद्यापीठे ही यशस्वीरीत्या कोर्स पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देतात.
आनंददायी शिक्षण: या पद्धतीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिकण्यात मिळणारा आनंद! हे कोर्सेस खूप मेहनत घेऊन तयार केलेले असतात. यात तुम्हाला त्या त्या विषयातले अद्यावत ज्ञान रोचक पद्धतीने दिले जाते. परस्पर संवादावर (इंटरएक्शन) विशेष भर दिला जातो. कुठल्या प्रमाणपत्रासाठी न करता केवळ ज्ञानप्राप्ती साठी हे कोर्सेस केल्यास तुम्हाला नक्कीच मजा येईल.
ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या काही चांगल्या वेबसाईटसची नावे खाली देत आहे
 www.coursera.org: जास्तीत जास्त मोफत ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देणारी ही एक खूप चांगली आणि अत्यंत लोकप्रिय वेबसाईट आहे. खूप सारी विद्यापीठे आणि कॉलेजेस या वेबसाईटशी संलग्न आहेत. अक्षरशः शेकडो कोर्सेस या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत.  
www.edx.org: एमआयटी, हार्वर्ड, बर्क्लेई युनिव्हर्सिटी ऑफ केलिफोर्निया, द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास सिस्टम इत्यादींसारखी अनेक विद्यापीठे या वेबसाईटशी संलग्न आहेत.   
www.udacity.com: सेबेस्टियन थ्रून, डेव्हिड स्टेव्हन आणि माईक सोकोलस्की यांनी या वेबसाईटची स्थापना केली. सेन जोस स्टेट युनिव्हर्सिटी यांच्याशी संलग्न आहे.
Photo : www.cppr.in
एखाद्या ऑनलाइन कोर्सचे उदाहरण द्यायचेच झाल्यास मला मी स्वतः केलेल्या “सोशल सायकोलॉजी” या कोर्सचे देता येईल. वेसलियान विद्यापीठातील प्राध्यापक स्कॉट प्लाउअस आणि त्यांचे सहकारी यांच्याद्वारे हा कोर्स शिकविण्यात आला. यात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सामाजिक मानसशास्त्रासंबंधी असलेले बरेच गैरसमज या कोर्समुळे दूर झाले. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्यांचा उपयोग होऊ शकतो अशा अनेक नवीन गोष्टीही शिकायला मिळाल्या. जगात शांतता नांदावी यासाठी आपण काय करू शकतो याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार या कोर्समध्ये करण्यात आला आहे. सामाजिक हितासाठी आपण काय करू शकतो, समाजात आणि वैयक्तिक जीवनात शांतता, परस्पर प्रेम, सौहार्द निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे या गोष्टींचा उहापोह ही करण्यात आला.
धर्म आणि जातींमध्ये वाटला गेलेला आजचा मानव अनेक सामाजिक समस्यांनी त्रस्त आहे त्याच्या समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून या समस्यांचा विचार होणे आवश्यक आहे आणि हा कोर्स त्या दृष्टीने आपल्याला नक्कीच दिग्दर्शन करतो.  
हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या दहा विध्यार्थ्यांना अनोखे बक्षीस ही देण्यात येणार आहे. त्या दहापैकी नऊ जणांना आपल्या आवडीच्या सामाजिक सेवा संस्थेला $१०० चे दान देता येईल आणि एका विजेत्याला $१०००चे! यासह त्याला दलाई लामा यांना भेटता येईल. यासाठीचा सर्व खर्च प्रायोजक करणार आहेत.
या शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आणि फायदे अनेक आहेत. तसेच तिच्यात काही कमतरताही आहेत. हा लेख केवळ तिची ओळख करून देण्यापुरता लिहिला आहे. वाचकांनी स्वतःच हा अनुभव घेऊन पाहावा. ज्ञानदेवांनी सांगितले होते एक तरी ओवी अनुभवावी त्याप्रमाणे असे म्हणता येईल ज्ञानार्जनासाठी असा एक तरी कोर्स करून पाहावा!
@@@@
suryavanshipd@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा